रोहिणीचं पत्र होतं. मैथिलीला आश्चर्यच वाटलं. इतक्या वर्षांत काही पत्रव्यवहार नाही, जाणं-येणं नाही, फोन नाही, तरी काही माणसं आत रुतून बसलेली असतात. एक छोटंसं पत्र आणि चेक - तिनं कधीकाळी दिलेल्या पैशांचा. रोहिणीनं ते परत केलं होतं. तिचा नवरा आता नव्हता.
'...तू एका वेळी, फार महत्त्वाच्या वेळी दिलेले हे पैसे. स्वतः अडचण सोसून दिलेले! त्या वेळी ते ज्यांनी ज्यांनी दिले त्यांतला एकेक रुपयासुद्धा मला मोलाचा होता. त्यामुळं सतीश पंधरा वर्षं जगला. चांगलं जगू शकला. ती मिळालेली सगळी वर्षंही महत्त्वाची होती. मुलांची शिक्षणं झाली. ती मार्गाला लागली. घराचे हप्ते फिटले. आता या वयात त्याची सोबत हवी होती. काही करायचं असं अटीतटीचं उरलेलं नाही, अशा वेळी असणारी सोबत - एकमेकांची एकमेकांकरता. सगळे दिवस धावपळ करण्यात गेले. जगलो कुठे! आता जरा निवान्तपणा येईल म्हणत असताना तो गेला अचानक. खूप शांत असा त्याचा मृत्यू! मी ऑफिसमधून आले. तोही नुकताच आला होता. मुलंही आता आमच्याजवळ नसतात. म्हणाला, "रात्री बाहेरच कुठं जेवू. पुष्कळ दिवसांत गेलो नाही. उद्या रविवारच आहे. घाई नाही." मग मिळून चहा घेतला. मी कप सिंकमध्ये ठेवायला गेले आणि परत आले तो सतीश नव्हता. पुष्कळ दिवस वाटत राहिलं, की अजून थोडी वर्षं मिळायला हवी होती. पण मग वाटलं, की असं वाटून घेताना जी वर्षं मिळाली ती शून्य होतात. मग विवेक केला, स्वतःला समजाव्ता आलं. सगळ्यांचे पैसे दिले परत. तुझेच कसे कोण जाणे राहून गेले, ते आता करते. ते परत करताना या वेळी ते आपण परत करू शकतो याचा सुद्धा अभिमान, आनंद नाही. तुलाही या पैशांची गरज नाही आता. तरी ते परत केले नाहीत तर त्या सगळ्या गोष्टींची किंमत कमी होईल असं वाटतं. म्हणून...'
पत्र एकदोनदा वाचलं. डॉ. भारद्वाजांनी शाकुंतल शिकवलं त्या वेळी अभिज्ञानशाकुंतलमधल्या 'अभिज्ञान'चा अर्थ शेवटी छान सांगितला. म्हणाले, "कुठल्याही श्रेष्ठ कलाकृतीचं शीर्षक हे काही त्या कलाकृतीचं नुसतं नाव म्हणून दिलेलं नसतं. तो अर्थ त्या कलाकृतीच्या श्वासामधून वाहत जात शेवटी प्रतीतच होतो. आपल्या पुढ्यात येऊनच उभा राहतो. अभिज्ञान म्हणजे हे असं प्रतीतीनं भिनत गेलेलं ज्ञान, वेगळी जाणीव. कशाची? आयुष्यातल्या पूर्वार्धातला प्रणयाचा बहर निघून गेलेला, विरहाचे, कसोटीचे, चुकांचे, संघर्षाचे, तपस्येचे दिवसही सरत आलेले. त्या वेळी शेवटी दोघे एकत्र येतात - दोघांतले खळाळते, उसळते आवेगाचे लोट शांत होत आलेले. आयुष्याची कडवट चव आता ओठांवर रेंगाळत नाही. पुत्राला पित्याच्या हाती सुपूर्त करून द्यायचं. भारताचा उद्याचा चक्रवर्ती सम्राट म्हणून आजवर संस्कार केले, त्यात स्वतःचं आईपणही कुठं होतं! उद्याच्या सम्राटाची माता नुसती आई थोडीच असते! प्रेयसी, पत्नी, माता या सगळ्या मुशीतून शिल्लक राहिलेली ती तपस्विनी - अधिक सतेज! तिच्याकडे बघताना, आयुष्याचा मध्य सरून गेल्यावर तिच्याजवळ पोचताना दुष्यंताला आणि शकुंतलेला एकमेकांमधल्या या वेगळ्या सखोल नात्याची जाणीव होते...हीच ती ओळखीची खूण...परस्परांमधली आणि आपली स्वतःचीही."
कुठं शाकुंतल..डॉ. भारद्वाजांनी दाखवून दिलेला त्यातला अर्थ! कुठं रोहिणीचं पत्र! ती नुसती बसून राहिली. घरी कुणी नव्हतं. संध्याकाळ होत होती. मावळतीचा सूर्य समुद्रात कुणी आतूनच मंद दिवे लावावे असा -- तसे हे सगळे अर्थही -- एकएकटे...एकत्रही...
...
कादंबरी - भूमी
लेखिका - आशा बगे
...
याच पोस्टमध्ये 'जे जे उत्तम...' मधले इतर अनुदिनींवरील लेख संकलित करून एकाच ठिकाणी द्यायचा विचार होता. तो तूर्तास पुढच्या पोस्टपर्यंत ढकलतो :)
Sunday, January 06, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

14 comments:
वा! किती दिवसांनी आशा बगेंची आथवण झाली :)
संकलन करायला तुला लवकर वेळ मिळो, म्हणजे अजून बर्याच आठवणींना उजाळा मिळेल!
Happy New Year!
अभिनंदन आजच्या "मराठी बॉग विश्व", चतुरंग , लोकसत्ता मधे आपल्या बॉग बद्द्ल फार चांगले लिहुन आले आहे.
http://www.loksatta.com/
came to this blog through Loksatta
सुमेधा, हरेकृष्णाजी आणि हॅरी पॉटर - आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. हा उतारा येथे द्यायचे कारण म्हणजे, 'अभिज्ञानशाकुंतलम्'चा या उताऱ्यात दिलेला वेगळा अर्थ. एरवी ढोबळ अर्थ म्हणजे, दुष्यंताने शकुंतलेला ओळखीची खूण म्हणून स्वतःची अंगठी दिलेली असते. दुर्वासाच्या शापाने तो स्वतःच तिची ओळख विसरतो. त्यामुळे ती अंगठीच त्यांच्यातला दुवा बनते. पण, नेमकी ती हरवते. ती परत सापडल्यावर त्याला शकुंतला पुन्हा आठवते. ही पुन्हा झालेली ओळख, म्हणजेच 'अभि-ज्ञान'. ह्या अर्थाबरोबरच एक वेगळा लाक्षणिक अर्थ या उताऱ्यात उलगडून दाखवला असल्याने तो विशेष आवडला.
utaaraa surekh aahe, asech ajun vaachaayalaa aavadel..
Loksattaa t tumachyaa blogbaddalvaachale .. abhinandan..!!!
धन्यवाद लोपामुद्रा, अजून असे उतारे नक्कीच येथे देण्याचा प्रयत्न करेन.
छान उतारा निवडला आहेस रे, आणि ’जे जे उत्तम’ चे एकत्रित संकलन करण्याची कल्पनाही छान आहे - एकत्र संग्रह होईल कायमस्वरूपी!
खुप छान आहे
खुप छान आहे
Bhoomi is a really beautiful novel which won Sahitya Academy award. Sadly, last year most people were discussing Naticharami and Baaki shoonya. This is the first reference to Bhoomi I've come across in the blog world.
छान!
आशा बगेंच "धर्मक्षेत्रे-कुरुक्षेत्रे" म्हणुनहि एक पुस्तक आहे. महाभारताशी संबधित आहे.
सुंदर लिहितात त्या.
नंदन,
आपण वरच्या एका comment मध्ये जी माहिती दिलिये "दुष्यंत-शकुंतला-दुर्वास" यांच्या संबधी ती बर्याच जणांना तशीच माहित आहे.
खरी गोष्ट वेगळीच आहे.
भरत या दुष्यंताचा मुलगा नव्हे. कारण दुष्यंत-शकुंतला यांच्या संबधांनंतर ३ वर्षांनी त्याचा जन्म झाला असे महाभारत सांगते.
दुष्यंत शकुंतलेच्या कथेत दुष्यंताने शकुंतलेकडे शरीरसंगाची मागणी केली आहे म्हणजे गांधर्वविवाह होता, शिवाय नाहि म्हणालिस तर आम्हाला "राक्षसविवाह" निषिद्ध नाहि असेहि तिला म्हणतोय. मात्र शकुंतला त्याला अट घालते जर या संबधातुन मुल जन्माला अलेच तर ते तुझे वारसदार असेल. मात्र "३" वर्षांनी भर दरबारात ती एक तान्हे मुल घेऊन येते, आणि म्हणुनच ते आपले मुल असल्या बद्दल दुष्यंत नकार देतो. त्याला विसर वगैरे पडलेला नव्हता. नंतर मात्र त्या मुलाचा तो स्विकार करतो. कदाचित "कानिनपुत्र अथवा नियोगाने" झालेली संतती त्यावेळी समाज मान्य करत होता.
बाकि उद्देश काहि नाहि, योग्य ती माहिती आपणांस द्याविशी वाटली म्हणुन हा प्रपंच.
Good
खुप छान आहे
http://marathiscraps123.blogspot.com/
Post a Comment