Friday, March 24, 2006

(तथाकथित) सुमार साहित्य आणि विंदा

मराठी साहित्यात मोजके अपवाद वगळता कसदार वाङ्मय निर्माणच झालेले नाही आणि ज्ञानेश्वर-तुकाराम-केशवसुत-मर्ढेकर सोडले तर युगप्रवर्तक(!) कवींचीही वानवा आहे, अशी ओरड अनेकदा ऐकू येते. समीक्षकांनी आणि भालचंद्र नेमाडेंसारख्या लेखकांनीही अशी विधाने केलेली आहेत. (मराठी सिनेमाला ऑस्कर कधी मिळणार या धर्तीवर मराठीत शेक्सपिअर का निर्माण होत नाहीत, या विषयावर अनेक वसंत-हेमंत-शिशिर व्याख्यानमाला रंगतात.) शिवाय लोकप्रिय लेखन हे सवंग लेखन, ते खरे अभिजात साहित्य नव्हेच अशीही एक धारणा प्रचलित आहे. सुहास शिरवळकर, बाबूराव अर्नाळकर तर सोडाच पण पु.लं, व.पु., जी. ए. कुलकर्णी यांच्यावरही असा शिक्का उठवायला मराठी समीक्षकांनी मागेपुढे पाहिलेले नाही. इंग्रजी साहित्याशी याची तुलना केली तर असे आढळेल की, जेफ्री आर्चर, सिडने शेल्डन, फ्रेडरिक फोरसिथ, जॉन ग्रिशम आणि तत्सम लोकप्रिय लेखकांना सहसा असे विनाकारण कमी लेखले जात नाही; तर अशाही वाचनव्यवहाराची निकड समाजाला आहे याचे भान बाळगले जाते. (संदर्भ - माझ्या कॉलेजमधील इंग्रजीचे एक मानद प्राध्यापक)

दलित साहित्याचा अपवाद वगळता, बहुतांशी लेखन हे मध्यमवर्गाभवती केंद्रित राहिले आहे असाही एक आरोप केला जातो. बहुतेक लेखक आणि वाचकही याच वर्गातून येत असल्याने तसे होणे अपरिहार्य आहेच. जसजसा मराठी माणूस इतर उद्योगांत हातपाय पसरू लागेल, देशोदेशींना भेटी देऊ लागेल तसतसे त्याच्या जाणीवांचे व अनुभवांचे क्षितिज विस्तारेल आणि या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटेल. अर्थात, हळूहळू का होईना तसे व्हायला सुरुवात झालेली आहेच. 'इडली, ऑर्किड आणि मी' व 'इजिप्तायन' या दोन पुस्तकांचे यावर्षी झालेले प्रकाशन आणि त्यांना लाभलेला उत्तम प्रतिसाद यासंदर्भात प्रातिनिधिक म्हणता येईल.

असो, या तथाकथित सुमार साहित्याविषयी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी विंदांना काय वाटते हे विजया राजाध्यक्षांनी त्यांच्याशी साधलेल्या संवादातून येथे वाचता येईल. (बहुपेडी विंदा - खंड १)

या तटस्थतेचा (लेखननिवृत्तीचा) आणखी काही परिणाम?

- फार महत्त्वाचा एक परिणाम आहे. सांगतो. आता मी स्वतः त्या खेळात नाही. हिरीरी उरलेली नाही. त्यामुळे भोवती जे काही चाललं आहे ते तटस्थपणे बघतो. ज्यांच्या लेखनाला काडीमात्र अर्थ नाही असे वाटत होते, त्यातला अर्थही जाणवू लागतो.

तो कसा काय?

- काही लोकप्रिय लेखकांचं उदाहरण घेऊ. मी ते वाचलेले नाहीत, वाचू शकत नाही, हे सोडा. पण असं वाटतं की, नवशिक्षित समाजासाठी या लेखकांची आवश्यकता आहे. त्यांची सांस्कृतिक भूक हे लेखक भागवतात. त्यांची वाचनाची सवय वाढवतात. सामान्य वाचक बिचारे स्वतःच्या आनंदासाठी वाचतात; कसलाही आव नसतो. 'उच्चभ्रू'पणाची ऐट आणणारी माणसं त्यांच्याहून अधिक घातक असतात. सामान्य माणूसही आपल्या कुवतीनुसार निवड करत असतो. आपण त्यांना काहीच कळत नाही असं कसं म्हणायचं? आणि उच्चभ्रूंना तरी सगळं कळतं असं कुठं आहे? वाचकांचे अनेक थर आहेत, यांतला कोणताही एक थर वंचित ठेवणं हे पाप आहे. म्हणून त्या लोकप्रिय लेखकांनी लिहू नये असं म्हणण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही. आपल्याला ते आवडत नसेल तर आपण वाचू नये. ही गुळमुळीत तडजोड नव्हे; ही जीवनाच्या वस्तुस्थितीची थोडी उशिराच घेतलेली दखल आहे. मी जोपर्यंत लिहीत होतो तोपर्यंत ही दखल मी घेतलेली नव्हती. लोकांनी हे वाचू नये, ते लिहूही नये, असा आग्रह असे. पण आता अनेक प्रकारच्या व अनेक दर्जाच्या लेखनव्यापारांची अर्थपूर्णता पटू लागली आहे.

आजच्या मराठी वाङ्मयाबद्दल तुम्ही एकंदरीने समाधानी आहात!

- अशी कल्पना करा की, वाङ्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते, त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणेच जंगलंही पाहिजेत, वाळवंटं पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडं पाहिजेत. जंगलाची शोभा त्यातच आहे! मराठी वाङ्मयाचं दुर्दैव हे, की या जंगलात महावृक्ष नाहीत. याचा अर्थ मराठीत व्यास-शेक्सपिअर-टॉलस्टॉय-डोस्टोव्हस्की नाहीत. ती तक्रार नाही. ते युगा-युगांनंतर येतात. पण आपल्याकडे त्यांच्या आसपास पोचतील असे वृक्षही नाहीत. याचं दुःख वाटलं पाहिजे. त्याऐवजी आपण दुःख कशाचं करतो? तर अमुक लेखक सामान्य लिहितात आणि ते वाचलं जातं, याचं! आपल्या साहित्यव्यवहाराचा एक भाग - एकमेकांना मोठं करणं, आणि दुसरा भाग - सामान्य लेखक सामान्य आहेत, हे पुनःपुन्हा सांगणं. खासगीत त्यांची टिंगल करणं. प्रत्येकालाच 'हॅम्लेट' आवडेल असं कुठे आहे हो? शेक्सपिअरनं असामान्यांना दिलं तसं सामान्यांनाही भरपूर दिलं. तो अभिरुचीच्या अधोगतीबद्दल कुढत बसला नाही. काव्यक्रांत्या वगैरे भानगडीतही पडला नाही. त्या तोलामोलाची प्रतिभा असली की अनेक गोष्टी आपोआप साधतात. जुन्या मराठी काव्यातील ज्ञानेश्वर व तुकाराम हीच दोन नावं मराठीनं जगात मिरवावी अशी. पण आमच्या ज्ञानबा-तुकारामाच्या गजराला आता ते संतही कंटाळले असतील! त्या जागतिक तोलामोलाचं आम्ही काय केलं?

यावर काही उपाययोजना?

- कवीनं मोकळ्या मनानं, कोणतेही पूर्वग्रह न बाळगता, समीक्षकांची किंवा इतर कसलीही दडपणं येऊ न देता - म्हणजेच आपल्या मस्तीत लिहीत राहावं अन् वाचकानं ते वाचत राहावं. मोठे कलावंत कोणत्याही बाह्य कारणामुळे निर्माण होत नाहीत. आपण मात्र साहित्याचा इतिहास शिकवताना ती कारणमीमांसा करतो. संगती लावून दाखवणं हे माणसाचं व्यसन असतं. रिनेसान्सची मूव्हमेंट, त्यातून मिळालेल्या प्रेरणा, इंग्लंडमधली वाङ्मयाची परंपरा, वगैरे. पण हे सगळं स्ट्रॅटफर्डमधल्या एका अर्धशिक्षित माणसापर्यंत कसं येऊन थडकलं हो? आणि तिथेच का भडकलं हो? त्याच्या ठिकाणीच हा उद्रेक का झाला? 'त्याच्या प्रतिभेमुळे' एवढंच त्याचं खरं उत्तर! किंवा त्याहूनही - त्याला उत्तर नाही, हेच खरं उत्तर!

(अंतर्नाद मासिक, मार्च २००६ अंक)

13 comments:

Gayatri said...

वा! लोकप्रिय साहित्याबद्दलच्या एका अतिशय प्रगल्भ दृष्टिकोनाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. :)

Rga said...

nandan,अंतर्नाद चा अंक इथे मिळू शकतो का? मी मनोगत वर वाचलेल आठवतय कि तो फ़क्त भारतातच उपलब्ध आहे.बाकी पोस्ट मी अजुन नीट वेळ मिळाला कि वाचेन.
आता विनोदी साहित्याबद्दल ही येवुदे ना थोडसं. चालेल ना अस सांगितल तर?:)

Nandan said...

हो, अंतर्नादचा अंक इकडे अमेरिकेतही मिळू शकतो. वार्षिक वर्गणी (दिवाळी अंकासहित) ३६० रूपये असून, परदेशातील अंकांसाठी वर्षाला ५०० रूपये अधिक द्यावे लागतील. (एकूण ८६० रू.) भारतातच पण महाराष्ट्राबाहेर अंक हवा असल्यास याहून बरीच कमी रक्कम लागेल. अधिक माहिती हवी असल्यास माझ्याकडे संपादकांचा इमेल पत्ता आहे, तो मी कळवू शकेन.

फक्त वर्गणीचा धनादेश भारतीय चलनात पाठवावा लागेल. हे साधणे कठीण असल्यास भारतातील आपल्या ओळखीची व्यक्ती हे काम करू शकेल. धनादेश वा ड्राफ्ट Antarnaad च्या नावे काढता येईल आणि C2, Garden Estate, Near Wireless Colony, औंध, पुणे ४११ ००७ या पत्त्यावर पाठवता येईल.

विनोदी साहित्यावर लिहायचा नक्कीच प्रयत्न करेन. आपल्या सूचना आणि अभिप्रायांचे स्वागतच आहे.

Ajit said...

सहीच!

"मराठी साहित्य" या मुख्य शीर्षकाला साजेसे असे हे post वाचून आनंद झाला.

शेवटी साहित्य म्हणजे काय? जे मनाला भेदून जाते, आनंद देऊन जाते, विचार प्रवर्तन करते, आणि कुठेतरी काहीतरी चांगले देऊन जाण्याची महत्त्वाकांक्षा ठेवते ते साहित्य! मग तो छोटासा विनोद असो वा महाकाव्य. मला विचारशील तर मला जसे अनेक प्रकारचे संगीत आवडते, तसे अनेक प्रकारचे साहित्यही. त्यात चांगले-वाईट, उच्च-हीन दर्ज्याची चर्चा सारखीसारखी आणू नये असे मला वाटते.

पुढेमागे कधीतरी मी या विषयावर लिहिन म्हणतो :-)

Prachi said...

Good article and analysis. Jar lokanni etaranna kami lekhanyapeksha swatah kahi changle kele tar far bare hoil.

Rga said...

http://www.manogat.com/node/5088
नंदन आत्ताच ही बातमी वाचली. खुपच आनंद झाला.:) अभिनंदन आणि तुम्हाला असचं आणखी लिहिण्यासाठी शुभेच्छा.

Nandan said...

अजित, नक्की लिही. तुझा या विषयावरील लेख वाचायला आवडेल. प्राची, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि रजनीगंधा, आपल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार.

शैलेश श. खांडेकर said...

सुरेख लेख, नंदन! साहित्यावर अशा प्रकारे चर्चा होऊनच संवादातून चांगल्या रचना निर्माण होतील.

Kaustubh said...

फार सुंदर. छान वाटलं वाचून.

आदित्य पानसे said...

नंदन, हा विषय माझ्याही मनात बरेच दिवस खदखदत होता, त्याला तोंड फोडल्याबद्दल आभार.

कै. सुहास शिरवळकर एका प्रकट मुलाखतीत म्हणाले होते, की त्यांच्यासारख्या वाचकप्रिय लेखकाला नेहेमी साहित्याच्या दरबारात द्वारपालासारखी वागणूक दिली जाते. मध्यंतरी नारायण धारपांनी हीच खंत व्यक्त केली.

आणि मराठी समीक्षक 'समीक्षेसाठी समीक्षा' ('कलेसाठी कला' या धर्तीवर) करतात. उदा. (किंचित विषयांतर) 'साप्ताहिक सकाळ' मध्ये श्री. माधव वझे यांची नाट्यसमीक्षा प्रकाशित होते. माझे निरीक्षण आहे, की त्यातील सुमारे ७०% रंगभूमी-पारिभाषिक शब्द चक्क डोक्यावरून जातात.

--
आदित्य पानसे

rupesh said...

sundar!!!!!
:)

Ram said...

great

संदीप चित्रे said...

छान शोधलं आहेस. सुहास शिरवळकरांनी काही खूप मोठे विचार सामान्य लोकांच्या भाषेत लिहिले आहेत.
तू त्यांचं ’दुनियादरी’ वाचलं आहेस का?