Friday, September 28, 2007

मराठी साहित्यातील स्त्रीवाद

(उपक्रम या संकेतस्थळावर सुरु असलेल्या 'मराठी साहित्यातील स्त्रीवाद' या चर्चेला दिलेला हा प्रतिसाद. बराच लांबला आणि मूळ विषयाव्यतिरिक्त अवांतर लिहिणेही झाले म्हणून इथे वेगळा प्रकाशित करीत आहे.)

काशीबाई कानिटकर, लक्ष्मीबाई टिळक अशा लेखिका मराठी साहित्यात लिहित्या झाल्या तरी स्त्रीवादाची खरी मुहुर्तमेढ रोवली ती मालतीबाई बेडेकरांनी. १९३३ मध्ये विभावरी शिरुरकर या टोपणनावाने त्यांनी 'कळ्यांचे नि:श्वास' हा कथासंग्रह लिहून मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवली. मुळात स्त्री-वादाचा पाया हा स्त्रीला वेगळे अस्तित्व आहे, वेगळे व्यक्तिमत्व आहे ही मान्यता मिळवण्यात आहे. केवळ स्त्री असल्याने वेगळी वागणूक मिळावी असा नाही. 'बाबांचा संसार माझा कसा होणार?' या कथेत एक मुलगी, बहीण, पत्नी, सून, आई म्हणून इतरांनी आपल्याकडे पाहू नये, तर एक स्वतंत्र विचारी व्यक्ती म्हणून पहावे हा त्याकाळी धाडसी वाटणारा विचार कथानायिका मांडते. त्यातील एक उतारा येथे वाचता येईल.

एका अर्थी मालतीबाई बेडेकर काळाच्या पुढे होत्या. विश्राम बेडेकरांच्या 'एक झाड दोन पक्षी' या आत्मचरित्रात त्याची चुणूक दिसते. साधारण पुढच्या एक-दोन दशकात, दुसऱ्या महायुद्धानंतर एक गरज म्हणून स्त्रियांची पहिली पिढी नोकरीसाठी प्रथमच घराबाहेर पडली. बटाट्याच्या चाळीचं शेवटचं स्वगत आठवतंय? एरवी एक पुस्तक म्हणून ते कितीही आवडत असले, तरी त्या स्वगतातला मुली नोकरीसाठी बाहेर पडल्या म्हणून हळहळणारा भाग मला कायम खटकत आला आहे. अर्थात एका दृष्टीने ते तेव्हाच्या समाजमनाचे प्रतिबिंब म्हणता येईल. नाइलाज म्हणून स्त्रियांना नोकरी करण्याची परवानगी देणारा, आणि पुढे मग मुलीच्या पगारावर घर चालते तेव्हा तिचं लग्न होऊन कसं चालेल अशा कोंडीत सापडलेला. बटाट्याच्या चाळीच्याच संगीतिकेतला अंतू जोशी पत्रे टंकताना आवडणाऱ्या शांतेपेक्षा किंचित काळ्या सरलेला 'शांता शांता इनोसंट मन - सरला पित्रे पर्मनंट पण. हुडकून काढीन म्हणतो पत्ता, पगार अन महागाई भत्ता' म्हणून अधिक पसंती देतो, तेव्हा तो निरुपायाने बदलणाऱ्या पुरुषप्रधान समाजाचेच प्रतिनिधित्व करतो. (अर्थात, इतर प्रांतांच्या मानाने महाराष्ट्रात हे बदल लवकर झाले. उत्तर भारत याबाबत अधिक मागासलेला होता. केवळ सायकल चालवणाऱ्या मुली/स्त्रिया हे 'अजाब' पाहण्यासाठी १९२० च्या दशकात पंजाबातून काही पुरुष सहलीसाठी पुण्यात आले होते, असे एका लेखात वाचल्याचे आठवते.)

साठोत्तरी साहित्य हे स्त्रीवादापेक्षा दलित साहित्य आणि नेमाडे, चित्रे, ढसाळ, कोलटकर यांच्यासारख्या नव्या स्वरुपाचे लेखन करणाऱ्यांनीच अधिक गाजवले असावे. [चू. भू. द्या. घ्या.] अर्थात, इरावती कर्व्यांनी परिपूर्तीमधे केलेले उपहासात्मक भाष्य (महर्षी कर्व्यांची सून, अमक्यांची कन्या, अमक्यांची पत्नी अशी लेखिकेची ओळख एका समारंभात करुन देण्यात येते. तरीही काहीतरी राहिलंय असं तिला वाटत राहतं. शेवटी आपल्या शाळकरी मुलाच्या मित्रांनी, 'अरे ती बघ आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई' असे उद्गार काढल्यावर त्यांना आपली ओळख पूर्ण झाल्याचे, परिपूर्ती झाल्याचे समाधान मिळते.) याच काळातलं.[त्यांच्या मृत्युनंतर एका पत्रकारवर्यांच्या लेखात इरावतीबाईंच्या मानववंशशास्त्रातील संशोधन आणि लेखनकामापेक्षा - त्या तेव्हाच्या पुण्यात बुलेट चालवायच्या, नवऱ्याला दिनू म्हणून हाक मारायच्या असे कौतुक वाचल्यानंतर फार काही बदलले नाही याची खात्री पटली :)]

पद्मा गोळे, संजीवनी मराठे, इंदिरा संत, शांता शेळके या कवयित्रींनी आक्रमक स्त्रीवाद जरी कवितेतून मांडला नसला; तरी स्वतंत्र स्त्रीत्वाची जाणीव त्यांच्या कवितांतून डोकावत राहते. 'डोळा वाटुली संपेना' मध्ये कविताभर ताटकळणारी, आणि मग
शेवटच्या कडव्यात 'संपावया हवी वाट, लावायला हवा दिवा; पोटासाठी मुकाट्याने, हवा टाकायला तवा' म्हणणारी इंदिरा संतांनी रेखाटलेली आई, किंवा -

आता सोंगं पुरे झाली
सारी ओझी जड झाली,
उतरून ठेवून आता तरी
माझी मला शोधू दे
तुकडे तुकडे जमवू दे
विशाल काही पुजू दे

अशी आस लागलेली, पद्मा गोळेंच्या 'मी घरात आले' मधली कविता-नायिका (कथानायिका असते तशी) याच गोष्टीची साक्ष देतात.

एकंदरीतच स्त्रीवादी लेखक-लेखिका म्हणजे स्त्रियांच्या हक्कांसाठी हिरीरीने भांडणारे किंवा तळागाळातील स्त्रियांवर होणारे अन्याय रेखाटणारे अशी व्याख्या करणे संकुचितपणाचे होईल. (अशा यादीत मग फक्त 'मुलगी झाली हो' हे नाटक आणि इतर कार्यकर्ते-लेखकांची नोंद होईल). व्यापक अर्थाने, गौरी देशपांड्यांचं लेखन स्त्रीवादी म्हणता येईल. "मी एक टक्का स्त्रियांच्या जीवनाविषयी लिहिते असा आरोप असला तरी मला स्त्रियांत अशा अभेद्य भिंती जाणवत नाहीत. भाकरीची भ्रांत नसणाऱ्याला दुसरे प्रश्न असतातच की.", या शब्दांतून त्यांची भूमिका स्पष्ट होते. निपाणीतील विडी आणि जर्दा कारखान्यात काम करणाऱ्या गरीब स्त्रियांचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या अनिल अवचटांचं लेखन आणि मध्यमवर्गीय/सुखवस्तू घरातील नमू आणि कालिंदीच्या मन:स्थितीचा वेध घेणाऱ्या 'दुस्तर हा घाट' आणि 'थांग'सारख्या कादंबऱ्या -- वरकरणी दोन टोकं वाटली तरी त्यांना जोडणारा धागा स्त्रीवादी लेखनाचाच.

सुनीता देशपांडेंचं 'आहे मनोहर तरी', कमल पाध्येंचं 'बंध-अनुबंध' आणि माधवी देसाईंचं 'नाच गं घुमा' या तीन पुस्तकांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख अपूर्ण राहील. तिघीही साहित्यिकांच्या पत्नी. लेखक त्याच्या लेखनात ज्या मूल्यांचा सतत पुरस्कार करतो, तसे त्याचे व्यक्तिमत्व असते या प्रचलित समजाला तिघींचं लेखन कमी-अधिक प्रमाणात छेद देतं. 'आमच्या घरी तांदूळ आणि प्रूफं दोन्ही सुनीतालाच निवडावी लागतात', असं म्हणणाऱ्या पुलंमध्येही कधीतरी सुनीताबाईंना 'शिकिवनारा बाबा' ही पुरुषी अहंगंडाची किंवा 'लोकापवादो बलवान मतो मे' म्हणून समाजापुढे मान तुकवण्याची जी वृत्ती आढळली; ती वृत्ती - तो पुरुषी अहंगंड कमी अधिक प्रमाणात इतर दोघींनाही जाचत राहतो.

सध्याच्या लेखिकांमध्ये मेघना पेठे आणि कविता महाजनांचे नाव आवर्जून घ्यावं लागेल. शरीरसंबंधांविषयी लिहिताना मराठी लेखक फार सोवळेपणाने लिहितात. एकंदरीतच मध्यमवर्गीय पांढरपेशेपणा याबद्दल मोकळेपणाने लिहायच्या आड येते, असा या चर्चेत मुद्दा उपस्थित झाला होता.(अर्थात केवळ शरीरसंबंधाविषयी मोकळेपणाने लिहिणे म्हणजे आधुनिक/स्त्रीवादी लेखन असा दावा यातून करायचा नाही. परंतु, चित्रपटात वाट्टेल ते पाहण्याची तयारी असलेले आपण पुस्तकांबाबत अजून बरेचसे परंपरावादी आहोत, हेही खरं.) या दोघींच्या लेखनात अशी वर्णने जेव्हा कथानकाच्या ओघात येतात तेव्हा त्यांचा तोल कुठे ढळत नाही. कविता महाजनांच्या 'ब्र' या पुस्तकातील हा एक उतारा उदाहरणार्थ पहा. [टीप - या उताऱ्यात काही असभ्य, अश्लील आहे, असं मला वाटत नाही. केवळ सावधगिरी म्हणून ही टीप लिहिणे भाग आहे, की जर आपल्याला यात काही आक्षेपार्ह वाटणारं असेल, असं न वाचताच वाटत असेल तर कृपया पुढील दोन परिच्छेद गाळून पुढचा लेख वाचावा.]

"अख्खा दिवस ऑफिसमध्ये राबून; तिथल्या स्पर्धेला, कटकटींना सामोरं जाऊन, लोकलमध्ये लोंबकळून घरी परतायचं. परतताना मुलींना पाळणाघरातून घ्यायचं. भाजी, दूध घ्यायचं. पुन्हा मुलींचं काहीतरी असायचंच... उद्या शाळेत अमुक वही, तमुक रंग सांगितलेत आणायला, किंवा क्राफ्टपेपर, किंवा घरी कुंडीत एक झाड लावून त्याची वाढ पाहायला सांगितलंय; असं काहीतरी. दगड, धोंडे न् माती. मग रात्रीचा स्वयंपाक. मुलींचा गृहपाठ. उद्या सकाळची तयारी. या सगळ्यात शरीर दगा नाही देणार, तर काय दिवसभर एकाच जागी देठावर उमलून थांबलेल्या फुलासारखं झुलत बसणार? पण हे सगळं सहज बोलू शकतो दिनेश. रेवतीलाही ऐकवायचाच की.

रेवती एकदा म्हणाली होती, "कधीकधी इतकी चीड येते ऐकताना. वाटतं, आपणही सुनवावं. कधी आपली इच्छा झाली आणि याचं उठलंच नाही तर? बायका म्हणजे यांना हवं तेव्हा अंगाखाली यायला हव्यात. बळजोरी करता येते. नाहीच करता आली तर असं बोलून दाखवता येतं. पण मी जर असं म्हटलं कधी, तर किती घाण वाटेल ना? बघ, तुझा चेहरासुद्धा कसा झालाय हे इतकं साध्या सरळ भाषेत बोललेलं ऐकताना. त्यांच्यासारख्या खालच्या पातळीवर येऊन तशा गलिच्छ भाषेत बोलूच शकणार नाही कधी आपण. इतक्या पारंपारिक कल्पना ठाम असतात आपल्या डोक्यात. बाकी सारं आपण मोकळं बोलू. पाळीचं किंवा गरोदरपणीचं. पण असं निगेटिव्ह असलं, तर नाही बोलणार कधीच. आपल्या नवऱ्याच्या पुरुषार्थाचा कसा अपमान करणार आपण मैत्रिणीजवळसुद्धा? परवा दिनेश म्हणाला की 'तुम्हां बायकांची अशी नेहमीच कटकट असते काही ना काही. कधी रेड डिस्चार्ज कधी व्हाइट डिस्चार्ज. निमित्तं मिळतात नाही म्हणायला.' इतकी किळस दाटून आली मनात. सणसणीत काही बोलावं असं वाटलं. पण नाही बोलले. आधीच या लोकांचे इगो नाजूक. ते दुखवायचे आणि तेही सेक्ससारख्या बाबतीत म्हणजे आपलं मरणच. आणि खरंतर मला इंटरेस्ट नसतो असंही नाही. पण नवेपणीसारखी निव्वळ शरीराची ओढ आता कशी राहील?"


'मराठी साहित्यातील स्त्रीवाद' या विषयावर जे काही आठवलं ते लिहिलं. भविष्यात ह्या स्त्रीवादाचे स्वरूप कसे असेल?

नातिचरामित 'अलीकडच्या इतिहासातल्या कितीतरी टॉपला गेलेल्या आणि आपापल्या क्षेत्रांत स्वयंपूर्ण कर्तृत्वाने गाजलेल्या बायका या सगळ्यांचं मॅरिटल स्टेटस लक्षात घेतलं तर एक गोष्ट जाणवते -- यातल्या बहुतेक बायका या अविवाहित, परित्यक्त्या, घटस्फोटित, विधवा वा पुनर्विवाहित आहेत. हा निव्वळ योगायोग वा अपघात नाही, तर लग्नसंस्थेवरची झणझणीत टिपणी म्हणून याकडे बघता येईल.' असं एक निरीक्षण आहे. (संसारी स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने उत्कर्ष साधू शकत नाहीत, असे लेखिकेला म्हणायचे आहे असा उफराटा निष्कर्ष यातून काढू नये; कारण हे निरीक्षण कथेच्या संदर्भात येते.) त्यावरुन परवाच एका अनुदिनीवर झालेली न्यूयॉर्क टाइम्सच्या एका पाहणीवरील चर्चा आठवली. घर आणि नोकरी, ह्या दोन्ही आघाड्या सांभाळताना स्त्रियांची दमछाक होते आहे आणि परिणामी त्यांचे असमाधान वाढते आहे हा या पाहणीचा निष्कर्ष. भारतातही नोकरी करणाऱ्या जोडप्यांत घटस्फोटाचे प्रमाण वाढते आहे.

याचाच अर्थ, स्त्रियांच्या समस्या दूर न होता उलट त्यांचे स्वरूप बदलते आहे आणि अधिक गुंतागुंतीचे होते आहे. आधुनिक स्त्रीची ही कुचंबणा जसजशा अधिकाधिक स्त्रिया लिहित्या होतील; तसतशी अधिक प्रभावीपणे मराठी साहित्यात व्यक्त होत राहील.

13 comments:

Ajit said...

नंदन,

निव्वळ म हा न अभ्यासपूर्ण लेख!

मराठी साहित्यातील स्त्री या ना त्या कारणाने 'वादा'तीत ठरली आहे हे नक्की.

Meghana Bhuskute said...

सुरेख लेख. पण पद्मजा फाटक आणि आशा बगे या तुलनेनं मवाळ-हलकाफुलका पण ठाम सूर असणार्‌या लेखिकांचा उल्लेख व्हायला हवा होता. तसाच सानियाचाही.
असो, तेवढं चालायचंच. हा काही सर्वसमावेशक आढावा नव्हे. ’लोकप्रभे’त कविता महाजनांचं सदर चालू होतं, तेव्हा शेवटच्या काही लेखांमध्ये त्यांनी लिखाणातल्या या मोकळेपणाविषयी सुरेख भाष्य केलं होतं. पुढच्या पिढीच्या स्त्रिया अधिकाधिक आत्मनिर्भर होत जातील आणि पुढच्या पिढीच्या लेखिका अधिकाधिक निर्भय-मोकळ्या-निरोगीपणे नि:संकोच... असा त्याचा आशय होता, त्याची आठवण झाली.
प्लीज लवकर लवकर लिहीत जा...

Mints! said...

नंदन, अतिशय balanced लेख. या बाबतीत एकतर्फ़ी लिखाण होते बरेचदा तसे हे वाचताना वाटत नाही.

बटाट्याची चाळ मधले ते चिंतन नेहेमी मला अस्वस्थ करत आलेय. आणि त्यातुनही ते पु.ल. नी लिहिल्यामुळे जास्तीच.

लवकर लवकर लिहित जा रे.

Vidya Bhutkar said...

खूपच छान आहे लेख.I couldnt stop worndering about your capacity to put so many names, referrences together and maintain the perfect balance of your blog as well with these great posts.
बाकी मलाही काही लिहावसं वाटलं याबद्दल. माझ्या अनुभवाप्रमाणे तरी मी एकही लेखिका पाहिली नाहिये जिने अनुभवाव्यतिरिक्त काल्पनिक लेखन केले असावे. आणि सर्वात जास्त कमतरता जाणवते ती 'विनोदी' साहित्यामध्ये. मराठीत इतके उच्चकोटीचे विनोदी लेखक झाले पण एकही लेखिका मला दिसली नाही(अपवाद, अनुची 'अनुदिनी'). कदाचित अजूनही स्वत:च्या अनुभवापलिकडे जाऊन तितकेच काल्पनिक किंवा विनोदी लिखाण करणं शक्य होतं नाहीये.त्याला कदाचित घराची ओढ, सामाजिक बांधिलकी आणि त्यांचा मनावरचा अजूनही असलेला इफेक्ट हे कारण असावं.
-विद्या.

Yogesh said...

अतिशय अभ्यासपूर्ण. या लेखातून तुमचा मराठी साहित्याचा व्यासंग दिसून येतो.

पुलंचा लेख चांगला आहे पण त्यातील कालबाह्य संदर्भांची "टाकसाळीतील नाणी" मध्ये मुकुंद टाकसाळेंनी मस्त रेवडी उडवली आहे. :)

Nandan said...

@अजित, मिनौती, योगेश - धन्यवाद

@मेघना - खरंय. नीरजा, प्रज्ञा लोखंडे, उर्मिला पवार यांचा उल्लेखही असायला हवा होता.

@विद्या - विनोदी साहित्याबद्दल तू मांडलेला मुद्दा वेगळा आणि विचार करण्यासारखा आहे. लिहिताना तो डोक्यात आला नाही. विनोदी साहित्यातील लेखिकांची उणीव हे एक निदर्शक लक्षण म्हणता येईल.

Vishal said...

नंदन,

लेख नेहमीप्रमाणेच मस्त आहे. तुझे लेख वाचले की तू चुकून इंजिनिअर झालास असं वाटतं.

बघ, अजूनही विचार कर. वेळ गेलेली नाही :)

Kaustubh said...

लेख फारच आवडला. इरावती कर्व्यांची, कर्व्यांची सून म्हणून ओळख त्यांना नेहमीच टोचली हे वाचण्यात आहे. पण अजूनही बायकांची ओळख, अमक्यची बायको, तमक्याची मुलगी अशीच होते. इरावतीबाईंचा तर जमानाच वेगळा होता!

एकूण लेखिकांमध्ये दुर्गाबाई भागवत कुठे बसल्या असत्या?
- कौस्तुभ

ता.क. विशाल ची टिपण्णी समर्पक आहे. जरूर विचार कर!

Nandan said...

विशाल, कौस्तुभ -- प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. विचार करतोय :). दुर्गाबाईंचं एकूणच मराठी साहित्यातलं स्थान फार वरचं आहे. चालून आलेला ज्ञानपीठ पुरस्कार सविनय नाकारणाऱ्या त्या बहुधा एकमेव साहित्यिक असाव्यात. पण त्यांच्या लेखनातील स्त्री-वादी विचारांविषयी मला काही माहीत नव्हतं किंवा तसे संदर्भही हाताशी नव्हते. त्यामुळे त्यांचा उल्लेख या लेखात करता आला नाही.

Lopamudraa said...

khup khup maahan lekh kharokhar!!!
ateeshay uchch!!!..

Anand Sarolkar said...

Brilliant writing!!! Hats off to you...

Sumedha said...

वा! नंदन, नेहेमीप्रमाणेच great!मागचे बरेच दिवस मराठी ब्लॉगविश्वापासून (एकंदरीतच आंतरजालापासून) लांब आहे. आता परत येतीये, तो प्रथम तुझाच ब्लॉग बघतिये! मस्त वाटलं!

Prajakta said...

मस्त लेख!

माझ्या वाचनात विनोदी लेखन करणाऱ्या एक लेखिका: मंगला गोडबोले.
"स्वयंपाक आवडत नाही" हे विधान स्त्रीवादी असू शकतं की नाही माहिती नाही, पण त्यांनी त्यांच्या लेखांमधून पारंपारिक "स्त्री" समस्यांवर खूपच खरपूस (आणि गोड) लेखन केलंय. त्यांच्या विनोदाची शैली उपरोधी/विखारी नसून स्वच्छ मोकळी आहे, हे महत्वाचं.