गेल्या आठवड्यात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला. मराठी साहित्यातील कथालेखिकांबद्दल बोलायचे झाले तर मेघना पेठे, सानिया, गौरी देशपांडे, आशा बगे, ऊर्मिला पवार, प्रिया तेंडुलकर, कुसुमावती देशपांडे, स्नेहलता दसनूरकर, सुमती क्षेत्रमाडे अशी अनेक नावे घेता येतील. तर आत्मचरित्रात्मक लेखन करणार्यांत लक्ष्मीबाई टिळक (स्मृति-चित्रें), सुनीता देशपांडे (आहे मनोहर तरी), कमल पाध्ये (बंध-अनुबंध), माधवी देसाई (नाच गं घुमा), सुमा करंदीकर (रास) यांचे लेखन लक्षणीय आहे. या सर्व नामावळीत एक नाव अग्रहक्काने घ्यावे लागेल, ते म्हणजे मालतीबाई बेडेकरांचे.
'विभावरी शिरूरकर' या टोपणनावाने लेखन करणाऱ्या या लेखिकेने वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी लिहिलेल्या 'कळ्यांचे निःश्वास' या कथासंग्रहाने मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवली. 'खरे मास्तर' आणि 'हिंदोळ्यावर' ही त्यांची इतर काही गाजलेली पुस्तके; आणि 'रणांगण' सारख्या मराठी साहित्यात मैलाचा दगड मानल्या गेलेल्या कादंबरीच्या निर्मितीचे मुख्य कारणही त्याच. २००५-०६ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. 'बाबांचा संसार माझा कसा होणार?' या त्यांच्या कथेतील काही भाग खाली देत आहे.
तिशी उलटलेल्या कमावत्या मुलीच्या पगारावर घर चालत असल्याने तिला लग्नाचा विचार पुढे ढकलण्यास सांगणारे तिचे वडील आणि त्या अनुषंगाने कथानायिकेने केलेला स्वार्थ, प्रेम आणि त्याग यांच्या परस्परसंबंधांचा विचार असे या कथेचे साधारण स्वरूप आहे. प्रेमाला मम-ता (माझेपणा) का म्हणतात याचा उलगडा या भागातून होऊ शकेल. कदाचित त्यांचे काही विचार पटणार नाहीत, पण त्यामागची विचारी वृत्ती आणि स्पष्टता सहज दिसून येते. तसेच १९३३ सालच्या तुलनेने कर्मठ समाजासमोर मांडताना त्यांनी जे धैर्य दाखवले, ते केवळ अतुलनीय म्हणावे लागेल.
...
बाबांचे विचार ऐकून मी थक्क झाले. त्यांना तरी माझे बरे होऊ नये असे खात्रीने वाटत नसेल. पण गरिबीच्या चरकाने त्यांच्या संसाराची अशी काही चमत्कारिक आणि नाजूक स्थिती झाली आहे, की त्या निराशेच्या व भीतीच्या दडपणामुळेच केवळ त्यांच्या तोंडून त्या दिवशी असे बदसूर निघाले. मी खूप रडले. माझी विचारसरणी वडिलांना कशी कळत नाही? ती मी बोलू कशी? बाबा तरी एकदा तरूणच होते ना?
हे त्यांना कळत नाही म्हणूनच मला कधीकधी वाटते, की आईबापांचे प्रेमही व्यापारी प्रेम असते. मुलांकडून मोबदला न मिळाला तर प्रेमाचे नाणेही खणखणीत वाजत नाही. मग त्याला हवे तर व्यवहार म्हणा. पण त्या मोबदल्याकरिता मनुष्याचे मन थोडे तरी विकृत होईलच होईल. माझ्या भवितव्याचा विचार करू लागले की बाबा मला स्वार्थी म्हणतात; पण त्यांच्या संसाराकरिता का होईना, माझ्या भावना दूर झुगारून देणारे बाबासुद्धा त्याच दोषाचे मालक होत नाहीत का?
कित्येक वेळा मला एका गोष्टीबद्दल गूढ वाटते आणि ते म्हणजे स्वार्थ कशला म्हणायचे नि निःस्वार्थ कशाला म्हणायचे? मला तरी वाटते, की स्वार्थ हा शब्द बहुरूपी आहे. एका बाजूने तो पूर्ण स्वार्थ वाटेल तर हळूहळू रंग पालटीत तोच स्वार्थ निःस्वार्थासारखा दिसू लागेल. निःस्वार्थ म्हणून ज्याला आपण म्हणतो, तोसुद्धा एका अर्थी स्वार्थच नाही का?
...
एखादा मोठा वंद्य पुरूष स्वार्थत्याग करतो याचा अर्थ स्वार्थत्याग करण्यात सुख असते, स्वार्थत्याग त्याने केला नाही तर त्याल दुःख वाटते.
...
याही पलीकडे जाऊन शास्त्रज्ञ भावनाशून्य अंतःकरणाने कसा विचार करतात हे पाहण्यासारखे आहे. प्लेटोने का कुणीसे म्हटले आहे, की 'आईसुद्धा मुलाला का पाजते, तर दुग्धधारा दाटून आल्याने तिच्या अंगच्या कळा कमी व्हाव्या म्हणून!' मी ज्या वेळी हे वाक्य वाचले तेव्हा ते मला अगदीच पटले नाही. वाटले, बोलून चालून निर्घृण हृदयाचा शास्त्रज्ञ! त्याने असे नाहीतर कसे उद्गार काढायचे? आईबद्दल असे उद्गार! मग जगातील इतरांना आपमतलबी म्हणायला ह्या शास्त्रज्ञांना काय कठीण जाणार आहे?
पण अनुभवाने जर या विचारसरणीकडे पाह्यचे म्हटले तर हे बरेचसे खरे असावे असे वाटू लागते. स्वत्वाची भावनाच मुळी स्वार्थ खेचून आणणारी आहे. 'माझं कुटुंब', 'माझी आई', 'माझे बाबा', 'माझा भाऊ', 'माझी बहीण' असे जेव्हा जेव्हा मी म्हणते, तेव्हा तेव्हा कुटुंबावर अथवा प्रत्येक व्यक्तीवर माझे जे प्रेम असते, ते स्वार्थावरचे अवगुंठण असते. स्वार्थच प्रेमाचा बुरखा घेऊन वावरत असतो. त्याच्यात काही चांगले-वाईट, किंवा काही तर-तम अशी प्रतवारी असणे, याचा परोक्ष वा अपरोक्ष संबंध 'माझ्या'शी असतो. माझ्यातला 'मी'वर त्याचा परिणाम होत असतो. तो सुखदायक परिणाम व्हावा म्हणूनच, म्हणजे स्वार्थानेच मी या सर्वांचे चांगले चिंतीत असते. त्या 'मी'वर यांचे चांगले होण्याचा परिणाम तितकासा सुखदायक होत नाहीसा झाला व माझेच केवळ चांगले होण्याने सुख होऊ लागले, की मी 'स्वार्थी' झाले. कारण इतरांच्या सुखाची मी उपेक्षा केली; ते थोडे फार कमी केले.
...
एकूण सर्वांचा सगळाच स्वार्थ नि सगळाच निःस्वार्थ. प्रश्न केवळ व्याप्तीचा! त्यामुळेच तो चांगला-वाईट ठरत असतो.