Monday, October 01, 2007

जे जे उत्तम...२ [सिंहासन/टॅगिंग]

(पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.)

...

मंत्र्यांच्या खोलीत तर राबता असतो. खोलीतल्या खुर्च्या नेहमीच भरलेल्या असतात आणि तरीही लोक येत-जात असतातच. एकेकाच गाऱ्हाणं ऐकता ऐकता मंत्र्यांची पुरेवाट होते. थोडी सहानुभूती दाखवली, तर येणारा अधिकच भडभडून बोलू लागतो आणि गळ्यात पडतो. थंडपणा दाखविला, तरी कोडगेपणाने बोलत बसतो आणि सरळ कटविलं, तरी जागचा हलायला मागत नाही! येणाऱ्यांमध्ये काही मंत्रिमहोदयांचे कार्यकर्ते असतात. ते तिष्ठत खुर्च्यांमध्ये बसून राहतात. मंत्रिमहोदय त्यांच्याशी चार शब्द बोलतात, मध्येच येणाऱ्याला कटवतात, कुठल्या कागदावर सही करतात, पुन्हा यांच्याशी चार शब्द बोलतात आणि पुन्हा तिसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायला मान वळवतात. त्यात अधिकाऱ्यांच्या मीटिंग्ज, कॅबिनेट सबकमिटीच्या बैठकी, खुद्द मंत्रिमंडळाच्या बैठकी असा चक्रावून टाकणारा सगळा कार्यक्रम असतो. मंत्र्याचं खातं जेवढं महत्त्वाचं किंवा त्याची लोकप्रियता जेवढी जास्त, त्या प्रमाणात त्याच्या चेंबरपुढची गर्दी मोठी.

आज मात्र सकाळपासून मंत्रालयात गडबड उडाली होती. साऱ्या मंत्रालयात, विशेषतः सहाव्या मजल्यावर, वातावरणात एक प्रकारचा तणाव जाणवत होता. मंत्रीलोक अजून यायचे होते. पण सहाव्या मजल्यावर आधीपासून जवळच्याच आमदारनिवासातून आमदारांची रीघ सुरू झाली होती. मंत्र्यांचे वैयक्तिक चिटणीस आणि शिपाई गटागटानं कुजबुजत चर्चा करताना दिसत होते. कालच्या सी. एम्. च्या घोषणेमुळं सर्वत्र विद्युन्मय वातावरण पसरलं होतं.

मंत्रिमंडळात बदल म्हटला, की त्याचा पहिला दृश्य परिणाम मंत्र्यांच्या स्टाफवर होतो. आणि आताचा होणारा बदल काही साधा बदल असणार नव्हता. सी. एम्. आणि विश्वासराव दाभाडे यांच्या या लढतीत कोण जिंकतं, यांच्यावर अनेक मंत्र्यांच भवितव्य ठरणार होतं. अनेक डोकी गडगडणार होती आणि अनेक नवीन येणार होती. आणि मंत्री गेला, की त्यानं निवडलेला स्वत:चा वैयक्तिक स्टाफही आपापल्या जुन्या डिपार्टमेंटमध्ये जातो. त्याचं सगळं महत्त्व संपतं. आतापर्यंत मंत्र्याचा पी. ए. म्हणून रुबाबात वावरणाऱ्याला पुन्हा साधा क्लार्क म्हणून एखाद्या सामान्य सुपरवायझरला सलाम करावा लागतो. मंत्र्याच्या दारचा शिपाई म्हणून हजार लोकांना अडवून धरणारा किंवा उदार मनानं आत सोडणाऱ्याला पुन्हा आपल्या डिपार्टमेंटमध्ये साधा पट्टेवाला म्हणून हाक मारेल त्या फालतू टायपिस्टला ओ द्यावी लागते. हे फारच जड होतं. फारसं सुखाचं नसतं. म्हणून साहेब जाणार, असा सुगावा जरी लागला, तरी मंत्र्याचा सारा स्टाफ दुसऱ्या एखाद्या मंत्र्याच्या दारी आपल्याला आसरा मिळू शकेल काय, याचा वास घेऊ लागतो. किंवा नवे येणारे मंत्री कोण असू शकतील, हे आधीच हेरून त्यांच्या घरी खेटे घालू लागतो. प्रत्येक डिपार्टमेंटमध्येही काही महत्त्वाकांक्षी लोक असतातच, ज्यांची नेहमीच मंत्र्यांच्या स्टाफवर जायची धडपड चालू असते. त्यांचाही राबता आमदारनिवासात आणि वर सहाव्या मजल्यावर सतत असतोच. राजकारणावर त्यांची बारीक नजर असते. कोण आमदार कसा आहे, त्याचा मतदारसंघ कसा आहे, त्याचं पक्षात वजन किती आहे, वरच्या वर्तुळात त्याचा वावर कितपत आहे, विधानमंडळातला त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, यावर त्यांची बारीक नजर असते. आणि अमुक एखादा आमदार आज ना उद्या मंत्री होण्याची शक्यता आहे, असं दिसलं, की ते लगेच त्याच्या गळ्यात पडतात. अर्थातच कोणाच्या गळ्यात पडावं, यालाही मर्यादा आहेतच. कारण एखादा मंत्री जेव्हा आपला स्टाफ निवडतो, तेव्हा तो अतिशय सावधतेनं निवड करतो. मुख्य पी. ए. हा अत्यंत विश्वासू असावयास हवा. म्हणजे जर नात्यातला एखादा माणूस मिळाला, तर फारच बरं; नाहीतर निदान गावचा तरी हवा. किमानपक्षी जिल्ह्यातला तरी. जात-गोतही याबाबतीत महत्त्वाची. हीच बाब इतर पी. ए. आणि शिपायासंबंधी. शिवाय हे सारे लोक माहीतगार हवेत, अनुभवी हवेत, हुशार हवेत, बारा गावचे पाणी प्यालेले हवेत. तेव्हा नवे मंत्री सहसा जुन्या मंत्र्यांच्या स्टाफमधली अनुभवी माणसं ठेवून घेणं पसंत करतात. अर्थात यातही आवडीनिवडी येतातच.

...

सचिवांच्या वर्तुळानं सुस्कारे सोडले. मुख्य सचिव आपल्या मोजक्या कडक भाषेत बोलत होते. आणि सचिवांनी आपल्या नोट्स बाहेर काढल्या होत्या. कठीण वर्ष म्हणजे काय, याची त्यांच्यापैकी प्रत्येकाला कल्पना होती. कठीण वर्ष, म्हणजे जिवापाड घोड्यासारखी मेहनत, परिस्थितीचा रोज अंदाज घेणं, त्यावर नवनवे तोडगे सुचविणं, ते अमलात आणण्याच्या नियमात बसणाऱ्या आणि व्यावहारिक अशा योजना सुचविणं, त्या राबवून घेणं, राबवून घेताना ज्या हेतूनं त्या योजिल्या होत्या, तो हेतू सफल होतो की नाही, यावर सतत बारीक लक्ष ठेवणं, सतत बैठकी आणि चर्चा, मिनिस्टरांशी बैठकी, कमिट्यांच्या बैठकी, दौरे, इन्स्पेक्शन्स् आणि पुन्हा रोज नवनवे निर्णय, जबाबदाऱ्या. हे एक आव्हान होतं. आणि बऱ्याच जणांना हे आव्हान झेलण्यातही मौज होती. आनंद होता. ही परिस्थिती म्हणजे खरोखरीच लोकांसाठी काहीतरी करण्याची आणि आपलं कर्तृत्व दाखविण्याची संधी आहे, असं त्यांना वाटत होतं. अखेर ते सारे सचिव म्हणजे भावना असलेली माणसंच होती. त्यांच्यापैकी प्रत्येकाला स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं, स्वतःच्या सुप्त आकांक्षा होत्या. ते सारेच जात्या बुद्धिमान होते. आणि ज्या वेळी ते सरकारी नोकरीत शिरले, त्या वेळी तर केवळ बुद्धिमान तरूणांमधली गाळीव रत्नंच सिव्हिल सर्व्हिससाठी निवडली जात होती. त्यामुळे ते सरकारी नोकर असले, तरी त्यांना महत्त्वाकांक्षा नव्हत्याच, असं नाही. आणि कोणत्या महत्त्वाकांक्षी माणसाला कठीण आव्हानं आली, की आनंद वाटत नाही?

त्यामुळं एका सुप्त ईर्षेनं ते वर्तुळ आता चर्चेसाठी बसलं होतं. खरं म्हणजे ते वर्तुळ म्हणजे सबंध राज्याची कर्तुमकर्तुम् शक्ती होती. या वर्तुळातल्या सचिवांच्या नावानेच सरकारी निर्णय रोजच्या शेकडो राजपत्रांमधून घोषित होत होते. परंतु या शक्तीची जाणीव असूनही सर्व सचिवांचे चेहरे निर्विकार दिसत होते, कारण त्यांना आपल्या ताकदीची सवय होऊन गेली होती. इतकी, की आपल्य ताकदीच्या मर्यादा नवनवीन राजकीय संदर्भात सतत बदलत जातात, याचाही त्यांना हळूहळू विसर पडू लागला होता. आपण कागदावर केलेली योजना प्रत्यक्ष खालपर्यंत पोचविण्यासाठी सरकारी यंत्रणेव्यतिरिक्त आणखी काही माध्यमे हवीत या त्यांना असणाऱ्या जाणिवेची दखल घेण्याची त्यांना अजून जरूरी वाटत नव्हती. म्हणूनच ते सहाव्या मजल्यावरील घडामोडींची यत्किंचितही दखल न घेता योजना आखू शकत होते. सी. एम्. जागेवर राहोत अथवा जावोत, दाभाडे त्यांच्या जागी येवोत किंवा आणखी कोणी येवो, त्यांना त्यांचं तेच काम त्याच पद्धतीनं करावं लागणार होतं, यात शंका नाही.

...

कादंबरी: सिंहासन
लेखक: अरुण साधू

...

गेल्या 'जे जे उत्तम...' मध्ये हाच उपक्रम टॅगच्या स्वरुपात पुढे चालवावा अशी सुचवणी झाली होती. त्याप्रमाणे मग आता खालील पाच जणांना 'खो' देतोय. तुम्ही करायचं एवढंच, की तुम्हांला आवडणारा एखादा मराठी उतारा उद्धृत करायचा आणि पुढे इतर पाच जणांना 'खो' द्यायचा. फक्त खो देताना, शक्यतो इतर कोणी त्यांना खो दिलेला नाही हे पडताळून पहा - जेणेकरून अधिकाधिक लोक यात सहभागी होऊ शकतील. तसेच ज्यांना खो दिला त्यांच्या अनुदिनीचा आणि ज्यांच्याकडून तुम्हांला खो मिळालाय, त्यांच्या 'जे जे उत्तम...' पोस्टचा दुवा तुमच्या लेखात दिलात तर एकाच पृष्ठावरुन असे अनेक उतारे वाचायला मिळतील.

गेल्या 'जे जे...'च्या लेखावरील पहिल्या पाच प्रतिसादींना मी खो देतोय.

क्षिप्रा
योगेश
मिनौती
मेघना
विद्या

या पाच अनुदिनीकारांकडून तुमच्यापर्यंत ही साखळी पोचेलच. परंतु, त्याआधी जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल, तर तुम्ही याच धर्तीवर पोस्ट लिहून 'जे जे उत्तम...'ची सुरुवात करू शकता. शुभेच्छा.

[गेल्या वर्षीही 'पुस्तकनिष्ठांची मांदियाळी' च्या टॅगला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आधीच्या वाक्यात दिलेल्या पृष्ठाच्या दुव्यावर, या जोडसाखळीतील लेख वाचता येतील.]

6 comments:

संदीप चित्रे said...

Hi Nandan,
Thanks for "Sinhaasan". It's one of my favorite Marathi movies.
Please feel free to add my blog in your link "saare sobatee...kunee ithe, kunee tithe; with Pawan, Tulip, Pamar etc.
I also enjoy reading their blogs.
Cheers,
Sandeep

संदीप चित्रे said...

My blog's address is www.atakmatak.blogspot.com
Thanks for the comment you left for my article "bittambaatamee"
there.

Prakash Ghatpande said...

पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.)
ही भूमिका आवडली. बस्स! लिहीत राहा!

Nandan said...

@संदीप -- धन्यवाद, अटकमटक नक्की ऍड करेन. बरेच दिवस ती यादी वाढवायचे मनात आहे, पण आजपर्यंत राहून गेले.

@काका, तुम्हांलाही क्षिप्रांनी टॅग केलंय. आता तुमच्या आवडीच्या उताऱ्याची वाट बघतोय.

Dhananjay said...

Upakram awadala! Sinhasan tar classic ch ahe. Tyacha utara pan avadala.

A said...

Hey,

Thanks for putting this up. I'd read this book long back...Was trying to figure while reading which one this can be...suddenly dawned...Has to be Sinhasan...Arun Sadhu is a wizard with words. He's awesome!

Didn't know there's a movie made on this one. Any idea how it is?