आज २३ एप्रिल - शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्युदिनही. जागतिक पुस्तक दिनाला याहून अधिक चांगला मुहूर्त कोणता? आपल्यापैकी बहुतेक सर्वांना थोडीफार वाचनाची आवड असतेच, पण वाचनाचे वेड अगदी रेल्वेचे वेळापत्रक किंवा बांधून आलेला पुडीचा कागद वाचण्यापर्यंतदेखील जाते. सॉमरसेट मॉमच्या 'बुक बॅग' कथेतील सुरुवातीची ही वाक्ये, त्यातील शब्दरचनेमुळे लक्षात राहतातच पण याच व्यसनाची कबुलीही देतात.
Some people read for instruction, which is praiseworthy, and some for pleasure, which is innocent; but not a few read from habit, and I suppose that this is neither innocent nor praiseworthy. Of that lamentable company am I.
[पुढील मजकूर येथे वाचता येईल.]
उत्सवी वृत्ती आणि दिवस साजरे करायच्या संदर्भातच बोलायचे झाले तर, सध्याचे वर्ष हे मराठी छापील साहित्याचे द्विशतकपूर्ती वर्ष आहे. १८०५ साली बंगालमधल्या श्रीरामपूर येथील मिशनरी छापखान्यात देवनागरी टाइप वापरून दोन मराठी पुस्तके प्रकाशित झाली. एक होते, 'अ ग्रामर ऑफ महरट्ट लँग्वेज' व दुसरे 'मॅथ्यूचे शुभवर्तमान' - म्हणजेच बायबल.
आता या मितीला, दोनशे वर्षाँनंतर मराठीत दरवर्षी दीड हजाराहून अधिक पुस्तके प्रकाशित होत आहेत. दिवाळी (आणि काही वासंतिक अंक) पकडले तर ही संख्या दोन हजाराच्या पलीकडे जाते. इतक्या मोठ्या संख्येने मराठी पुस्तके छापली जातात, त्याअर्थी त्यांचा खपही होत आहे; वाचकवर्ग विस्तारतो आहे. मग त्यात विद्वज्जड समीक्षाही आली आणि 'मधल्या वेळी खायला काय कराल?' पासून 'काळ्या डोहाचे रहस्य' हेही आले. यातला विनोदाचा भाग सोडला, तर 'बदलता भारत' सारखे जागतिकीकरणाचा वेध घेणारे, 'इडली, ऑर्किड आणि मी' हे उद्योजकाची कहाणी सांगणारे आणि 'रानातल्या वाटा' (किंवा 'इजिप्तायन') सारखे वेगळ्या विश्वातील भ्रमंतीचे अनुभव कथन करणारे अशी वेगवेगळी पुस्तके जवळपास एकाच वेळी वाचकांनी उचलून धरावीत हे त्यांच्या प्रगल्भतेचेच निदर्शक आहे आणि एकंदर साहित्यव्यवहारासाठी सुचिन्ह आहे.
अर्थात, या सार्या गोष्टींमध्ये हुरळून जाण्यासारखे काही नसले तरी 'मराठी भाषा मुमूर्षू आहे काय?' या इतिहासाचार्य राजवाड्यांच्या प्रश्नाला 'नाही' हे ठाम उत्तर देता येण्याइतपत नक्कीच आशादायक चिन्हे दडलेली आहेत.
Sunday, April 23, 2006
Subscribe to:
Posts (Atom)
