Sunday, September 21, 2008

बरेच काही उगवून आलेले...[भाग १]

झाडांबद्दल मराठीत शेकडो लेख, कविता आल्या असाव्यात. बोरकरांच्या किंवा अलीकडे द. भा. धामणस्करांच्या कविता वाचताना, घासून गुळगुळीत झालेल्या ह्या रूपकालाही नवीन रूपडं कसं बहाल करता येतं, हे जाणवतं. सगळं आयुष्य शहरात गेल्यामुळे असेल, पण 'वृक्षवल्ली आम्हां सोयरे' वगैरे आतून मला कधीच वाटलं नव्हतं. पण गेल्या काही महिन्यांत झाडांची वेगवेगळी रूपं पाहिली. इतकी भिन्न, इतकी वेधक की अगदी अट्टल शहरी माणसालाही त्यांच्यात रस निर्माण व्हावा. त्यांच्याबद्दल लिहून, त्यांना न्याय द्यायचा तर तेवढीच अलौकिक प्रतिभा हवी. तिचा अभाव असला, तरी पूर्वसुरींनी जे काम करून ठेवलंय ते अधूनमधून आठवत होतं. ही कदाचित - लाईफ इमिटेटिंग आर्ट, आर्ट इमिटेटिंग लाईफ सारखी आस्वादाची दुहेरी प्रक्रिया असावी. म्हणजे क्वचित कधी सरत्या संध्याकाळी जसं 'कहीं दूर जब दिन ढल जाये' आठवतं किंवा पावसात 'ओ सजना'/'रिमझिम गिरे सावन' डोक्यात प्ले होऊ लागतं; त्याच्या उलट सारे प्रवासी घडीचे किंवा शंकर पाटलांच्या कथा वाचताना आपला गाव आठवतो किंवा लंपन वाचताना आपणही लहानपणी असाच बर्‍याचदा मॅडसारखा विचार करायचो असं वाटत राहतं. रोजच्या जगण्यात अचानक एखाद्या कलाकृतीची आठवण व्हावी आणि कधी काही वाचताना, ऐकताना 'स्मरणाचा उत्सव जागून' विसरलेलं काही पुन्हा आठवावं - ही जोडी तशी रंजक आहे.

अर्थातच, हे नेहमी होणे नाही. तसं झालं तर त्यातली उत्स्फूर्तता, मजा निघून जाईल. त्यामुळे झाडं पाहून आठवलेल्या त्या एक-दोन कविताच फक्त लिहिण्यापेक्षा एकंदरीतच सापडलेले झाडांचे उल्लेख एका लेखात लिहावेत असं जेव्हा प्रथम डोक्यात आलं; तेव्हा हे कृत्रिम तर होणार नाही ना, ही शंकाही जोडीनेच आली. पण त्या एखाद-दोन क्षणांचा कल्पनाविस्तार केला तर इतरांनाही कदाचित त्यात काही ओळखीचं सापडेल, असंही वाटलं. त्यामुळेच हे - 'बरेच काही उगवून आलेले...'

...

दहिसरचं मुंबईकरण होण्यापूर्वी अनेक वेगवेगळी झाडं पहायला मिळायची. शाळेला जायच्या रस्त्यावर पांगारा आणि अमलताश होते. ग्रीष्मात अनुक्रमे लाल आणि पिवळ्या रंगांत फुलून यायचे. ठिकठिकाणचे गुलमोहर, देवळाकडचं पार असलेलं पिंपळाचं झाड, गुंजाची - बदामाची झाडं, सुबाभूळ, अशोक आणि कितीतरी नाव माहीत नसलेली फुलझाडं - दहिसरचं दहा वस्त्यांचं गाव हे वर्णन सार्थ ठरवत.

शाळेच्या इमारतीतून मैदानापलीकडचं खाचर दिसायचं. गडद पावसाळी दिवसांत अंधारून येऊन पाऊस पडायला लागला की तिथली झाडं अक्षरशः झोडपून निघायची. क्वचित बाईही मग शिकवणं थांबवायच्या. अंधारल्या वर्गात बसून ढगांच्या गडगडाटात, डोळेभरुन ती गदगदणारी झाडं मग सगळे पाहत राहत. पण शाळा म्हटली की, प्राथमिक शाळेच्या जवळचं एक झाड आठवतं. त्याच्या अंगाखांद्यावर 'रम्य बाल्य ते जिथे खेळले' पासून त्या तरूतळी 'तसव्वुर-ए-जानाँ किये हुए' करत बसून राहण्यापर्यंतची सर्वांची प्रगती, तशी त्याच्याच जोडीने झाली. मित्राने एक अतिशय जुना फोटो पाठवल्यावर या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. यंदाच्या फेरीत हे झाड दिसलं नाही, पण त्याच्या नसण्याने काही विशेष वाटलंही नाही. जुनी इमारतच मोडकळीला आल्याने वर्गही नवीन जागेत भरू लागले होते. तेव्हापासून त्याचं प्रयोजनच संपलं असावं.

ग्रँटरोडच्या चिखलवाडीच्या चाळीत मात्र झाडांचं इतकं कौतुक करायला कुणाला सवड नसे. नाही म्हणायला नानाचौकाकडून चौपाटीकडे जाताना मणीभवनच्या गल्लीत हिरवीगच्च झाडे दिसत. त्या रस्त्याचे नावही रसिकतेने लॅबर्नम रोड, म्हणजे बहावा/अमलताश मार्ग ठेवलेलं. मागे जसं फोर्टमधल्या टॅमरिंड लेनचं 'मुदण्णा शेट्टी मार्ग'(!) म्हणून नामकरण झालं; तसंच लॅबर्नम हे कुण्या इंग्रजाचं नाव असल्याने (बापूंच्या वास्तव्याने पुनीत इ. झालेल्या) मणीभवनकडच्या त्या रस्त्याचं नावही बदलण्याचा घाट मुंबई महापालिकेने घातला होता. सुदैवाने तो बेत तेव्हा तडीस गेला नाही.

झाडांबद्दल लिहित असताना कोकणातल्या झाडांचा उल्लेख होणार नाही, हे अशक्यच. लेकुरवाळा फणस. काजूची बुटकबैंगण झाडं, करवंदीच्या जाळ्या, रातांबे नि जामाची झाडं. हापूस-पायरी-रायवळ-माणकुराद आंब्यांची कैक झाडं. आंबा पिकून जाळीत पडल्याचा आवाज आल्यावर, भावंडांबरोबर शर्यत लावायची आणि ज्याला प्रथम सापडेल त्याने तो खायचा. 'आठवणींच्या चिंचा गाभुळ' ऐकलं की चिंचांऐवजी, त्या आंब्यांचीच चव आठवते. फुलझाडांची तर गणतीच नाही. पण तळकोकणात काय किंवा गोव्यात काय; ज्याला व्यवच्छेदक म्हणावं असं झाड म्हणजे नारळाचं. हिरवं मोकळं खाचर आणि त्याच्या कडेला असलेली माडाची झाडं काय सुरेख दिसतात. पाच-सहा झाडांतलं एक उगाच तिरपं, जमिनीशी अधिक सलगी साधत वाढलेलं असतं. एखाद्या फॅमिली फोटोसाठी प्रौढ मंडळी गंभीरपणे उभी आहेत, आणि मध्येच एखादा गोटू गंमतीने जरा वाकड्याच पोझमध्ये उभा राहला आहे, असं ते पाहून वाटत राहतं. मंगेशी-शांतादुर्गेच्या देवळाबाहेरच्या तळ्यांवर हिरवी सावली धरणारे माड मात्र तसे गंभीर. अर्थात, हे झाड खरे पहावे ते किनार्‍याजवळ. माडांशिवाय कुठल्याही किनार्‍याला शोभा नाही, हे पुलंचं मत इकडचे भुंडे किनारे पाहिले की पटतं. रेड्डीच्या महागणपतीकडे जाणारा रस्ता सुंदर आहेच, पण तितकाच देवळापाठचा किनाराही. लाल माती, हिरवी झाडी आणि समोरची निळाई.

Reddy

...

इथल्या प्रवासांत वेगवेगळी झाडं पहायला मिळाली. आधी अनोळखी, अपरिचित वाटणारी. हळूहळू सवयीने मग थोडीफार ओळखीची झालेली. शिकागोला दोन वर्षांपूर्वी भर थँक्सगिव्हिंगच्या (नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा) गेलो होतो. तपमान शून्याच्या बरंच खाली. नुकताच बर्फ पडून गेलेला. भणाणत्या वार्‍यामुळे आणि अपुरे गरम कपडे आणल्याने गोठलेला मी. अशा वेळी चालताना एक वळण घेतलं, आणि अनपेक्षितपणे दिव्यांनी मढवलेली निष्पर्ण तरुंची राई समोर आली.

Sears tower Snow-fall 050

पुढे कधीतरी जेव्हा पु. शि. रेग्यांची 'गंधरेखा' वाचली, तेव्हा - एक आहे झाड माझे, रांठ ज्याच्या जीर्ण शाखा; साठीषण्मासी परंतु लाख ज्या येती शलाका - या ओळीवर अडखळून हीच झाडं पुन्हा डोळ्यासमोर उभी राहिली.

एक आहे झाड माझें रांठ ज्याच्या जीर्ण शाखा;
साठिषण्मासीं परंतु लाख येती ज्या शलाका

झाड माझें लाल ज्याला आग्रहाची लाख पानें;
आणि माझी बंडखोरी घोषतों मी गात गाणें.

झाड माझें लाखमोली लाल ज्याला फक्त पानें,
नेणतां ये एक ज्याला शुभ्र कांही जीवघेणें.

एक, ज्याला जाणिवेच्या लांच्छनाच्या गंधरेखा;
पाहतों मी ज्यात माझें झाड, माझ्या आणभाका


ग्रेसच्या बर्‍याच कवितांसारखाच या कवितेचा अर्थ बिनचूकपणे सांगणे अशक्य आहे. पण हट्टाने बंड करुन, जगाशी सारे संबंध तोडून आपल्या कोशात राहिलेल्या - वेळोवेळी ती आग्रही लाल पानांची तुसडेपणाकडे झुकणारी बंडखोरी मिरवणार्‍या; एखाद्या वठलेल्या खोडासारख्या माणसाला काही कारणाने, अवचितपणे 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले' सारखी पालवी फुटावी (नेणतां ये एक ज्याला शुभ्र काही जीवघेणें) आणि ती हवीहवीशी वाटली तरी इतक्या वर्षांच्या सवयीने त्या गंधरेखेबद्दल थोडी शरम वाटावी, असं काहीसं. थोडक्यात 'ऍज गुड ऍज इट गेट्स' मधली जॅक निकल्सनची तुसड्या, विक्षिप्त लेखकाची ऑस्करविजेती भूमिका. झाडांवर झालेल्या मानव्याच्या आरोपाबद्दल (चेतनागुणोक्ती अलंकार) पुढे लिहीनच, पण 'पाहतों मी ज्यात माझें', असं हे रेग्यांचं झाड त्याचं उत्तम उदाहरण ठरावं.

...

शिकागोतल्या या झाडांसारखी इतर अनेक झाडं भटकंतीत सापडत गेली. स्मोकी माऊंटन नॅशनल पार्कमधलं वार्‍या-पावसात करकरणारं 'कराल' झाड. सॅन फ्रान्सिस्कोजवळचं प्रसिद्ध 'द लोन सायप्रस' आणि त्याच्या शेजारी दुर्लक्षलेलं 'देहा फुटले वारा फांटे, अंगावरचे पिकले कांटे, आभाळांत खुपसून बोटें' उभं असणारं 'घोस्ट ट्री'. ब्राईस कॅन्यनमध्ये 'खडकावरील अंकुरा'सारखं उगवून आलेलं एकुलतं एक झाड. रेडवूडमधली गाढ हिरवी शांतता, सिकोयामधले प्रचंड घेराचे प्राचीन वृक्ष. 'शिशिरऋतुच्या पुनरागमे, एकेक पान गळावयां' होण्यापूर्वी बॉस्टनजवळ झाडांवर पाहिलेला रंगांचा उत्सव. स्वप्नात केलेला प्रवास वाटावा, अशा कोलोरॅडोतल्या एका रेल्वेप्रवासात दोन्हीकडे पिवळ्या-लाल रंगांच्या पानांच्या झाडांनी भरून गेलेले डोंगर. पेट्रिफाईड नॅशनल फोरेस्टमधली 'माझ्या मना बन दगड' म्हणून चक्क दगड बनलेली झाडं. प्रत्येकाची तर्‍हा वेगळी.

पण या सर्वांत विलक्षण असेल तर ते आर्चेस नॅशनल पार्कमध्ये पाहिलेलं एक झाड. यूटाहमधल्या या अप्रतिम राष्ट्रीय उद्यानात 'फिएरी फर्नेस' म्हणून एक रेंजर-गायडेड, अर्थात उद्यान अधिकार्‍याच्या नेतृत्वाखालीच होणारा ट्रेक आहे. त्या ट्रेकदरम्यान रेंजरने एक झाड दाखवलं होतं. काही वर्षांपूर्वी त्याच्या खोडाच्या मध्यावर वीज पडून त्याच्या जळून जवळपास चिरफळ्या उडाल्या होत्या. पण जगण्याची इच्छा इतकी चिवट असते, की मृतप्राय झालेल्या त्या खोडालाही पुन्हा पालवी फुटली.

Day 6 Arches 1 054

एकाच या जन्मी, फिरुनि नवे जन्मलेल्या; पोटात वीज थिजवून उभ्या असलेल्या, जागेपण गिळून उभे असेपर्यंत वाढणार्‍या ह्या गूढ, जायबंदी झाडाला बोरकरांची ही कविताच न्याय देऊ शकते.

झाड गूढ झाड गूढ, ओल्या प्रकाशाची चूड
गार गार पारा गाळी, स्वप्नरंगांचे गारुड

झाड पाताळ फोडिते, झाड आकाश वेढिते
ताळमूळ संसाराचे गाठीगाठीत जोडिते

झाड वाकडे-तिकडे, छेडी फांद्यांची लाकडे
वीज थिजवून पोटी, वारी मेघांचे साकडे

झाड स्वच्छंदी आनंदी, सुखे होय जायबंदी
घावाघावातून गाळी, फुले ज्वा़ळांची जास्वंदी

झाड माझे वेडेपिसे, उन्हीं जळताना हसे
रुसे धो धो पावसात, चांदण्यात मुसमुसे

वेडे झोपेत चालते, अर्ध्या स्वप्नांत बोलते
गिळोनिया जागेपण, उभे आहे तो वाढते


...

(अखेरचा भाग या गुरूवारी)

8 comments:

Ajit said...

बाकी 'binary tree' किंवा 'clock tree' सारख्या रुक्ष (कदाचित नाहीसुद्धा!) झाडांच्या सान्निध्यात खूप वेळ राहिल्यानंतर हा लेख आणखीनच आवडला :)

कुणीतरी म्हणून गेलंय: I have never heard a poetry, which is as beautiful as a tree.

असो. नेहमीसारखाच उच्चप्रतीचा लेख!

विशाल said...

सहीच!
खूप दिवसांनी तुझ्या प्रतिभेला साजेशी पोस्ट वाचायला मिळाली.
झाडांची छायाचित्रेही सुरेख!
पुढच्या भागाची उत्सुकतेनं वाट पाहात आहे.

Raj said...

बर्‍याच दिवसांनी काहीतरी सुंदर आणि वेगळं वाचायला मिळालं. मागे गुलजारच्या एका मुलाखतीत नॉस्टाल्जियाबद्दल बोलताना गावातले पिंपळाचे झाड आणि त्याच्या छायेत टाकलेली खाट (चारपाई) यांचा उल्लेख आला होता. झाड हा विषय इतका जिव्हाळ्याचा आणि परिचयाचा की पोस्ट एकदम आतमध्ये घुसलं. झाडांची चित्रे आणि वेगवेगळ्या तर्‍हाही खासच.
इथे फरहत शहजाद आठवतो
कोंपले फिर फूट आई, शाख पर कहना उसे
वो न समझा है, न समझेगा, मगर कहना उसे
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

प्रशांत said...

बर्‍याच दिवसांनी "बरेच काही उगवून आलेले" पाहून आनंद झाला. वाचून झाल्यावर वनराईत भटकंती करून आल्यासारखं वाटलं.
दुसर्‍या भागाची वाट पाहतोय.

Nandan said...

धन्यवाद, मित्रांनो :). पुढचा (थोडा रुक्ष) भाग उद्या लिहितो.

Kshipra said...

waiting for part 2

प्रशांत said...
This post has been removed by the author.
Amruta said...

Apratim :) !!!