काही फायदा होतो म्हणून वाचन करु नये, हे जरी खरं असलं तरी त्यातून वेगवेगळे अनुभव आपण लेखकाच्या दृष्टीतून घेऊ शकतो. नाहीतर एका आयुष्यात असे घेऊन घेऊन अनुभव तरी किती घेणार? बसल्याजागी वेगवेगळे अनुभव - व्हिकॅरियसली म्हणजे दुसऱ्याच्या उसन्या दृष्टीतून का होईना, आपण पुस्तकाच्या वाचनातून घेऊ शकतो. 'का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटिता', असं कमलिनीबद्दल ज्ञानेश्वरीत म्हटलंय तसंच काहीसं.
अर्थात कुणाला कुठला अनुभव, कुठला विचार आवडेल हे सांगणं अवघड. त्या त्या व्यक्तीच्या पिंडावरती ते अवलंबून. कोसला काय किंवा द फाऊंटनहेड काय -- केवळ ती पुस्तकं ग्रेट आहेत यापेक्षा 'तुम्हांला' ती किती आवडतात हे महत्त्वाचं. केवळ गाजलेलं पुस्तक आहे म्हणून ते न आवडताच डोक्यावर घेऊ नये (उदा. शतकात सर्वश्रेष्ठ गणली गेलेली युलिसीस) किंवा जे बहुसंख्यांना आवडतं त्याला केवळ त्याच कारणाने हट्टाने नावं ठेवण्याचा अट्टाहासही करु नये.
कविता आणि त्यांचा अर्थ, त्या आवडणं म्हणजे अजून एक पुढची पायरी. ग्रेसच्या सगळ्याच कविता कुठे कळतात? त्यांच्या ओळी हा एक वैयक्तिक अनुभव असतो. प्रत्येकाच्या मनात ती कविता वाचून तयार होणाऱ्या स्पष्ट - अस्पष्ट प्रतिमा वेगवेगळ्या, ज्याच्या-त्याच्या पिंडावर आणि आजवर घेतलेल्या अनुभवांवर बेतलेल्या. दहा हजार कवींना वेगवेगळ्या दिसणाऱ्या चंद्राप्रमाणे निरनिराळ्या असल्या तरी शेवटी प्रत्येकाचा 'जस्ट वन' असलेला चंद्र असतो, तशा खासगी. अगदीच ढोबळ उदाहरण म्हणून, मर्ढेकरांची 'या गंगेमधि गगन वितळले' वाचून मला हटकून बाणगंगेचा तलाव आठवतो. कुणाला थेट गंगा नदी आठवेल, कुणाला कविताच आवडणार नाही.
अजून स्पष्टीकरण हवं असेल, तर सलील वाघच्या कवितेवरील अभिजितची ही प्रतिक्रिया वाचा.
शिवाय कुणाला कशाचं दु:ख होईल हे कसं सांगावं?
दु:खही होईल कि नाही हे ही?
कवितेचं तसंच काहीतरी.
अगदीच पान उघडलं, दिसली, वाचली, लिहिली - एवढं सोपं फक्त नव्हतं ते.
यातल्या प्रत्येक क्रियेत वेगवेगळे संदर्भ येत गेले.
त्याचे वेगवेगळे अर्थ लागत गेले.
वर चार परिच्छेद खर्ची घालून जे लिहिलंय, तेच त्याने चार ओळींत मांडलंय.
शिवाय ही अनुभव ग्रहण करण्याची प्रत्येकाची पार्श्वभूमी काळाप्रमाणे बदलत जाते, हा भाग वेगळाच. आजचे नवीन अनुभव मग आपल्या पिंडाचा भाग बनतात. त्यामुळे आज एखादं पुस्तक/कविता आपल्याला जशी आवडली तशीच्या तशीच ती आपल्याला दहा वर्षांनी आवडणार नाही. जर आपल्याच आवडीत एवढा फरक पडू शकतो, तर दोन व्यक्तींच्या आवडी जुळणं हे अधिक कठीण.
पण असं असलं, तरी याचंही एक उलट टोक आहे. अनुभव जसे वैयक्तिक असतात, तसेच वैश्विकही असतात. वाचनातून आपण लेखक/कवीचे अनुभव व्हिकॅरियसली जगायचा प्रयत्न करतो, पण त्याचवेळी आपल्या पूर्वसंचितातल्या अनुभवाशी सांगड घालायचाही कुठेतरी नकळत प्रयत्न करत असतो. आपण कधीच न घेतलेले अनुभव (उदा. रारंगढांग) जसे आपल्याला आवडू शकतात, तसेच त्याच्या उलट जिथे जिथे आपली 'येथीचा जिव्हाळा तेथे बिंबे' सारखी स्थिती होऊन ज्या अनुभवांशी आपण आयडेंटिफाय करु शकतो तेही बेहद्द आवडतात.
लंपन आवडण्यामागे मग प्रकाश नारायण संतांची शब्दकळा, कथेची बांधणी, सूक्ष्म निरीक्षणशक्ती किंवा एका शब्दात सांगायचं झालं तर प्रतिभा/लेखनकौशल्य हे सारं असलं, तरी ही पुस्तकं वाचत असताना मी त्या वयाचा असताना असाच मॅडसारखा विचार करायचो असं वाचताना सतत वाटत राहतं आणि लंपनशी कुठेतरी धागा जुळतो; हेही एक महत्त्वाचं कारण असावं.
लंपनची पुस्तके असू देत किंवा थोड्या मोठ्या वयातलं 'शाळा' किंवा पंचविशीतल्या क्वार्टर-लाईफ क्रायसिस मधला 'पांडुरंग सांगवीकर'; 'टू किल अ मॉकिंगबर्ड' मधली जीन लुईस असो वा अजितने लिहिल्याप्रमाणे जे. एम. कॉटझींच्या 'बॉयहूड' मधला मुलगा -- कुठेतरी आपली ओळख पटते आणि ते पुस्तक आवडण्यामागचं एकमेव नसलं तरी महत्त्वाचं कारण बनून जातं.
फास्टर फेणे, गोट्या, हॅरी पॉटर इ. मध्ये आणि यासारख्या पुस्तकांत थोडा फरक आहे. पहिल्या गटातली पुस्तकं वाचताना मोठेपणीही हरवून जायला झालं, तरी 'पंखा' वाचताना बऱ्याचदा जी अंतरीची खूण पटते आणि क्वचित 'ते हि नो दिवसा: गता:' व्हायला होतं तसं वाटत नाही. जत्रेतल्या पाळण्यात बसून लहान मुलासारखा आनंद घेणं आणि खालीच थांबून पाळण्यातल्या हरखून गेलेल्या मुलांकडे पाहून त्यांच्या आनंदाशी, फार दिवसांनी भेटणाऱ्या जुन्या मित्रासारखी ओळख पटणं यात जो फरक किंवा साम्य आहे, तसंच काहीसं या दोन प्रकारच्या पुस्तकांत असावं असं मला वाटतं.
हे एवढं पाल्हाळ लावण्याचं कारण म्हणजे नुकतंच श्रीनिवास विनायक कुलकर्णींचं 'डोह' वाचनात आलं. वाचताना लंपनची ओळोओळी आठवण यावी असं. शांताबाई शेळक्यांनी लिहिलेल्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे बालपणीच्या निरागस वृत्तीने टिपलेले संस्कार व्यक्त करताना प्रौढ वयातल्या विश्लेषक जाणीवेचीही अधूनमधून जोड दिलेलं. त्यातल्याच 'आम्ही वानरांच्या फौजा' या कथेतला हा काही आवडलेला भाग --
...
पाऊस पडत असायचा. पाऊसच पाऊस... नेहमीचे कोवळे निळेशारपण मावळून आभाळ ढगाळले कधी, कळायचेही नाही. पावसाचे तिरपे पारदर्शक पाते एकसारखे फिरत राहायचे. पात्यामागे पाते -- आणि त्या पातळ तलम पात्यांच्या पदरापदरांचे पुन्हा एक पारदर्शक पाते...
आमच्या उघड्या पडवीच्या लाल कौलारओळींच्या थोडे अलीकडे आत आम्ही घरची सारी जणे ते कुतूहल डोकावून, न लवणाऱ्या डोळ्यांनी पाहत उभी असू. पाणी पाणी पापण्यांभरी पाहत... पाऊस कुठे कुठे पडत असेल, घाट कसा धुवून काळा लख्ख झाला असेल, वडाखालची तांबडमाती कशी सुवासत असेल, हे सारे मनात आणीत -- अंगणातून वाहत जाणाऱ्या पाण्यातून सोडलेल्या कागदी होड्या कुठल्या देशात वाहत जातील या तर्काच्या शिडाबरोबर हरवत...
पाऊसधारांचा गारवा शरीरात भरीत आम्ही चहाचे गरम गरम घुटके पडवीत उभ्याउभ्या घेत असू. कौलारओळींच्या शेवटाला घासून थोड्या वरून देशपांड्यांच्या भिंतीची रेषा खालती उतरत येत असे. त्या रेषेच्या उतारावरून एक अंगभर भिजलेली लेकुरवाळी वानरी, पोटाला घट्ट चिकटून राहिलेल्या पोरासह आमच्याकडे पाहत गहूगहू खालती सरकत असे.
ती बाई चिंब भिजलेली असे. छत्रीसारख्या डोक्यावरून पुढे आलेल्या तिच्या केसांची नोकदार झिपरी उसकटून गेलेली असे. तिच्या डोळ्यांच्या टिंबांत एक केविलवाणी इच्छा तेवे. ती खालती सरकायची आणि मग आई म्हणायची, "ये ग बाई, ये. भिजून गेली आहेस..."
एखादी भिजून आलेली बाई आत यावी तशी ती खुशाल आमच्या जवळ येऊन थांबे. सारे अंग हलवी; आणि भिजलेल्या पोराच्या केसातून पाणी निपटून काढी. मी तिचे अंग अंग जवळून पाही. तिचे काळे तोंड. नकटे नाक. तिच्या अंगावरली केसाळ लव. तिचे हात. तिच्या हातावरल्या रेषा... नि वाटे की, आजोबा आपला हात पाहतात, हिचाही त्यांना एकदा पाहायला सांगावे.
...
अगदी लहानपणापासून वानरासंबंधी मला काहीतरी निराळे वाटत असे. आईबरोबर जाताना कुठून तरी पुढे धप् दिशी उडी मारून तोंड विचकून गेलेले वानर मला आठवते. त्याच्या डोक्यावरल्या झिपरीमुळे ते छपराखाली राहिले आहे व त्या छपराला पाय फुटले आहेत असा माझा चमत्कारिक समज तेव्हा झाला होता. त्याचे लुकलुकते डोळे, त्याच्या शेपटाचा डौल माझ्या चांगल्या स्मरणात आहे. मला तो काहीतरी, अगदी गरीब, कपडे नसलेल्या माणसातलाच एक वेगळा प्रकार वाटे. ती गावातून कशासाठी तरी सतत धावत असतात. कुठेतरी काहीतरी त्यांचे मोठे काम निघालेसे भासे. थंडीच्या दिवसांत आजीबरोबर वडाखाली ऊन्ह खायला यावे तेव्हाही कितीतरी वानरे, पाराजवळ ओळीने उन्हाला पाठ देऊन बसलेली असत. आणि मनात येई, कुणाकुणाच्या मागे राहून गेलेल्या नुसत्या सावल्यांतच जीव भरला आहे नि त्यांची वानरे झाली आहेत.
पतझडीच्या दिवसातल्या एका निष्पर्ण झाडाच्या सांगाड्यावर एकदा इतकी निश्चल वानरे मी पाहिली होती की, ते एखाद्या विचित्र झाडाचे फळपीकच वाटावे.
...
आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कौलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्बेत पाही. नि मग ती सारी छिद्रे मला आढळायला आलेल्या असंख्य वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असे अतिशय वाटे.
लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचे विलक्षण कडे तेव्हा वाढता वाढता माझ्याभवती पडलेले होते...संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरत येई. घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार...अंधारावर अंधार...अंधार ही जशी दिवसाची कपऱ्याकपऱ्यातली झोप असे...दूरभर कुठे तरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक घास तोंडात भरवी. पानातच हळुवारपणे हात धुवी. आपल्याजवळच्या दुलईत गुरगटून घेई. अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी. प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही:
"बरं का, आपली आणि त्या मोठ्ठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते आहे...तो गोकुळात कृष्ण म्हणून आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो...तो रामराजा होता त्या वेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजांत होतो...
तुम्ही अवतरले गोकुळी, आम्ही गोपाळांच्या मेळी
तुम्ही होते रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा..."
Friday, October 19, 2007
Wednesday, October 03, 2007
पद्म
यापूर्वी दि. बा. मोकाशींच्या 'आता आमोद सुनासि आले' या कथेसंबंधी लिहिले होते. गुणवत्ता असूनही प्रसिद्धीचे, लोकप्रियतेचे जेवढे पडायला हवे तेवढे माप, दुर्दैवाने पदरात न पडलेले मोकाशींप्रमाणेच श्री. दा. पानवलकर हेही एक समर्थ कथालेखक. विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या अर्धसत्य या चित्रपटाची पटकथा ज्या 'सूर्य' या कथेवर बेतली आहे; तिचेच नाव पानवलकरांच्या एका कथासंग्रहाला दिले आहे. त्यातील 'पद्म' ही कथा नुकतीच वाचनात आली. वर उल्लेख केलेल्या मोकाशींच्या कथेच्याच तोलामोलाची.
...
जेमतेम पाच पानांची ही कथा. पहिल्यांदा वाचली तेव्हा जी.एं.च्या विलक्षण उपमांची आठवण करुन देणाऱ्या लेखनात आणि चित्रदर्शी वर्णनातच एवढं गुंतायला झालं, की शेवटच्या कलाटणीचे संदर्भ लक्षात यायला जरा वेळ लागला. पुन्हा एकदा कथा वाचली आणि मग त्यातली नुकतीच व्यालेल्या केळेची उपमा; मित्राच्या सायकलीने केलेला कानाडोळा; गावाची आठवण 'बुडवून' टाकण्याचा प्रयत्न करणारे डोंगर; (वयस्क) शेवाळाला पैलतीरी पोचवून कमळांच्या नाळी धुंडाळायला येणारा तो 'उलटा' झोका; परमेश्वराला साद घालत त्याच्यासारखाच 'तट'-स्थ बसलेला बूढ्ढा आणि तसाच निवांत निरीक्षण करणारा डोंगरावरचा नंदीबैल; पाठीवर शंख घेऊन लाळ खुरडत फिरणारी गोगलगाय; 'खोल पाणी दिसलं की खडा टाकावासा वाटतो' हे अगदी सहज येणारे वाक्य; धोक्याच्या जागी असलेली पण दाम मोजून सहज खुडता येणारी कमळं; फसवं 'फैला हुआ' झील, त्यातली चुकार कळी आणि निरुपायाने मधाचा कण सोडून परतावं लागणारा निळा किडा यांचं रुपक; सुरुवातीच्या प्रसन्न (चिंचेचा मोहर खावा तशी उन्हे खात) उपमांनंतर कथेच्या अखेरीस, कलाटणीच्या अगदी आधी येणाऱ्या अभद्रसूचक उपमा (सापासारख्या लोंबणाऱ्या नाळी, वासनेच्या ठिणगीसारखा किडा) -- या साऱ्या गोष्टींचा मग संदर्भ लागला. वाचून अंगावर काटा यावा पण कौशल्याला दाद द्यावी असे सारे एकत्र गुंफलेले.
उत्तम कथा लिहायला प्रतिभा सर्वात महत्त्वाची असली, तरी लेखनाच्या तंत्राकडेही लक्ष पुरवावे लागते. या दोन्ही गोष्टींचा इतका उत्तम मेळ, इतका सुरेख परिणाम आणि तोही कमी शब्दांत क्वचितच इतर कुठल्या कथेत साधला गेला असेल.

Monday, October 01, 2007
जे जे उत्तम...२ [सिंहासन/टॅगिंग]
(पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.)
...
मंत्र्यांच्या खोलीत तर राबता असतो. खोलीतल्या खुर्च्या नेहमीच भरलेल्या असतात आणि तरीही लोक येत-जात असतातच. एकेकाच गाऱ्हाणं ऐकता ऐकता मंत्र्यांची पुरेवाट होते. थोडी सहानुभूती दाखवली, तर येणारा अधिकच भडभडून बोलू लागतो आणि गळ्यात पडतो. थंडपणा दाखविला, तरी कोडगेपणाने बोलत बसतो आणि सरळ कटविलं, तरी जागचा हलायला मागत नाही! येणाऱ्यांमध्ये काही मंत्रिमहोदयांचे कार्यकर्ते असतात. ते तिष्ठत खुर्च्यांमध्ये बसून राहतात. मंत्रिमहोदय त्यांच्याशी चार शब्द बोलतात, मध्येच येणाऱ्याला कटवतात, कुठल्या कागदावर सही करतात, पुन्हा यांच्याशी चार शब्द बोलतात आणि पुन्हा तिसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायला मान वळवतात. त्यात अधिकाऱ्यांच्या मीटिंग्ज, कॅबिनेट सबकमिटीच्या बैठकी, खुद्द मंत्रिमंडळाच्या बैठकी असा चक्रावून टाकणारा सगळा कार्यक्रम असतो. मंत्र्याचं खातं जेवढं महत्त्वाचं किंवा त्याची लोकप्रियता जेवढी जास्त, त्या प्रमाणात त्याच्या चेंबरपुढची गर्दी मोठी.
आज मात्र सकाळपासून मंत्रालयात गडबड उडाली होती. साऱ्या मंत्रालयात, विशेषतः सहाव्या मजल्यावर, वातावरणात एक प्रकारचा तणाव जाणवत होता. मंत्रीलोक अजून यायचे होते. पण सहाव्या मजल्यावर आधीपासून जवळच्याच आमदारनिवासातून आमदारांची रीघ सुरू झाली होती. मंत्र्यांचे वैयक्तिक चिटणीस आणि शिपाई गटागटानं कुजबुजत चर्चा करताना दिसत होते. कालच्या सी. एम्. च्या घोषणेमुळं सर्वत्र विद्युन्मय वातावरण पसरलं होतं.
मंत्रिमंडळात बदल म्हटला, की त्याचा पहिला दृश्य परिणाम मंत्र्यांच्या स्टाफवर होतो. आणि आताचा होणारा बदल काही साधा बदल असणार नव्हता. सी. एम्. आणि विश्वासराव दाभाडे यांच्या या लढतीत कोण जिंकतं, यांच्यावर अनेक मंत्र्यांच भवितव्य ठरणार होतं. अनेक डोकी गडगडणार होती आणि अनेक नवीन येणार होती. आणि मंत्री गेला, की त्यानं निवडलेला स्वत:चा वैयक्तिक स्टाफही आपापल्या जुन्या डिपार्टमेंटमध्ये जातो. त्याचं सगळं महत्त्व संपतं. आतापर्यंत मंत्र्याचा पी. ए. म्हणून रुबाबात वावरणाऱ्याला पुन्हा साधा क्लार्क म्हणून एखाद्या सामान्य सुपरवायझरला सलाम करावा लागतो. मंत्र्याच्या दारचा शिपाई म्हणून हजार लोकांना अडवून धरणारा किंवा उदार मनानं आत सोडणाऱ्याला पुन्हा आपल्या डिपार्टमेंटमध्ये साधा पट्टेवाला म्हणून हाक मारेल त्या फालतू टायपिस्टला ओ द्यावी लागते. हे फारच जड होतं. फारसं सुखाचं नसतं. म्हणून साहेब जाणार, असा सुगावा जरी लागला, तरी मंत्र्याचा सारा स्टाफ दुसऱ्या एखाद्या मंत्र्याच्या दारी आपल्याला आसरा मिळू शकेल काय, याचा वास घेऊ लागतो. किंवा नवे येणारे मंत्री कोण असू शकतील, हे आधीच हेरून त्यांच्या घरी खेटे घालू लागतो. प्रत्येक डिपार्टमेंटमध्येही काही महत्त्वाकांक्षी लोक असतातच, ज्यांची नेहमीच मंत्र्यांच्या स्टाफवर जायची धडपड चालू असते. त्यांचाही राबता आमदारनिवासात आणि वर सहाव्या मजल्यावर सतत असतोच. राजकारणावर त्यांची बारीक नजर असते. कोण आमदार कसा आहे, त्याचा मतदारसंघ कसा आहे, त्याचं पक्षात वजन किती आहे, वरच्या वर्तुळात त्याचा वावर कितपत आहे, विधानमंडळातला त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, यावर त्यांची बारीक नजर असते. आणि अमुक एखादा आमदार आज ना उद्या मंत्री होण्याची शक्यता आहे, असं दिसलं, की ते लगेच त्याच्या गळ्यात पडतात. अर्थातच कोणाच्या गळ्यात पडावं, यालाही मर्यादा आहेतच. कारण एखादा मंत्री जेव्हा आपला स्टाफ निवडतो, तेव्हा तो अतिशय सावधतेनं निवड करतो. मुख्य पी. ए. हा अत्यंत विश्वासू असावयास हवा. म्हणजे जर नात्यातला एखादा माणूस मिळाला, तर फारच बरं; नाहीतर निदान गावचा तरी हवा. किमानपक्षी जिल्ह्यातला तरी. जात-गोतही याबाबतीत महत्त्वाची. हीच बाब इतर पी. ए. आणि शिपायासंबंधी. शिवाय हे सारे लोक माहीतगार हवेत, अनुभवी हवेत, हुशार हवेत, बारा गावचे पाणी प्यालेले हवेत. तेव्हा नवे मंत्री सहसा जुन्या मंत्र्यांच्या स्टाफमधली अनुभवी माणसं ठेवून घेणं पसंत करतात. अर्थात यातही आवडीनिवडी येतातच.
...
सचिवांच्या वर्तुळानं सुस्कारे सोडले. मुख्य सचिव आपल्या मोजक्या कडक भाषेत बोलत होते. आणि सचिवांनी आपल्या नोट्स बाहेर काढल्या होत्या. कठीण वर्ष म्हणजे काय, याची त्यांच्यापैकी प्रत्येकाला कल्पना होती. कठीण वर्ष, म्हणजे जिवापाड घोड्यासारखी मेहनत, परिस्थितीचा रोज अंदाज घेणं, त्यावर नवनवे तोडगे सुचविणं, ते अमलात आणण्याच्या नियमात बसणाऱ्या आणि व्यावहारिक अशा योजना सुचविणं, त्या राबवून घेणं, राबवून घेताना ज्या हेतूनं त्या योजिल्या होत्या, तो हेतू सफल होतो की नाही, यावर सतत बारीक लक्ष ठेवणं, सतत बैठकी आणि चर्चा, मिनिस्टरांशी बैठकी, कमिट्यांच्या बैठकी, दौरे, इन्स्पेक्शन्स् आणि पुन्हा रोज नवनवे निर्णय, जबाबदाऱ्या. हे एक आव्हान होतं. आणि बऱ्याच जणांना हे आव्हान झेलण्यातही मौज होती. आनंद होता. ही परिस्थिती म्हणजे खरोखरीच लोकांसाठी काहीतरी करण्याची आणि आपलं कर्तृत्व दाखविण्याची संधी आहे, असं त्यांना वाटत होतं. अखेर ते सारे सचिव म्हणजे भावना असलेली माणसंच होती. त्यांच्यापैकी प्रत्येकाला स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं, स्वतःच्या सुप्त आकांक्षा होत्या. ते सारेच जात्या बुद्धिमान होते. आणि ज्या वेळी ते सरकारी नोकरीत शिरले, त्या वेळी तर केवळ बुद्धिमान तरूणांमधली गाळीव रत्नंच सिव्हिल सर्व्हिससाठी निवडली जात होती. त्यामुळे ते सरकारी नोकर असले, तरी त्यांना महत्त्वाकांक्षा नव्हत्याच, असं नाही. आणि कोणत्या महत्त्वाकांक्षी माणसाला कठीण आव्हानं आली, की आनंद वाटत नाही?
त्यामुळं एका सुप्त ईर्षेनं ते वर्तुळ आता चर्चेसाठी बसलं होतं. खरं म्हणजे ते वर्तुळ म्हणजे सबंध राज्याची कर्तुमकर्तुम् शक्ती होती. या वर्तुळातल्या सचिवांच्या नावानेच सरकारी निर्णय रोजच्या शेकडो राजपत्रांमधून घोषित होत होते. परंतु या शक्तीची जाणीव असूनही सर्व सचिवांचे चेहरे निर्विकार दिसत होते, कारण त्यांना आपल्या ताकदीची सवय होऊन गेली होती. इतकी, की आपल्य ताकदीच्या मर्यादा नवनवीन राजकीय संदर्भात सतत बदलत जातात, याचाही त्यांना हळूहळू विसर पडू लागला होता. आपण कागदावर केलेली योजना प्रत्यक्ष खालपर्यंत पोचविण्यासाठी सरकारी यंत्रणेव्यतिरिक्त आणखी काही माध्यमे हवीत या त्यांना असणाऱ्या जाणिवेची दखल घेण्याची त्यांना अजून जरूरी वाटत नव्हती. म्हणूनच ते सहाव्या मजल्यावरील घडामोडींची यत्किंचितही दखल न घेता योजना आखू शकत होते. सी. एम्. जागेवर राहोत अथवा जावोत, दाभाडे त्यांच्या जागी येवोत किंवा आणखी कोणी येवो, त्यांना त्यांचं तेच काम त्याच पद्धतीनं करावं लागणार होतं, यात शंका नाही.
...
कादंबरी: सिंहासन
लेखक: अरुण साधू
...
गेल्या 'जे जे उत्तम...' मध्ये हाच उपक्रम टॅगच्या स्वरुपात पुढे चालवावा अशी सुचवणी झाली होती. त्याप्रमाणे मग आता खालील पाच जणांना 'खो' देतोय. तुम्ही करायचं एवढंच, की तुम्हांला आवडणारा एखादा मराठी उतारा उद्धृत करायचा आणि पुढे इतर पाच जणांना 'खो' द्यायचा. फक्त खो देताना, शक्यतो इतर कोणी त्यांना खो दिलेला नाही हे पडताळून पहा - जेणेकरून अधिकाधिक लोक यात सहभागी होऊ शकतील. तसेच ज्यांना खो दिला त्यांच्या अनुदिनीचा आणि ज्यांच्याकडून तुम्हांला खो मिळालाय, त्यांच्या 'जे जे उत्तम...' पोस्टचा दुवा तुमच्या लेखात दिलात तर एकाच पृष्ठावरुन असे अनेक उतारे वाचायला मिळतील.
गेल्या 'जे जे...'च्या लेखावरील पहिल्या पाच प्रतिसादींना मी खो देतोय.
क्षिप्रा
योगेश
मिनौती
मेघना
विद्या
या पाच अनुदिनीकारांकडून तुमच्यापर्यंत ही साखळी पोचेलच. परंतु, त्याआधी जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल, तर तुम्ही याच धर्तीवर पोस्ट लिहून 'जे जे उत्तम...'ची सुरुवात करू शकता. शुभेच्छा.
[गेल्या वर्षीही 'पुस्तकनिष्ठांची मांदियाळी' च्या टॅगला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आधीच्या वाक्यात दिलेल्या पृष्ठाच्या दुव्यावर, या जोडसाखळीतील लेख वाचता येतील.]

Subscribe to:
Posts (Atom)