Friday, January 27, 2006

मर्ढेकरांची मुंबई


न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा


बा. सी. मर्ढेकरांची ही मुंबईवरील कविता शालेय अभ्यासक्रमात कधीतरी होती (बहुतेक ९वी \ १० वी). 'पिपांत मेले'सारख्या दुर्बोध कविता लिहिणारे मर्ढेकर आणि अशी विलक्षण जिवंत कविता लिहिणारे मर्ढेकर हे दोन वेगवेगळे कवी वाटावेत इतक्या या कविता भिन्न आहेत.

मुळातच ही कविता एका निराळ्याच प्रसन्न आणि चपखल उपमेने सुरू होते. त्यानंतर 'काळोखाच्या उशीवरून डोके उचलणारी घरे', 'लाटांमधून सूर्य वेचणारे सागरपक्षी', 'साखरझोपेतील फिरंगी बोटी', 'भुर्‍या शांततेचा निशिगंध' यासारख्या प्रतिमा डोळ्यासमोर उमलती सकाळ उभी करतात. मला वाटते, स्वभावोक्ती अलंकाराचे (एखाद्या जागेचे, प्राण्याचे वा लहानशा घटनेचे सार्‍या बारकाव्यांनिशी केलेल सखोल वर्णन) ही कविता एक उत्तम उदाहरण ठरावे.

तिसर्‍या कडव्यापर्यंत मुंबई बंदराचे वर्णन चढत्या क्रमाने येते आणि शेवटचे कडवे स्वप्नातून वास्तवात आणते. ही शांतता, ही गुलाबी थंडी केवळ अजून काही काळ टिकेल आणि मग नित्याचे रहाटगाडगे सुरू होईल याची जाणीव करून देते.

बंदरासारख्या रूक्ष ठिकाणावर अशी कविता लिहायला मर्ढेकरांचीच कविप्रतिभा हवी. ही कविता पाठवल्याबद्दल कांचनचे विशेष आभार.

15 comments:

Ajit said...

"गरम चहाचा पट्टी गंध" वाचून मजा वाटली- "गरम चहाचा पत्ती गंध" च्या ऐवजी स्पेलिंग मिस्टेकमुळे असे झाले असावे :) असो.

अभ्यासक्रमातील ही कविता फक्त प्रश्नोत्तरांच्या पलिकडे जाणाऱ्या काही निवडक कवितांपैकी एक आहे. धन्यवाद!

Nandan said...

अजित, चूक निदर्शनाला आणून दिल्याबद्दल आभार. आता तुला, 'पट्टीचा' वाचक म्हणावे लागेल. :)

आशिष अनिल said...

शाळेत असताना काही कविता, लेख मनात घर करून गेले. कणा, धुणं (रा. रं. बोराडे, माझ्या मराठवाड्यातले बरं का!), नरींद्रदासा भेटिं अनुसरण (i simply lov it!), शांताबाईंची 'पैठणी' आणि मर्ढेकरांची ही कविता 'पितात सारे गोड हिवाळा'! पण का काय माहीत मी कधी पाठ्यपुस्तकांपलिकडे जास्त वाचन केलंच नाही. पण मला खेद नाही, साहित्याला वाहून दिलेले इतके छान छान ब्लॉग्स आहेत ना! नंदन, तू असं का नाही करत, तुला आवडणा-या काही निवडक कविता पोस्ट कर ना शक्य असेल तर..

Shailesh S. Khandekar said...

नंदन,

सुंदर कवितेवर केलेले तितकेच सुंदर भाष्य! मर्ढेकरांचा हा वेगळा पैलु प्रकाशात आणल्याबद्दल आपणांस धन्यवाद!

खरं तर ही नोंद इतकी सुरेख आहे की किमान ३-४ वेळा वाचन करूनही पुन्हा वाचावीशी वाटते.

Nandan said...

आशिष, या अनुदिनीत आधीच्या नोंदींमध्ये माझ्या आवडीच्या कविता मी दिलेल्या आहेतच. अजून जमतील तशा देत राहीनच. इकडे माझ्याकडे संदर्भासाठी पुस्तके नसल्यामुळे एकतर माझ्या स्मरणशक्तीवर अवलंबून रहावे लागते किंवा इतर कोणी कविता पाठवायची वाट पहावी लागते. त्यामुळे कधीकधी अपेक्षित वेग राखणे शक्य होत नाही. :-(

शैलेश, तुमचे प्रोत्साहन अतिशय मोलाचे आहे. आशिष म्हणतो तसे आपण 'वाचत रहाल, टचात रहाल' अशी आशा करतो.

Akira said...

Nandan,

Tujhi comment milayala aani mee naveen post takayla ekach gath padli... :)

Aso...I have been away for a while...need to catch up my reading on blogs too....

TC

शैलेश श. खांडेकर said...

अवश्य नंदन! आपला नवीन लेख कधी येतोय याची आम्ही आतुरतेने प्रतिक्षा करतोय. आपल्याला लवकर सवड मिळेल व एक चांगली नोंद लिहावयास मिळेल हीच सदिच्छा.

mangesh ghogle said...

junya aathvani jagya kelyabaddal aabhari ahe !!!!!

mi Mangesh. Mi pan ek blog open kela ahe ... have posted "kana" there.

can anyone get "Vijaystambh" ?? (laghunibandh that we had in 10th... "mi shanticha upasak ahe")

Manjiri said...

वा! एक वेगळी कविता आहे ही. मर्धेकरांच्या कवितेबद्दल मझे एक निरीक्षण. त्यांची वैज्ञानीक द्रुष्टी त्यांच्या कवितेतुन डोकावते. मी असे म्हणण्याचे कारण,
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती

त्यांच्या इतर कवितांमध्ये अश्या ओळी आहेत. त्या कविता हाताशी नाहीत. मिळाल्यास जरुर उदाहरण देईन.

Nandan said...

शैलेश, अकिरा, मंगेश आणि मंजिरी; आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार. 'विजयस्तंभ' माझ्या वाचनात आल्यास नक्की येथे नोंद करेन. मंजिरी, तुमचे म्हणणे खरे आहे. मर्ढेकर जरी असामान्य कवी असले, तरी त्यांची वैज्ञानिक दृष्टी ही तितकीच सजग होती. गंगाधर गाडगीळांनी त्यांच्यासोबत मुंबई आकाशवाणीत काम करताना आलेल्या अनुभवांचे जे चित्रण केले आहे, त्यातून ही बाब विशेषत्वाने जाणवते. तुम्हांला जर इतर कवितांमध्ये असे संदर्भ आढळले तर नक्की कळवा.

prasadb said...

'पिपात मेले' या कवितेला दुर्बोध म्हणालात याचा जरा विशाद वाटला. काही कारणास्तव मर्ढेकर अभ्यासायला घेतले आणि थक्क झालो. असे म्हणावे लागेल की हा एक काळाच्या आधी होऊन गेलेला कवी. आजच्या काळात ते असते तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. परदेशात त्यांच्या नावाने पुरस्कार दिले गेले असते. आपले दुर्दॆव की आपल्याला मर्ढेकर कळलेच नाहीत.

Nandan said...

प्रतिसादाबद्दल आभार, प्रसाद. मराठी कवितेच्या दृष्टीने मर्ढेकर हे एक निःसंशय युगप्रवर्तक कवी आहेत. त्यांच्या काही कविता समजण्यास कठीण असल्या तरी त्यामुळे त्यांच्या महत्तेला अजिबात बाधा येत नाही. 'पिपांत मेले' कविता ही कामगार/मध्यमवर्गाच्या साचेबद्ध जीवनावर केलेले भाष्य आहे असे सर्वसामान्य मत असले तरी बव्हंशी ती समजणे थोडे कठीणच जाते. मर्ढेकरांच्या कवितांवर सखोल संशोधन करणारे म. वा. धोंड (जाळ्यातील चंद्र) यांनी काही वर्षांपूर्वी म.टा.मध्ये एक मोठा लेख लिहून या कवितेची समीक्षा करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचाही सर्वसाधारण निष्कर्ष असाच होता. असो, मर्ढेकरांच्या कवितांबद्दल तू काही लिहिलेस तर वाचायला नक्कीच आवडेल. पु.लं. आणि सुनीताबाई त्यांच्या कवितांच्या वाचनाचा काही वर्षांपूर्वी प्रयोग करत असत, त्या प्रयोगाविषयी आणि त्यात निवडलेल्या कवितांविषयी काही अधिक माहिती वाचायला मिळाली तर उत्तमच.

Yogen Deshpande said...

Great Blog! Keep it up.
- Yogen.

Anonymous said...

mala koni sangel ka ki me marathi madhe type kase karu

Nandan said...

धन्यवाद योगेन. अनामिक - मराठी टंकलेखनासाठी www.baraha.com येथे विनामूल्य फॉन्ट्स उपलब्ध आहेत. दुसरा उपाय म्हणजे www.manogat.com सारख्या मराठी संकेतस्थळांवर जाऊन तेथे मराठीत लिहिणे आणि इच्छित स्थळी चिकटवणे.