टॅगिंगचा खेळ कदाचित आपल्याला माहीत असेल. एखाद्या विषयाशी संबंधित प्रश्नांची आपण उत्तरे द्यायची आणि आपल्या परिचितांना/मित्रांना तेच प्रश्न विचारून त्यांची या संदर्भातील मते जाणून घ्यायची आणि त्यांनी हीच साखळी पुढे चालवायची असे या खेळाचे स्वरूप आहे. बुक-टॅगिंग हा त्यातला माझा एक आवडता प्रकार. हाच उपक्रम मराठी ब्लॉगविश्वातही राबवावा, या हेतूने हा लेखप्रपंच.
या खेळात अर्थात सर्वप्रथम महत्त्वाचे आहे ते आपले सहकार्य. पुस्तकांविषयी विचारलेल्या काही प्रश्नांची कृपया यथामती उत्तरे आपापल्या ब्लॉगवर लेख (पोस्ट) लिहून द्यावीत आणि शक्य झाल्यास तुमच्या परिचित/अपरिचित मराठी भाषक ब्लॉगर्सना (३ ते ५) हेच प्रश्न विचारावेत. सध्या मराठी अनुदिनीकारांची संख्या २०० च्या पुढे गेली असल्याने ही साखळी बरीच वाढू शकेल, नवीन पुस्तकांच्या आणि ब्लॉगर्सच्या ओळखी होतील आणि छोट्याशा प्रमाणावर का होईना, माहितीच्या या महाजालात मराठी पुस्तकनिष्ठांची एक मांदियाळी तयार होईल.
असो, नियमांत अधिक वेळ न घालवता मी माझ्यापासून प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात करतो -
१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -
'नातिचरामि' - मेघना पेठे
२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -
'हंस अकेला' आणि 'आंधळ्याच्या गायी' असे वैशिष्ट्यपूर्ण कथासंग्रह लिहिणाऱ्या मेघना पेठे यांची ही पहिलीच कादंबरी. विवाहसंस्थेवरील माझ्या मतांचा उद्गार म्हणजे ही कादंबरी असे लेखिकेचेच म्हणणे आहे. अद्याप वाचन सुरू असल्याने मत नोंदवणे योग्य होणार नाही, पण तिचे परीक्षण येथे वाचता येईल.
३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके -
विशाखा - कुसुमाग्रज
व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे
हंस अकेला - मेघना पेठे
वनवास - प्रकाश नारायण संत
बलुतं - दया पवार
४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-
भावार्थदीपिका - संत ज्ञानेश्वर
स्मृति-चित्रें - लक्ष्मीबाई टिळक
डांगोरा एका नगरीचा - त्र्यं. वि. सरदेशमुख
तुंबाडचे खोत - श्री. ना. पेंडसे
बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
'पूर्वरंग' हे पु. लं. चे प्रवासवर्णन हे माझे अतिशय आवडते पुस्तक. पु. लं. चे हे सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणता येणार नसले, तरी याच पुस्तकाचे बोट धरून मी मोठ्यांच्या पुस्तकविश्वात प्रवेश केला. पाचवीच्या मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो असताना हे पुस्तक सापडले आणि आपण काहीतरी वेगळे वाचतोय याची जाणीव झाली. अर्थात त्यावेळी वाचलेले सगळेच कळले असे नाही, पण पु. लं. ही काय असामी आहे याची एक झलक या पुस्तकातून नक्कीच मिळाली. त्याकाळी महाराष्ट्राबाहेर न गेलेल्या मला त्यांनी लीलया पूर्व आशियाची सफर घडवली. एखाद्या जुन्या मित्राबरोबर कधीही आणि कुठल्याही विषयावर बोलता येते, त्याप्रमाणे आजही या पुस्तकाचे कुठलेही पान उघडले की अनेक ओळखीच्या खुणा सापडतात आणि क्वचित एखाद्या विनोदातली न कळलेली खुबी जाणवते, आणि कसे 'पुलकित' वाटू लागते.
मी या खेळासाठी निवडलेले (Tagged) ब्लॉगर्स असे -
विशाल
ट्युलिप
अजित
गायत्री
चक्रपाणी
सुनील
सुनील यांचा 'रानातील प्रकाश' हा साहित्यविषयक ब्लॉग वगळता, निवडीमागे विशेष निकष असा काही नाही, फक्त दक्षिण भारत (अजित), उत्तर भारत (गायत्री) आणि तीन देश/खंड (जपान - जर्मनी - अमेरिका) असा सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवायचा प्रयत्न केला आहे :).
या खेळाडूंमार्फत तुमच्यापर्यंत ही साखळी पोचेलच, परंतु तुम्हांला त्याआधीच सहभागी व्हायचे असेल, तर तुम्ही याच धर्तीवर प्रश्नोत्तरे लिहून याची सुरुवात करू शकता. शुभेच्छा.
Thursday, May 04, 2006
Subscribe to:
Posts (Atom)
