Thursday, January 26, 2006

प्रसंगी अखंडित वाचीत जावे...

माझ्या घरापासून काही अंतरावर 'बार्न्स अँड नोबल' हे पुस्तकांचे मोठे दुकान आहे. केवळ पुस्तके विकत घ्यायचे दुकान असे त्याचे स्वरूप नाही, तर लोकांना वाचनाची आवड लागावी आणि ती टिकून रहावी यासाठी कायम वेगवेगळे उपक्रम (मग ते विक्री वाढावी, म्हणून का असेनात)तेथे राबवले जातात. यातील 'बुक क्लब' किंवा 'मीट द रायटर' यासारखे कार्यक्रम काही प्रमाणात महाराष्ट्रातही होतात. ठाणे/डोंबिवलीत सुमारे २५-३० निवृत्त स्त्रिया एकत्र जमून पुस्तकांची भिशी करतात आणि आपल्या वाचनात आलेल्या पुस्तकांबद्दल इतरांना माहिती देतात तसेच अनौपचारिक चर्चा घडवून आणतात. अनेक प्रकाशनसंस्थाही नवीन पुस्तक प्रकाशित करताना लेखकाबरोबर खुली चर्चा घडवून आणतात. या गोष्टी तशा लहान-सहान वाटल्या तरी त्यांनी वाचनसंस्कृती रूजण्यास मदत होते.

येत्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. मारूती चितमपल्ली यांची मुलाखत लोकसत्तेत वाचत होतो. त्यात त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. त्यांच्या मते, वाचकांत आपण वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलण्यात एक प्रकारचा निरूत्साह असतो. आपण किती जणांना 'सध्या काय वाचताय?' असे विचारतो किंवा नुकत्याच वाचलेल्या पुस्तकांबद्दल बोलतो? अर्थातच, याबाबत इंग्रजीशी तुलना अप्रस्तुत ठरेल, पण तिच्यातील साहित्य-व्यवहारातून शिकण्यासारखे बरेच आहे. वानगीदाखल, हे संकेतस्थळ पहा. याचे एकदा सभासद झालात, की तुम्ही वाचलेल्या कुठल्याही पुस्तकाबद्दल चर्चा करू शकता आणि तुमच्या कलानुसार, अजून कुठली पुस्तके तुम्हांला आवडतील याचीही शिफारस केली जाते.

या सर्व गोष्टींची चर्चा करण्यामागचे प्रयोजन म्हणजे, म.टा. मध्ये माझ्या वाचनात आलेली २००५ मधील मराठीतील बेस्ट सेलर्स पुस्तकांची यादी. इंग्रजीत अशा बर्‍याच याद्या प्रकाशित होत असतात, पण मराठीत तरी प्रथमच अशा स्वरूपाची यादी माझ्या वाचनात आली आणि या प्रयत्नाचे कौतुक वाटले. तीच यादी येथे देत आहे. आपल्या वाचनात यातील काही पुस्तके आली असतील तर त्याविषयी आपण अभिप्राय दिल्यास ऋणी राहीन.

मराठी बेस्ट सेलर्स २००५ -

माणसं जोडावी कशी? - शिवराज गोर्ले
ताठ कणा - डॉ. पी. एस. रामाणी
ही आपलीच माणसं - मंगला खाडिलकर
इजिप्तायन - मीना प्रभू
बाकी शून्य - कमलेश वालावलकर
बापलेकी - संपादित (मौज प्रकाशन)
हिंदुत्व - नीलकंठ खाडिलकर
नातिचरामि - मेघना पेठे
खटलं आणि खटला - शिरीष कणेकर
देशोदेशीचे - शिवाजीराव भोसले
महामानव आईनस्टाईन - डॉ. विद्यासागर पंडित
अवनत होई माथा - डॉ. संजय ओक
चित्रायन - साधना बहुळकर
एका खेळीयाने - दिलीप प्रभावळकर
गाणी बजावणी - अभिजीत देसाई
चकवाचांदणं - मारूती चितमपल्ली
बिनचेहऱ्याची माणसं - अशोक बेंडखळे
एक होता गोल्डी - अनिता पाध्ये
ही श्रींची इच्छा - श्रीनिवास ठाणेदार
सुंदर ते मन - कमलिनी फडके
साहित्यिकांचे अंतरंग - रत्नप्रभा जोशी
ओमेता - अनिल काळे
प्रज्ञावंतांची दैनंदिनी - संपादित (निहार प्रकाशन)
पैठणी - विजया वाड
गोष्टी माणसांच्या - सुधा मूर्ती
धनंजय - राजेंद्र चेर
फॅमिली डॉक्टर - डॉ. बालाजी तांबे
शाळा - मिलिंद बोकील
भयंकर सुंदर मराठी - डॉ. द.दि.पुंडे
द अल्केमिस्ट - (अनुवाद) नितीन कोतापल्ले
बॅरिस्टरचं कार्ट - हिंमतराव बाविसकर
मजेत जगावं कसं - शिवराज गोर्ले
जगण्यातील काही - अनिल अवचट
दिसलं ते - अनिल अवचट
संभाजी - विश्वास पाटील
ब्र - कविता महाजन
मौनाची भाषांतरे - (कवितासंग्रह) संदीप खरे

12 comments:

maayboli said...

खुपच छान लेख. मराठीमध्ये असे अनेक ब्लाँग यावेत हिच सदिछ्या.

कृपया ह्या ब्लाँगला (http://maaybolimarathi.blogspot.com) भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रीया द्या.
धन्यवाद.
मायबोली.

Shailesh S. Khandekar said...

"इजिप्तायन" एकदा वाचण्याजोगे नक्कीच आहे.

आशिष अनिल said...

बेस्ट सेलर्सची यादी प्रकाशित करणे खरोखरीच कौतुकास्पद आहे. तू ठाण्या-डोंबिवलीच्या स्त्रियांविषयी लिहिलं आहेस ना, त्यावरून मला माझ्या ठाण्यातल्याच माझ्या एका मित्राचे वडील आठवले. त्यांचं नाव श्रीपाद आगाशे. आपली नोकरी सांभाळून हे गृहस्थ दरवर्षी 'दिवाळी अंका'ची घरपोच library चालवतात. नफा तर सोडच, त्यांना त्यातून नेहमी आर्थिक तोटाच होतो. तरीही त्यांचा हा उपक्रम नित्यनेमाने चालू आहे..

Rga said...

मजेत जगावं कसं - शिवराज गोर्ले
गोष्टी माणसांच्या - सुधा मूर्ती
नातिचरामि - मेघना पेठे
ही वाचली आहेत मी.
बापलेकी,इजिप्तायन ही लवकरच वाचेन.
यादी वाचुन खरच बर वाटल.

Nandan said...

आपणा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. यापुढेही आपल्या वाचनात एखादे चांगले पुस्तक आले तर कृपया अवश्य कळवावे.

Aditya said...

I don't have the Devnagari font, and so, have to type my comment in English. The list you have published is certainly helpful and a ton of thanks are due to you! Thank you!

मनोज said...

हाउ टू प्रकारची पुस्तकं हल्ली मराठीत यायला लागली आहेत. शिव खेडा यांचं बहुचर्चित यू कॆन विन मेक्मीलननं मराठीत आणलं तेंवापासून हे सुरू झालं. गोर्ले यांची दोन्ही पुस्तकं बेस्ट्सेलर आहेत असं बुकस्टोअरवाल्यांच म्हणणं आहे.

आदित्य पानसे said...

शाळा हे अत्यंत सुंदर पुस्तक आहे, हे सर्वश्रुत आहे. नंदन यांनी त्याबद्दल मागे लिहिलेसुध्दा होते.

दिसले ते हे अनिल अवचटांचे पुस्तक त्यांच्या नितळ मनाचा आरसा आहे. जरूर वाचा...

Nandan said...

आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार.
Aditya, देवनागरी फॉन्ट्स www.baraha.com येथे मिळतील किंवा www.manogat.com या संकेतस्थळावर मराठीत लिहून अन्यत्र चिकटवता येईल.

मनोज, 'हाऊ टू' प्रकारची पुस्तके अधिक लोकप्रिय आहेत हे खरे आहे. मागे एका लेखात समीक्षकांनी याविरूद्ध गळा काढला होता आणि हे साहित्य खरे साहित्य नव्हेच असेही म्हटले होते. काहीही असले, तरी याने वाचनाची सवय लागू शकते ही याची सर्वात जमेची बाजू आहे, असे मला वाटते.

आदित्य, 'दिसले ते' या पुस्तकाबद्दल तू अधिक विस्ताराने लिहू शकलास तर वाचायला नक्कीच आवडेल. सध्या त्यांचे 'जगण्यातील काही' हे पुस्तक हाती लागले आहे. त्याबद्दल शक्य झाल्यास येथे नोंद करेनच.

amity said...

मी बरेच दिवस नवी वाचनीय मराठी पुस्तकांची यादी शोधत होतो. हा ब्लॉग खरंच उपयोगी पडेल.. मनापासून आभार.. :)

varsha said...

chan aahe avadle marathi book shi mahiti kaiate

varsha said...

yunamdhara,svami, varda nambar 5kem.hi book chan ahet