बरेच दिवस एकंदरीत कविता, स्फुट लेख इत्यादींच्या उचलेगिरीवर लिहायचं म्हणत होतो. आज मराठी अनुदिनींवर चाललेल्या उचलेगिरीवर ट्युलिप आणि संगीता यांनी लिहिलेलं वाचून त्याला मुहूर्त लागला.
मलाही आधी असे एक-दोन अनुभव आलेत. 'मी सखाराम गटणे' सारखा पटकन लक्षात येणारा नवीन लेख असो किंवा 'दोन याचक' सारखी लगेच न कळणारी छोटीशी , अडीच वर्षांपूर्वी लिहिलेल्या माझ्या पोस्टवरून केलेली उचलेगिरी असो -- दोन्हींच्या मागे, डोळे मिटून दूध पिणार्या मांजराला आपली चोरी कोणी पाहत नाही असं वाटत असतं, तशीच मनोवृत्ती असते.
दुर्दैवाने हे फक्त अनुदिनींवरच होत नाही, तर क्वचित मनोगतासारख्या व्यासपीठावरही होतं. उदाहरणार्थ अजितचं हे पोस्ट पहा आणि मनोगतावरचा हा लेख वाचा. कळस म्हणजे, हे निदर्शनाला आणून दिले असतानाही, तोंडदेखली माफी मागणे किंवा खोटंच का होईना - लेखकाचे नाव प्रसिद्ध करायचे राहून गेले अशी सारवासारव करणेही त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. तीच कथा गटणेचीही.
ओर्कुटबद्दल तर बोलायलाच नको. कित्येकांचे लेख, कविता मंडळी आपल्या नावाने प्रसिद्ध करत असतातच. पण अजून एक ढळढळीत उदाहरण म्हणजे 'मराठी साहित्य' या नावाच्या कम्युनिटीचे वर्णन वाचा. त्यात आणि मी माझ्या अनुदिनीबद्दल वर लिहिलेल्या दोन-तीन वाक्यांत जर काही साधर्म्य आढळले, तर तो योगायोग समजावा :). खरं सांगायचं तर, कॉपी करावं असं त्या वाक्यांत काही विशेष आहे, असं मला वाटत नाही. त्यामुळे हे बरंच आधी लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग मी निवडला. पण ज्या विषयाची तुम्हांला (तथाकथित) आवड आहे, त्याबद्दलच्या दोन ओळीही तुम्हांला उचलेगिरी करून लिहाव्याशा का वाटतात?
या गोष्टीला ट्युलिपने वाचा फोडलीच आहे, तर असे प्रकार टाळण्यासाठी काय करता येईल त्याचाही विचार व्हायला हवा.
Saturday, March 08, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

15 comments:
ही उचलेगिरी निंदनिय आहे. स्वतःच्या मनानी दोन ओळीही लिहीता येत नसतील तर ब्लॉग सुरू करायचा उपद्व्यापच का करावा माणसानी?
Please read
http://www.khapre.org/blog/marathi/2008/03/blog-post.aspx
Thanks
Vishal Khapre
:(
इतकी धडधडीत चोरी! त्या ’मराठी साहित्य’ कम्युनिटीवाल्याने तर चक्क ’मायबोली’चा लोगो जरा रंगरंगोटीकरून लावला होता काही वर्षांपूर्वी. कॉपीराईट्स विषयी सांगितलं तर म्हणे ’तुम्हाला काय करायचंय?’
This is so sick! :-(
aapalya chotya doncha lekh pan paha
http://anandkshan.blogspot.com/2008_03_02_archive.html
mipa cha ullekh asala tari, chotya don chya naavacha ullekh asane garajeche hote.
नंदन, उचलेगिरीवरचा हा लेख अजिबात आवडला नाही. कारण मान्यवर लेखकांनी देखील इतर मान्यवर लेखकांच्या कविता वा त्यांचे उतारे आपल्या लेखनात वापरलेले आहे. मुळ साहित्यकाचे नाव न लिहिता! तुम्हाला हे माहितीच असेल.
उदाहरण, एकेक पान गळावयामधे गौरी देशपांडे ह्यांनी मर्ढेकरांच्या कवितेने त्या कादंबरीचा शेवट केला आहे.
प्रिय जी. ऐ. कुलकर्णी ह्यांच्या पुस्तकांची नावे बालकवींच्या कवितेवरून ठरलेली आहेत.
असे कितीतरी उदाहरणं देता येतील. सगळ्याच भाषेतील साहित्याला हा प्रकार लागू पडतो. जी व्यक्ती खूप वाचन करते ती तिचे लेखन करताना अनावधनाने इतरांचे विचार लिहून काढते. भले शब्द वेगळे असतील वाक्य वेगळे असतील पण तीही एक चोरीच म्हणावी लागेल मग. पण मला मात्र ती चोरी वाटत नाही.
मी मायबोलिवरील बी लिहित आहे. माझे इथले खाते सध्या काम करत नाही आहे म्हणून अनॉनीमस ह्या नावानी लिहित आहे.
बी - आपल्या मोकळ्या प्रतिक्रियेबद्दल आभार. तुम्ही दिलेली उदाहरणं त्यांच्या जागी बरोबर आहेत, पण त्यांच्यात आणि सरळसरळ उचलेगिरीत फरक आहे, असं मला वाटतं.
’एकेक पान गळावया’ चा शेवट जरी मर्ढेकरांच्या कवितेने होत असला, तरी ती कविता गौरी देशपांडेंनी लिहिली असल्याचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष दावा त्यात कुठेच नाही. पुस्तकाची नायिका राधा आपल्या हातात कवितांचा संग्रह घेऊन त्यातली कविता वाचते असा तो प्रसंग आहे. पूर्ण कविता देण्याने त्या कवितेमागचे, शीर्षकामागचे संदर्भ अधिक चांगले कळावेत हा हेतू असावा. जी. एं. च्याही केवळ तीनच पुस्तकांची नावे बालकवींच्या कवितांतील शब्दांवरून घेतली आहेत - निळासावळा, पारवा आणि हिरवे रावे. यात काही उचलेगिरी आहे असे मला वाटत नाही, काही असलंच तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यांची बहुश्रुतता.
यात आणि सध्याच्या चर्चेत ज्यावर आक्षेप घेतला जातोय त्यातला फरक चित्तरंजन भटांच्या या प्रतिक्रियेतून स्पष्ट व्हावा --
"मी उपजीविकेसाठी बौद्धिक संपदा ह्या क्षेत्रात करतो. त्यात उचलेगिरीची (Plagiarism) व्याख्या अशी दिली आहे- कल्पना शब्दशः, जशीच्या तशी, उचलून त्यात स्वतःच्या प्रतिभेची कुठलीही गुंतवणूक न करता 'चक्क' कॉपी करणे म्हणजे उचलेगिरी. गालिबनेही शिराजी आणि इतर कवींकडून प्रेरणा घेतल्याचे म्हटले जाते. पण त्याच्या 'त्या' ओळी वाचल्यावर त्यात गालिबने स्वतःच्या प्रतिभा, कल्पनाशक्तीदेखील चांगलीच गुंतविली आहे, हे लक्षात येते आणि दाद द्यावीच लागेत. शेक्सपिअरनेही हॅम्लेट नाटकाची कल्पना, प्रेरणा आधीच्या एका नाटकापासून घेतली म्हणून शेक्सपिअर उचलेगीर ठरत नाही आणि म्हणून आधीचे ते नाटकही अजरामर ठरत नाही. असो. शेवटी, आपण सर्व व्यासांचेच उष्टे खातो, असे म्हणतात. 'ओरिजिनल' कल्पना तशा अगदीअगदी दुर्मीळच." [दुवा - http://www.marathigazal.com/node/302]
गदिमांनी सूरदासांच्या अनेक मध्यवर्ती कल्पना घेऊन ’जगाच्या पाठीवर’ मध्ये त्यांना चढवलेलं मराठी रुपडं, पुलंची अजिबात परकीय न वाटणारी ’ती फुलराणी’,
हृदयनाथांनी ’हो हो शपाही डोगरा’ या पहाडी गाण्यावरुन प्रेरणा घेऊन तयार केलेलं ’जांभूळपिकल्या झाडाखाली’ काय किंवा तुम्ही दिलेली उदाहरणं काय -- त्या सार्यांत त्यांच्या स्वत:च्या प्रतिभेची गुंतवणूक स्पष्ट दिसतेच आणि त्यांनी ती प्रेरणास्थानं असल्याचं मान्यही केलंय. इथे मुद्दा आहे तो अन्नू मलिक टाईप, अजिबात बदल न करता जशीच्या तशी, शब्दश: कॉपी करुन आपल्या नावावर लेख/कविता खपवण्याचा.
ट्युलिपच्या ब्लॉगवर हा मुद्दा चर्चेत आला आहेच. तिने म्हटल्याप्रमाणे आवडलेलं वाक्य किंवा शैलीचा प्रभाव असणे निराळे आणि सरळ कॉपी-पेस्ट करणे निराळे. तुम्ही दिलेल्या उदाहरणांत फक्त शब्द/वाक्ये वेगळी असण्याचा मुद्दा मांडला आहे. पण त्याशिवायही गौरीच्या किंवा जी. एं.च्या पुस्तकांत कितीतरी आहे, जे त्यांचं स्वत:चं आहे. शिवाय जेथून त्यांनी प्रेरणा घेतली आहे, त्याचा स्वच्छ ऋणनिर्देश केलेला आहे.
हे उदाहरण फारच बाळबोध वाटेल कदाचित. पण सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. पुस्तकं किंवा अगदी नवनीतचं गाईड वाचून परीक्षेत उत्तरं लिहिणारा विद्यार्थी आणि खिशांत फाडलेली पानं लपवून, कोणी आपल्याला पाहत नाही असं समजून त्यांतून उत्तरे जशीच्या तशी उतरवून काढणारा विद्यार्थी यांत जो फरक आहे, तोच या दोन उदाहरणांत आहे, असं मला वाटतं.
संगीता, विशाल, प्रिया, प्रसाद -- तुमच्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.
नंदन, उत्तर खूप सुरेख दिलं. तुमचा अभ्यास चांगला आहे.
माझं उत्तर असं आहे की, जोवर आपले साहित्य कुणी दुसरा लेखक त्याच्या नावावर प्रकाशित करून त्यापासून आर्थिक लाभ उचलत नाही तोवर आपल्या साहित्याची चोरी झाली असे म्हणणे योग्य नाही. मुळ लेखकाला वाईट वाटणं, त्याला राग येणं, त्याचं निराश होणं.. हे स्वाभाविक आहे. पण मुळ लेखकाने समंजस व्हावं असे मला वाटतं. सत्य हे कधीतरी प्रकाशात येतेच. असो..
- बी
फारसं काही जास्त लिहित नाही. विंदांच्या ओळी लिहितो (संदर्भ अर्थात मूळ ओळींहून फारच वेगळा!) ---
"चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे,
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे"
आणि पुढे--
आशा तरी निराशा, हें श्रेय सावधांचे,
बेसावधास कैसे डसणार हे निखारे."
"खिसेकापूंपासून सावध रहा" असा इशारा ब्लॉगरवर यापुढे दिसला तर नवल नको :-)
@ बी -- भा. पो. :). आर्थिक बाबतीतला मुद्दा शैलेशने मांडला आहेच (गूगल ऍड-सेन्स वगैरे), पण तो ताणण्यात काहीच हशील नाही.
@ अजित - :D
Hello. This post is likeable, and your blog is very interesting, congratulations :-). I will add in my blogroll =). If possible gives a last there on my blog, it is about the OLED, I hope you enjoy. The address is http://oled-brasil.blogspot.com. A hug.
तू का लिहितोस? कुणीतरी तुला खो देईल म्हणून वाट पाहिली पाहिली आणि अखेर लिहिलं.
mala vatat yaamdhye ethics cha phar motha bhaag aahe. aapalya shala-college madhun ya sagalya baddal ajibat mahiti dili jaat nahi. mi ithe US madhye Master's karato aahe, pratyek school chya site var mi kuthalya hi prakarachi vangmayeen chori karanar nahi asha prakarachi pratidnya asate, aani ti tumhala ghyavi lagate. ti pratidnya ghetali nahi tar tumhala sarakhi aathavan karun dili jate ki tumhi pratidnya ghetali naheeye. aani jari kuanachya likhanateel kahi bhag uchalala tari tyasathi sandarbh ha dila gelach pahije ashi kadak shist kahihi lihitana aavashyak aahe. pan tyatahi maja aahe, aajachya Maharashtra times madhye lalita pawar yachyavar ek lekh aahe. to marathitaraka dot com yethun jasachya tasa prasidha kela aahe. aata jari lekhakane tyancha sandarbh dila asala tari asha prakarachi jashi-chya tashi uchalegiri sarras chalate.
उचलेगिरी (Plagiarism) हे सर्व चित्रपटांतून सर्रास चालू असताना इथेही त्याचा अनुभव येणे काही अगदीच अनपेक्षीत नाही. जवळपास सर्व हिंदी चित्रपट कुठल्या न कुठल्यातरी इंग्रजी चित्रपटावरून उचललेले असतात. काही नुसत्या संकल्पना (उदा. रंग दे बसंती) काही संकल्पना, पटकथा (उदा. बिच्छू, दिवानगी) आणि काही तर अगदी फ़्रेम तू फ़्रेम कोपी. (उद. आमिताभ, राणी चा Black). आता कविता लिहीणार्यांनी आपापल्या लेखनात तुका म्हणे, नामा म्हणे सरखे आपल्या नावाचे प्रयोजन करावे हेच उत्तम!
तुला खो दिलाय...
"मिपा'वर आपण दिलेल्या एका comment मुळे तुमच्या अनुदिनीचा पत्ता सापडला. तुमच्या अनुदिनीबद्दल एक मराठी साहित्याचा रसिक म्हणून कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या अनुदिनीसाठी शुभेच्छा.
Post a Comment