Sunday, February 26, 2012

कुसुमाग्रज आणि त्यांचे समकालीन कवी

कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा 'जागतिक मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. ह्या निमित्ताने 'मायबोली' या संकेतस्थळावर 'एक होते कुसुमाग्रज' हा उपक्रम राबवण्यात आला. त्यात लिहिलेला हा लेख -


. . .

आधुनिक मराठी कवितेच्या जनकाचा मान निर्विवादपणे केशवसुतांचा. संत-पंत-शाहिरी काव्य ह्या मर्यादेत अडकून पडलेल्या काव्यक्षेत्राला, त्यांच्या 'जुने जाऊद्या मरणालागुनि' ह्या भूमिकेचे रणशिंग फुंकणार्‍या 'तुतारी'ने खडबडून जागे केले. एकोणिसाव्या शतकाच्या सरत्या काळात इंग्रजी साहित्याशी येऊ लागलेला संपर्क, युरोपातील 'रोमँटिसिझम'सारख्या नव्या शैलीशी झालेली ओळख आणि तुरळक प्रमाणात का होईना; पण ह्या नवीन बदलांना अनुकूल प्रतिसाद देणारा वाचकवर्ग ह्यासारखे काही घटक बहुतांशी पारलौकिक सृष्टीभवती घुटमळणार्‍या पारंपरिक कवितेला नवीन वळण देणारे ठरले. गोविंदाग्रजही थोड्याफार फरकाने ह्याच नव्या मनूतले कवी म्हणता येतील.

पुढे रविकिरण मंडळासारखे प्रयोग जरी मराठी कवितेला फारशी निराळी दिशा देऊ शकले नसले तरी ती अधिक लोकप्रिय होण्यात त्यांनी हातभार लावला. त्यानंतरचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल, अशी मर्ढेकर - बोरकर - कुसुमाग्रज ही कवींची त्रयी दोन महायुद्धांमधल्या अस्वस्थ काळात उदयाला आली. वयात जेमतेम काही महिन्यांचे अंतर असणार्‍या ह्या तिघांच्या कवितांची शैली, वर्ण्यविषय आणि दृष्टिकोन जरी निरनिराळे असले तरी त्यांच्या कविता मराठी साहित्याला समृद्ध करून गेल्या, याबद्दल दुमत नसावं.

. . .

कवितेच्या आकृतिबंधात वेगवेगळे प्रयोग करून पाहणार्‍या, विविध विषय समर्थपणे हाताळणार्‍या ह्या तीन कवींना एखादं सोयीस्कर लेबल चिकटवण्याचा प्रयत्न कधी कधी होतो; तो अर्थातच अन्याय्य आहे. निसर्गकविता आणि रमल प्रेमकाव्य लिहिणार्‍या बोरकरांना कधी 'रसलंपट मी तरी मज अवचित गोसावीपण भेटे'चा साक्षात्कार होतो. 'हा इथला मज पुरे फवारा' म्हणणार्‍या मर्ढेकरांना 'जरा असावी मरणाचीही, अमोघ आणिक दुबळी भीती; जरा आतड्यांमधून यावी, अशाश्वताची कळ ओझरती' असं वाटून जातं. तर 'तव आन्तर अग्नी क्षणभर तरी फुलवावा' ही आकांक्षा मनी बाळगणारी कुसुमाग्रजांची काव्यप्रेरणा 'किनार्‍यावर' सारखी तरल प्रेमकविता लिहून जाते.

एरवी 'तरीही येतो वास फुलांना' इतपत आशेची धुगधुगी असणारे मर्ढेकर 'किती चातक-चोचीने प्यावा वर्षाऋतू तरी' म्हणत आषाढ-श्रावणाचं प्रसन्न स्वागत करतात; तर 'मनातले सल रूजून आता, त्याचा झाला मरवा रे' असं 'सरीवर सरीं'चं उत्फुल्ल वर्णन करणारे बोरकर कधी त्या कुंद, पावसाळी हवेचा विरागी मूड 'सुखा नाही चव लव वठलेली आहे, दु:खा नाही भार धार बोथटली आहे' अशा मोजक्या शब्दांत नेमका रेखाटतात. सभ्य, संयत कुसुमाग्रजांना क्वचित 'असे मवाली पाहुनि होतो, मीही काही वेळ मवाली; विडी कुणाची बसतो फुंकित, आडोशास पुलाच्या खाली' असा परकायाप्रवेश करावासा वाटतो.

. . .

असं असलं, तरी ह्या तिन्ही कवींची काही व्यवच्छेदक लक्षणं ओळखता येतात. साध्या आगगाडीचंच उदाहरण घ्या. कुसुमाग्रजांच्या कवितेत ती जुलमी, उद्दाम सत्तेचे रूपक म्हणून येते ('आगगाडी आणि जमीन'). बोरकरांच्या 'चित्रवीणा' ह्या कवितेतला निवेदक गाडीत बसून आजूबाजूचा निसर्ग न्याहाळतो, दृश्यं आठवणीत साठवून घेतो. गाडीचं ह्या कवितेतलं प्रयोजन केवळ एक साधन म्हणून ('घाटामध्ये शिरली गाडी आणि रात्रीचा पडला पडदा, पण चित्रांची विचित्रवीणा अजून करते दिडदा दिडदा'); तर मर्ढेकरांच्या कवितांतून ती शहरातल्या संवेदना बधीर करणार्‍या गतानुगतिकतेचे प्रतीक म्हणून येते. ('सकाळीं उठोनि | चहा-कॉफी प्यावी | तशीच गाठावी | वीज-गाडी ||)

एकंदरीतच जर या कालखंडातल्या कवितेचं ढोबळमानाने वर्गीकरण करायचं झालं, तर ते आत्माविष्कार करणारी कविता आणि विश्वाविष्काराचा वेध घेणारी कविता, असं करता येईल. 'जे पिंडी ते ब्रह्मांडी' ह्या न्यायाने ही विभागणी काही हवाबंद कप्प्यांसारखी संपूर्ण निराळी किंवा सकृद्दर्शनी वाटते तितकी परस्परविरोधीही नाही. तसं पाहिलं तर, प्रत्येक माणसाचे आयुष्य ही त्याच्यापुरती का होईना - पण छोट्या, छोट्या अनन्यसाधारण घटनांची एक साखळी असते. जितक्या बारकाईने त्या साखळीकडे पहावे, तितक्याच स्पष्टपणे त्यामागचे 'विश्वाचे आर्त' एखाद्या प्रतिभावंताला उलगडत जाते. 'व्हॉट इज मोस्ट पर्सनल, इज मोस्ट युनिव्हर्सल' असं ह्या प्रक्रियेबद्दल म्हणता येईल. कमीअधिक प्रमाणात, ह्या तिन्ही कविवर्यांच्या लेखनात याचा पडताळा येतो.

कवितेच्या मुख्य प्रवाहाच्या दृष्टीने विचार केला, तर मर्ढेकर हे या तिघांतले सर्वाधिक बंडखोर कवी. महायुद्धाच्या विध्वंसात होरपळलेले जग, औद्योगिक क्रांतीमुळे शहरांकडे झुंडीने आलेल्या लोकांचं बेकलाईटी सहनौटरक्तु जगणं ह्यासारखे विषय; 'शतशतकांच्या पायलन्सवर टिंबे देऊन बसलेले कावळे', 'दिव्यांनी पंक्चरलेली रात्र' ह्यासारख्या खास महानगरी प्रतिमा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संदर्भ त्यांनी मराठी कवितेत आणले. 'रोमँटिसिझम'च्या प्रभावाखाली असलेल्या तत्कालीन मराठी कवितेला वास्तववादी आणि विज्ञाननिष्ठेचं परिमाण त्यांच्या कवितांमुळे मिळालं.

'मराठी साहित्याला आजवर इतकी वळणं मिळाली आहेत, की त्याचा मुख्य प्रवाहच हरवून गेला आहे', असं विनोदाने म्हटलं जातं. बोरकरांची कविता ह्या विधानाला अपवाद ठरते. गोव्याचा समृद्ध निसर्ग; संतवाङ्मयाचा आध्यात्मिक वारसा आणि पोर्तुगीज राजवटीमुळे लॅटिन संस्कृतीचे झालेले संस्कार; गांधीवाद; कोकणीची अंगभूत नादमयता; पंचेद्रियांना सुखावणारे अनुभव घेतानाच आयुष्याला उदात्ततेचाही स्पर्श असावा ही लागलेली ओढ - अशा निरनिराळ्या घटकांचा बोरकरांच्या कवितेवर प्रभाव पडलेला दिसतो. ऐहिकता आणि परमार्थ ह्यात पराकोटीचे द्वैत आहे, अशी समजूत प्रचलित असण्याच्या काळात त्यांची कविता 'पार्थिव्यातच वास हवा, परि दिव्याचा हव्यास हवा' असं सांगते. ज्या गोव्याच्या भूमीत चांदणं माहेरा येतं, तिथेच 'खोल आरक्त घावांत, शुद्ध वेदनांची गाणी'ही ती गुणगुणते. 'दादाईझम'शी दूरचं नातं सांगणारी मर्ढेकरांची कविता, महानगरी साचेबद्ध जीवन जर 'मी एक मुंगी, हा एक मुंगी' सारख्या ओळींतून प्रकट करत असेल; तर बोरकरांची सौंदर्यलक्ष्यी दृष्टी 'प्रति एक झाडामाडा त्याची त्याची रुपकळा, प्रति एक पानाफुला त्याचा त्याचा तोंडवळा' सांगत आपलं लक्ष वेधून घेते.

कुसुमाग्रजांच्या कवितेकडे ह्या दोन्ही काव्यप्रवाहांशी नातं जोडून असणारी आणि तरीही स्वतःची अशी खास वैशिष्ट्यं जपणारी, म्हणून पाहता येईल. मर्ढेकरांच्या कवितेप्रमाणे ती पारंपरिक सौंदर्यवादी कवितेहून पूर्ण निराळा मार्ग निवडत नाही आणि बोरकरांच्या तरल, 'लिरिकल' कवितांइतका व्यक्तिगत भावनांचा वेधही घेत नाही. याचा अर्थ त्यांनी प्रेमकविता लिहिल्या नाहीत; किंवा ज्या लिहिल्या त्या कोरडेपणाने लिहिल्या आहेत, असं नाही. पण अशा बहुतांश कवितांवर एक जाणत्या, दूरस्थपणाची छाप आहे. वैयक्तिक भावनांचा म्हणा किंवा संवेदनशील मनाच्या व्यक्तीच्या प्रतिक्रियांचा म्हणा - आपल्या आजूबाजूच्या समाजात किंवा राष्ट्रीय/जागतिक स्तरावर होणार्‍या घडामोडींशी एक सामाजिक संवाद ते आपल्या कवितेतून साधतात. परिणामी 'होते म्हणू स्वप्न एक, एक रात्र पाहिलेले; होते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेले' ह्यासारख्या ओळी मग निव्वळ कवीच्या राहत नाहीत. शिवाय ह्यामागे चतुर कारागिरी किंवा अभिनिवेशी भूमिका नाही. आपल्या प्रकृतिधर्माप्रमाणे निवडलेला मार्ग संयत ठामपणे चोखाळत रहावा, तशी तिची वाटचाल आहे.

कुसुमाग्रजांच्या चतुरस्र साहित्यिक कारकीर्दीत, वाचकांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व 'विशाखा'ला असण्यामागचे हे एक कारण असू शकेल. १९४२ सारख्या अस्वस्थ वर्षात प्रसिद्ध झालेला हा कवितासंग्रह. 'चले जाव'चे आंदोलन, क्रांतिकारकांचे बलिदान, दुसर्‍या महायुद्धाचा उडालेला भडका, स्वातंत्र्याची चाहूल लागलेली असली तरीही समाजात असलेली विषमता इ. अनेक गोष्टींचे पडसाद त्यात उमटले आहेत. पण त्याचबरोबर निसर्गकविता आणि प्रेमकविताही आहेत. 'कोलंबसाचे गर्वगीत'मधला दुर्दम्य आशावाद आणि 'मातीची दर्पोक्ती' व 'पाचोळा'मधली चक्रनेमिक्रमेणची अटळ जाणीव; सैगलच्या सुरांना मानवता जागवण्यासाठी घातलेली साद आणि 'पृथ्वीच्या प्रेमगीता'तली तेजाची उत्कट ओढ; केशवसुतांच्या प्रतिमांना मानवंदना द्यावी तशा आलेल्या 'हा काठोकाठ कटाह भरा!' आणि 'काळोखावर तेजाची लेणी खोदीत बसलेला देवदूत' ह्या ओळी; अहि-नकुलातले नाट्य आणि 'गोदाकाठचा संधिकाल'मधली चित्रदर्शी शैली; 'क्रांतीचा जयजयकार'मधली चेतना आणि 'लिलाव' कवितेतली विखारी हतबलता; प्रतापराव गुजरांच्या आवेशी पण आत्मघातकी हल्ल्याचे रचलेले स्तोत्र आणि बाजीप्रभूंसारख्या लढवय्याच्या मनातही अखेरच्या क्षणी 'सरणार कधी रण' हा डोकावून गेलेला प्रश्न -- वरवर व्याघाती, परस्परविरोधी वाटतील अशा विषयांवरच्या कविता आपल्या समर्थ शब्दकळेने आणि समर्पक प्रतिमांनी वाचकांसमोर मांडणारे फार कमी कवितासंग्रह असावेत. अलेक्झांडर पोपचे शब्द उसने घेऊन सांगायचं झालं तर 'What oft was thought, but ne'er so well express'd' हा निकष जर कवितांना लावायचा झाला; तर त्यात 'विशाखा'चे स्थान फार वरचे असेल.

Thursday, September 01, 2011

वाचणार्‍याची रोजनिशी


सॉमरसेट मॉमच्या 'द बुक बॅग' ह्या कथेत वाचनाबद्दल सुरेख भाष्य आहे - 'Some people read for instruction, which is praiseworthy and some for pleasure, which is innocent; but not a few read from habit, and I suppose that this is neither innocent or praiseworthy. Of that lamentable company am I.' वाचनाच्या छंदाचं हळूहळू सवयीत - किंवा खरं तर व्यसनात - रूपांतर कसं होत जातं आणि ज्ञानवर्धन किंवा रंजन हे हेतू कसे मागे पडत जातात यावर भाष्य करणारे हे उद्गार. अशा काही मोजक्या, भाग्यवान वाचकांचे पुस्तकांबद्दलचे किंवा एकंदरीतच साहित्यव्यवहाराविषयीचे अनुभव वाचणं, ही देखील एक पर्वणी असते. एलकुंचवारांनी लिहिलेलं 'पश्चिमप्रभा' किंवा विद्याधर पुंडलिकांचं 'शाश्वताचे रंग' ही लगेच आठवणारी काही उदाहरणं.

'वाचणार्‍याची रोजनिशी' हे सतीश काळसेकरांनी लिहिलेलं पुस्तक हाच वारसा समर्थपणे पुढे नेतं. 'इंद्रियोपनिषद', 'साक्षात', 'विलंबित' हे कवितासंग्रह लिहिणारे काळसेकर सिद्धहस्त कवी आहेतच, मात्र त्याशिवाय साठच्या दशकात उदयास आलेल्या 'लिटल मॅगझिन' चळवळीत एक कवी आणि संपादक म्हणून सक्रिय सहभागी असणारा साक्षीदार, म्हणूनही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. स्वातंत्र्योत्तर काळातला भ्रमनिरास तीव्रतेने जाणवू लागलेल्या; चाकोरीतल्या रूढ साहित्यापेक्षा अधिक सच्चे, वेगळे काही लिहिले जावे अशी आच लागलेल्या; 'असो', 'फक्त', 'अबकडइ' सारखी वैशिष्ट्यपूर्ण अनियतकालिकं सुरू करणार्‍या चित्रे, नेमाडे, कोलटकर, भाऊ पाध्ये, राजा ढाले, तुलसी परब, चंद्रकांत खोत, अशोक शहाणे, अर्जुन डांगळे ह्या ताज्या दमाच्या साहित्यिकांच्या फळीचे काळसेकर हे प्रतिनिधी म्हणता येतील. आपल्या मध्यमवर्गीय अनुभवांची जाणवणारी मर्यादा, नैतिक कोतेपण आणि दांभिकता ह्यांच्या पलीकडे जाऊन बाहेरचे जग समजून घेण्याची तीव्र इच्छा, प्रयोगशीलता, मार्क्सवादाचा केवळ एक विचारसरणीच म्हणून नव्हे तर जगण्याच्या अनेक स्तरांवर केलेला स्वीकार ही या पिढीची व्यवच्छेदक म्हणता येतील अशी लक्षणं 'वाचणार्‍याची रोजनिशी'मध्येही लख्ख उमटतात.

लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होणार्‍या 'वाङ्मयवृत्त' ह्या मासिकात डिसेंबर २००३ पासून जानेवारी २००९ पर्यंत काळसेकरांनी 'रोजनिशी' नावाचा स्तंभ लिहिला. त्या साठ लेखांचं संकलन ह्या पुस्तकात आहे. अरुण खोपकरांची अतिशय नेटकी प्रतिक्रिया ह्या पुस्तकाला लाभली आहे. अगदी पहिल्या लेखापासून ह्या लेखात जो सहज संवादाचा सूर लागतो तो संपूर्ण पुस्तकात टिकून आहे. 'जे जे आपणासि ठावे' ते इतरांना सांगण्याच्या प्रेरणेतून हे सारे लेख लिहिलेले असले तरी कुठेही शिकवण्याचा किंवा शहाणे करून सोडण्याचा अभिनिवेश त्यांत जाणवत नाही. सतत जाणवत राहतं ते कुतूहल आणि ऋग्वेदात म्हटल्याप्रमाणे 'आ नो भद्रा क्रतवो यन्तु विश्वतः' (चांगले विचार चहूबाजूंनी आमच्यापर्यंत येवोत)  ह्या वृत्तीने वेगळ्या विचारांचंही केलेलं स्वागत. बहुश्रुतता आणि व्यासंग यांच्यासोबतच जोपासलेली सामाजिक बांधीलकी आणि साहित्याची प्रवाही जाणीव.

काळसेकरांनी वाचलेल्या, सुचवलेल्या पुस्तकांची यादी देणं अशक्यप्राय आहे - लीळाचरित्र, तुकारामाच्या गाथा ते 'नाते' हे छोटेखानी कथा, रिपोर्ट, टिपणे व प्रवासनोंदी अशा मिश्र ललित लेखनाचे अमर हबीब ह्यांचे पुस्तक; मराठी साहित्याच्या विस्तारणार्‍या भूगोलाचा - पर्यायाने सदानंद देशमुख, रमेश इंगळे-उत्रादकर ह्या नव्याने लिहू लागलेल्या लेखकांच्या लेखनाचा मागोवा इथपासून ते इ. एच. कार ह्या इतिहासकाराच्या 'व्हॉट इज हिस्टरी?' ह्या मूलगामी ग्रंथाच्या अनुवादाचा वेध - हैदराबादहून प्रसिद्ध होणार्‍या 'पंचधारा' ह्या त्रैमासिकापासून ते अर्नेस्तो कार्देनाल ह्या निकाराग्वा देशातल्या 'मार्क्सवादी धर्मोपदेशक' कवीच्या भेदक कवितेपर्यंत 'जे जे उत्तम' काळसेकरांच्या दृष्टीला पडलं, ते त्यांनी वाचकापर्यंत आणलं आहे.

ज्या काळात आजच्यासारखी संवादाची साधने उपलब्ध नव्हती, अशा वेळी बाहेरच्या जगाबद्दल असणारं कुतूहल शमवण्याचं काम प्रामुख्याने पुस्तकं करत असत; त्यामुळे 'वाचणार्‍याच्या रोजनिशी'मध्ये पुस्तकांबद्दलची मतं आणि अनुभव बहुसंख्येने येतात, पण त्याचबरोबर संगीत, चित्रपट आणि नृत्याबद्दलही चर्चा होते. अर्थशास्त्राबद्दलच्या एका माहितीपूर्ण, पण सुबोध नियतकालिकाची माहिती येते. लोकभाषांच्या शब्दसंपदेबद्दल आणि जागतिकीकरणाच्या अपरिहार्य परिणामांबद्दल ते लिहितात. मार्खेझच्या कादंबर्‍यांच्याच जोडीने सुधीर पटवर्धनांच्या चित्रांची चर्चा होते आणि हिंदीभाषक कवी मंगेश डबरालबद्दल सांगत असताना संगीत हेही पूरक वाचन कसं ठरू शकतं, ह्याबद्दलही काळसेकर लिहून जातात.

इतका विस्तृत आवाका मांडण्याचा प्रयत्न करणारं हे पुस्तक मला दोन दृष्टींनी महत्त्वाचं वाटतं. एक म्हणजे, मराठीत वर्षाला सुमारे तीन हजार पुस्तकं प्रसिद्ध होतात. सगळीच दर्जेदार नसली तरी विषयांतलं वैविध्य, वेगळे प्रयोग करून पाहण्याची वृत्ती आणि आतापर्यंत अनेक वर्षं साहित्याच्या मुख्य प्रवाहाबाहेर असलेला, मात्र नव्याने लिहू-वाचू लागलेला लेखकांचा आणि वाचकांचा वर्ग ह्या कारणांमुळे अनेक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकं मराठीत आली आहेत. अनेक अनुवाद उपलब्ध होत आहेत. हिंदी आणि इंग्रजी भाषांतलं नवीन साहित्य आहेच, पण ह्या तिन्ही भाषांत यापूर्वी प्रकाशित झालेल्या पण वाचायच्या राहून गेलेल्या पुस्तकांचा डोंगरही 'अजून किती वाचायचं बाकी आहे' ह्या भावनेने छाती दडपून टाकणारा आहे. दुर्दैवाने यातली काही पुस्तकं वाचकांपर्यंत म्हणावी तशी पोहोचू शकत नाहीत. मर्यादित वेळेत जी वाचणं शक्य होतं, त्यातली काही वाचून पदरी निराशा येते. चांगलं लेखन म्हणजे काय, हे समजण्यासाठी जरी अधूनमधून असले धक्के सोसणं गरजेचं असलं तरी एखादा खंदा मार्गदर्शक असला तर बराच फरक पडू शकतो. अगदी अरुण टिकेकरांसारख्या साक्षेपी वाचकानेही 'हाती जे आलं ते चाळून, वाचून, वाङ्मयीन खाचखळग्यांतून स्वतःची स्वतः सुटका करून घेत मार्गक्रमण करावं लागलं. बरंच आयुष्य त्यामुळे वाया गेलं, अस मला आज वाटतं. एखादा वाचनगुरू मिळाला असता तर ते अधिक सत्कारणी लागलं असतं' अशी खंत व्यक्त केली आहे. 'योजकस्तत्र दुर्लभ:' ह्या न्यायाने असा योग्य वाचनगुरू लाभणं विरळाच. हे पुस्तक ती भूमिका पूर्णपणे पार पाडतं, हे म्हणणं धार्ष्ट्याचं होईल. मात्र ती वाट कशी असावी, ह्याची जाण मात्र करून देतं.

हे सारे लेखन स्तंभलेखांच्या स्वरूपात असल्यामुळे त्याला काही अंगभूत मर्यादा आहेत. 'शाश्वताचे रंग' सारख्या दीर्घलेखांच्या पुस्तकात जसं विस्ताराने एखाद्या पुस्तकाबद्दल लिहिता येतं, परभाषेतलं असेल तर त्यातली सांस्कृतिक पार्श्वभूमी स्पष्ट करता येते आणि आपल्या आवडीनिवडींच्या तपशिलांचा हवा तसा विस्तृत पट रेखाटता येतो, तसं लेखन 'वाचणार्‍याच्या रोजनिशी'मध्ये शक्य नाही. असं असलं, तरी नेमक्या शब्दांत त्यांचं मर्म वाचकापर्यंत पोचवण्याचं कसब काळसेकरांकडे आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी एखादं जर वाचलेलं असेल, त्याची वैशिष्ट्यं मनात पुन्हा जागी होतात आणि जी वाचायची राहिली आहेत, ती अर्थातच वाचावीशी वाटतात.

निव्वळ वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांच्या यादीपेक्षाही ह्या लेखांतून सतत जागं असणारं त्यांचं कुतूहल आणि उदार, प्रवाही वाङ्मयीन दृष्टीचं येणारं प्रत्यंतर मला अधिक मोलाचं वाटतं. काळसेकर ज्या कालखंडात वाढले, तेव्हा इंटरनेट सोडाच पण दूरध्वनीही दुर्मीळ होते. माहिती मिळवण्याची साधनं मोजकी होती. आता नेमकी उलटी परिस्थिती आहे. हवी ती माहिती चुटकीसरशी उपलब्ध आहे. तरीही (किंवा त्यामुळेच) ज्याला 'कन्फर्मेशन बायस' म्हणतात, ती केवळ आपल्याच मताला पुष्टी देणारं वाचन करावं (किंवा संगीत ऐकावं/ राजकीय बातम्या देणार्‍या वाहिन्या पहाव्यात/ वृत्तपत्रं वाचावीत) ही वृत्ती वाढत चालली आहे. शिवाय हे केवळ वैयक्तिक पातळीवर अवलंबून नाही. अमेझॉन.कॉम सारखे संकेतस्थळ जर तुम्ही एखाद्या विशिष्ट लेखकाची वा साहित्यप्रकारातली काही पुस्तकं घेतलीत, तर त्याच धाटणीची वा लेखकाची पुस्तकं तुम्हाला आवडतील म्हणून सुचवतं. न्यू यॉर्क टाईम्ससारख्या वृत्तपत्रातही तुमच्या वाचनाच्या पूर्वेतिहासावरून तुम्हाला रोचक वाटतील अशा लेखांच्या वा बातम्यांच्या सुचवण्या येतात. वरवर पाहता हे कदाचित तितके गंभीर वाटणार नाही. मात्र हळूहळू यातून विरोधी दृष्टिकोन समजूनच न घेण्याचा हटवादीपणा उद्भवू शकतो.

अभिजन, उच्चभ्रू वर्गाला जे आवडतं तेच चांगलं; इतर सारं थिल्लर हे एक टोक झालं. 'जे जे लोकप्रिय, ते ते सवंग' ही धारणा त्यातूनच उद्भवते. मात्र मला जे आवडतं, त्यापलीकडे इतर काही चांगलं असूच शकत नाही असं मानणं आणि एकेकाळी अतिशय आवडणार्‍या, परिपूर्ण वाटणार्‍या लेखकाच्या लेखनातल्या किंवा एखाद्या कलाकृतीतल्या त्रुटी काही काळ लोटला की जाणवू शकतात, ही शक्यताच नाकारणं हे दुसरं टोक.  आपल्या मनात साहित्याबद्दल म्हणा वा चित्रपट, संगीत, चित्रकला ह्यांच्या दर्जाबद्दल म्हणा - जे काही विशिष्ट ठोकताळे असतात, ते प्रसंगी तपासून पाहणं; त्यांच्यात अडकून न पडता काही सर्वस्वी भिन्न जर समोर आलं, तर त्याकडे खुल्या मनाने पाहणं आणि तो अनुभव जर बावनकशी असेल तर त्याचं मोकळ्या मनानं स्वागत करणं ही प्रक्रिया तितकीशी सोपी नाही. ती संपूर्णपणे आपण अंगी बाणवली आहे, असा दावाही कुणी करू नये. मात्र निव्वळ साहित्याचाच नव्हे तर कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना, तिची जाणीव जागी असणं महत्त्वाचं आहे. सतीश काळसेकरांची 'वाचणार्‍याची रोजनिशी' वाचत असताना पदोपदी हे जाणवत राहतं. बोरकरांची उपमा उसनी घेऊन सांगायचं तर 'मुळी तटस्थ राहून शाखापर्णीं कंप भोगणार्‍या, भुजाबाहूंनी स्वैर वारे कवळणार्‍या झाडासारखी' ही जागृत जाणीव हा एक श्रीमंत करणारा अनुभव आहे.

Friday, August 26, 2011

मायबोली - रसग्रहण स्पर्धा


'मायबोली' ह्या अग्रगण्य मराठी संकेतस्थळावर सध्या अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेल्या मराठी पुस्तकांच्या रसग्रहणाची स्पर्धा सुरू आहे. तिच्याबद्दल अधिक माहिती ह्या दुव्यावर मिळेल. आतापर्यंत प्रसिद्ध झालेली काही उत्तम, वैशिष्ट्यपूर्ण परीक्षणे -

आर्यांच्या शोधात
कुहू
त्या वर्षी
माझी लाडकी पुतना मावशी
हिंदू
सुनीताबाई

स्पर्धेचं स्वरूप -

१. या स्पर्धेसाठी 'रसग्रहण स्पर्धा - ऑगस्ट २०११' हा नवीन ग्रूप १ ऑगस्टला उघडण्यात आला आहे. या ग्रूपचं सभासदत्व घेतल्यावर तुम्हांला तिथे रसग्रहण लिहिता येईल. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०११, या कालावधीत तुम्ही या स्पर्धेच्या ग्रूपमध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून रसग्रहण लिहू शकता.

तुमच्या प्रवेशिका सर्वांना वाचता याव्यात म्हणून हा धागा सार्वजनिक करण्यास कृपया विसरू नका.

२. धाग्याच्या शीर्षकात पुस्तकाच्या आणि लेखक/लेखिकेच्या नावाचा उल्लेख असावा. उदाहरणार्थ, भालचंद्र नेमाड्यांच्या 'हिंदू' या कादंबरीचं रसग्रहण करणार असाल, तर धाग्याचं शीर्षक - रसग्रहण स्पर्धा - 'हिंदू' - ले. भालचंद्र नेमाडे - असं असावं.

३. स्पर्धेचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जाहीर केला जाईल.

नियम व अटी -

१. ही स्पर्धा फक्त मायबोली.कॉमच्या सभासदांसाठीच आहे. आपण मायबोलीचे सभासद नसाल तर इथे नवं खातं उघडून आपण मायबोली.कॉमचे सभासद होऊ शकता. हे सभासदत्व विनामूल्य आहे.
२. एक व्यक्ती (आणि एकच आयडी) जास्तीत जास्त दोन प्रवेशिका पाठवू शकते. मात्र, यांपैकी एकाच प्रवेशिकेचा बक्षिसासाठी विचार केला जाईल.
३. फक्त मराठी पुस्तके या रसग्रहणासाठी स्वीकारली जातील.
४. रसग्रहणासाठी निवडलेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १ जानेवारी, २००८ नंतर प्रकाशित झालेली असावी.
५. रसग्रहणासाठी विषयाचं व साहित्यप्रकाराचं बंधन नाही. मात्र, अनुवादित साहित्याचं रसग्रहण स्वीकारलं जाणार नाही.
६. एखाद्या काव्यसंग्रहातल्या एकाच कवितेचं, कथासंग्रहातल्या एकाच कथेचं, किंवा पुस्तकातल्या एका प्रकरणाचं / वेच्याचं रसग्रहण ग्राह्य धरलं जाणार नाही. रसग्रहण संपूर्ण पुस्तकाचंच असावं.
७. रसग्रहणासाठी शब्दमर्यादा - किमान ७५० शब्द आणि जास्तीत जास्त १५०० शब्द.
८. रसग्रहणासोबत पुस्तकाचं, लेखकाचं व प्रकाशकाचं नाव, तसंच प्रकाशनाची तारीख देणं आवश्यक आहे.
९. रसग्रहणात संपूर्ण कविता अथवा एखाद्या कवितेचा / कथेचा मोठा भाग असू नये.
१०. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

Thursday, July 29, 2010

मावसबोलीतल्या कविता

काही दिवसांपूर्वी राजेंद्रच्या अनुदिनीवर अनुवादातल्या गंमतींवरचा एक लेख वाचताना टागोरांची एक कविता आठवली होती. शालेय अभ्यासक्रमात 'Where the mind is without fear' ह्या गद्य नावारुपात असणारी ही कविता तेव्हा तितकी ग्रेट वाटली नव्हती. पण त्यानंतर काही वर्षांत एका दिवाळी अंकात टागोरांची मूळ बंगाली कविता देवनागरीत आणि तिचा पाडगावकरांनी केलेला समछंदी/समश्लोकी मराठी अनुवाद वाचला तेव्हा ह्या मूळ कवितेतली नादमयता आणि जोश इंग्रजी अनुवादात बराचसा हरवल्याचं जाणवलं. त्या-वय-सुलभ उत्साहात मी दोन्ही कविता पाठ केल्या होत्या. दुर्दैवाने मराठी अनुवादातल्या पहिल्या दोन ओळीच थोड्याफार आता आठवतात. त्यांच्या बळावरच, निमिषने खो दिल्यावर, बंगाली येत नसतानाही टागोरांच्या ह्या ताजमहालाला विटा जोडण्याचं 'श्रेष्ठ धारिष्ट्य' दाखवतो आहे. यमक जुळवण्यासाठी काही ठिकाणी 'स्वैर अनुवाद' ह्या गोंडस नावाखाली तडजोड केली आहे, ती मोठ्या मनाने माफ करावी :).

आधी टागोरांची मूळ कविता देवनागरीत -

चित्त जेथॉ भॉयशून्य, उच्च जेथॉ शिर
ग्यान जेथॉ मुक्त, जेथॉ ग्रिहेर प्राचीर

आपोन प्रांगाणतले दिबॉश शॉर्बॉरी
बोशुधारे राखे नाय खोंडो खुद्रो कोरी

जेथॉ बाक्य हृदयेर उच्छोमुख होते
उच्छ्वासे उठे, जेथॉ निर्बारितो स्रोते

देशे देशे दिशे दिशे कोर्मोधारा धाय
ओजोस्रो सोहोस्रोबिधो चोरितार्थोताय

जेथॉ तुच्छो आचारेर मोरुबालुराशि
बिचारेर स्रोतोपथ फेले नाय ग्राशी

पौरुषेरे कोरोनि शोतोधा नित्य जेथॉ
तुमी शोर्बो कोर्मो-चिंता-आनंदेर नेता

निजो होस्ते निर्दोय आघात कोरी पितो
भारतेरे शेई शोर्गे कोरो जाग्रतो


आणि हा जमेल तसा समश्लोकी (!) अनुवाद -

चित्त जिथे निर्भय अन् उंच जिथे माथा
ज्ञान जिथे मुक्त तिथे जागृत करी नाथा

क्षुद्र घरांच्या भिंती दिवसरात्र जेथे,
मम अंगण खंडित नच करिती विश्व जेथे

जिथे वाक्य हृदयातून सहज व्यक्त होते
श्वास जणू मुक्त जगीं, नित्य नवी गीते

हर प्रांती, हर जागी कर्मधारा वाहे
सहस्रविध, अजस्ररौद्र तुझे रूप लाहे

जिथे तुच्छ आचारांच्या वाळुचा विकार
बाधी न विचारांना, होतसे प्रसार

साहसास नित्य नवी वाट मिळे जेथे
तूच स्फूर्ती कर्मांची, आनंदही तेथे

तव हस्ते निर्दय आघात कर, हे पिता
भारतास त्या स्वर्गीं करी जागता!

माझा खो अजित, अदिती आणि रैनाला

* * *

अनुदिनीचा वाढदिवस साजरा करण्यात काही हशील नाही, तसंच न साजरा करण्यातही नसावं (आठवा - सखाराम गटणे, स्वाक्षरी इ.). तेव्हा आज ह्या अनुदिनीची पाच वर्षं पूर्ण झाली एवढं लिहून थांबतो. आता 'दशवर्षाणि ताडयेत'ची तयारी ठेवायला हवी :)

* * *

Wednesday, March 10, 2010

केव्हातरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो

कुसुमाग्रजांचा आज अकरावा स्मृतिदिन. त्यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतोच. त्यांच्या कवितांबद्दल वेगळं लिहिण्याची गरज नाही, मात्र त्यांचं घरातल्या गडीनोकरांचीही काळजी घेणारं मृत्युपत्र आज अचानक आठवलं. (निव्वळ पाच हजारांत त्यांच्या सगळ्या कवितांचे प्रकाशनहक्क पदरात पाडून घेण्याचा काहींचा धूर्तपणाही त्यातून उघड झाला होता, ही बाब अलाहिदा.) त्यांच्या ’केव्हातरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो’ ह्या कवितेतल्या आठवणीत रूतून बसलेल्या या काही ओळी. बोरकरांच्या ’टाचा घाशीत प्रकाशाचा घोडा थोडा अडतो आहे’ ची आठवण करून देणार्‍या -

असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे,
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे.

माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही,
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही.

Saturday, October 24, 2009

कोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना

भालचंद्र नेमाड्यांची १९६३मध्ये प्रकाशित झालेली 'कोसला' ही मराठीतली अतिशय गाजलेली कादंबरी. नेमाड्यांनी त्यांच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी, कथानायक ‘आज उदाहरणार्थ पंचविशीचा’ आहे असे सांगून लिहिलेली ही कादंबरी पंचेचाळीस वर्षे झाली तरी आपला प्रभाव टिकवून आहे. मूलपण आणि प्रौढ पुरुष यांच्यामधली गोंधळलेली अवस्था, जगाच्या भंपकपणाचा येणारा राग, स्वत:च्या डोक्यातला विचारांचा 'कल्लोळ कल्लोळ', पुढे नक्की काय करायचे आहे याचा काहीच निर्णय होत नसल्याने येणारी अस्वस्थता, आणि अशातच शरीराच्या गरजांचे वाढत्या उत्कटतेने जाणवू लागणारे अस्तित्व या सार्‍यांचा कोलाज कोसलाने मराठीत प्रथमच मांडला. ज्ञानेश्वरीतही वापरल्या गेलेल्या कोसला ह्या खानदेशी शब्दाचे मूळ म्हणजे ‘कोश’. वेगळेपणा, अलम दुनियेपासून तुटलेपण ह्या रुढ अर्थाबरोबरच एकमेकांत गुंतलेल्या वेगवेगळ्या धाग्यांनी तयार झालेले क्लिष्ट, काहीसे संरक्षक असे जाळे असाही ह्या रुपकाचा अर्थ नेमाड्यांना अभिप्रेत असावा.

फडके-खांडेकरांच्या प्रभावांपासून नुकतेच मोकळे होऊ लागलेल्या, स्वातंत्र्योत्तर काळातला भ्रमनिरास स्वीकार करण्याच्या मनःस्थितीत येऊ लागलेल्या मराठी वाचकवर्गाने अशा या वेगळ्या वाटेवरच्या पुस्तकाला डोक्यावर घेतले नसते, तरच नवल. आजही आकाशवाणीने वाचकांकडून मागवलेली मराठीतील सर्वोत्कृष्ट पुस्तकांची यादी असो, वा अंतर्नादची सर्वोत्तम २० पुस्तकांची यादी - कोसलाचा त्यात समावेश असतोच. साठोत्तर साहित्यातील मराठीतील सर्वात महत्त्वाची म्हणता येईल अशी ही कादंबरी, इंग्रजीतल्या जे. डी. सॅलिंजर यांच्या 'कॅचर इन द राय' या कादंबरीवर बेतलेली आहे/ तिच्यापासून प्रेरणा घेऊन लिहिलेली आहे, असा प्रवाद जेव्हा प्रथम ऐकला; तेव्हा काहीसे आश्चर्यच वाटले.

त्याची शहानिशा करावी या हेतूने या दोन्ही कादंबर्‍या एकापाठोपाठ एक वाचल्या. या दोन कादंबर्‍यांतील साम्यस्थळे, आणि फरकही जाणवले. ते लिहिण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, हा सारा उपद्व्याप ‘कोसला’सारखी लोकप्रिय कादंबरी कशी परप्रकाशित किंवा कमअस्सल आहे, हे सांगण्याच्या अभिनिवेशातून केलेला नाही. कोसलाने अनेकांना झपाटून टाकले आहे. तिची वेगळी शैली, ओळखीचे वाटणारे अनुभव आणि त्या वयातली अचूक टिपलेली मानसिकता - यामुळे ती केवळ तीस-चाळीस वर्षांपूर्वी पंचविशीत असणार्‍या पिढीला जवळची न वाटता, आजच्या पिढीलाही ओळखीची वाटते. त्यामुळे मूर्तिभंजकाचा आव आणून, जे जे लोकप्रिय ते ते टाकाऊ, अशा सवंग अट्टाहासातून हे लेखन केलेले नाही.

दुसरे म्हणजे, तसे पाहिले तर साहित्यात फार थोड्या गोष्टी, फार थोड्या थीम्ज ह्या ओरिजिनल, मूळच्या आहेत.‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं’ या न्यायाने कुठलाही विषय आत्तापर्यंत अस्पर्श राहिला असेल, असे वाटत नाही. तेव्हा या मूळ कल्पनांमध्ये लेखकाने स्वत:ची शैली कितपत जाणवून दिली आहे, स्वतःच्या प्रतिभेची कितपत गुंतवणूक केली आहे हे अधिक महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे, कोसला आणि कॅचरचा नायक हा कॉलेज सोडलेला, सारख्याच पराभूत मानसिकतेत सापडलेला आहे; या साम्यापेक्षा त्यांच्या शैलीतील साम्य (आणि अर्थातच फरकही) मला अधिक महत्त्वाचा वाटतो. अर्थात, ‘कादंबरी उत्कृष्ट आहे ना? झालं तर! मग तिची प्रेरणा कुठूनही का असेना’, या विधानाला काही प्रतिवाद नाही; कारण कादंबरीच्या आस्वादात तिच्या प्रेरणास्रोताच्या स्थानामुळे काही बाधा येत नाही हे नक्की.

या दोन कादंबर्‍यांतील साम्यस्थळे दाखवायची झाली तर, दोहोंतला सुरुवातीचा परिच्छेदच पुरेसा बोलका आहे. ‘बट आय डोन्ट फील लाईक गोईंग इंटू इट…आय ऍम नॉट गोइंग टू टेल यू माय होल गॉडडॅम ऑटोबायोग्राफी’, या मंगलाचरणाने सुरुवात करणारा होल्डन आणि ‘खरं तर तुम्हांला वगैरे सांगण्यासारखं एवढंच...पण मी अगदी सगळंच सांगणार नाही’ म्हणणारा पांडुरंग सांगवीकर.‘काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही’ हे दोघांचेही ध्रुवपद.

दोघांचेही वडील कर्तबगार; पांडुरंगाच्या शब्दांत सांगायचे तर ‘रंगारूपाने प्रतिष्ठित’. एकाचे वडील सधन शेतकरी, तर दुसर्‍याचे चांगली कमाई असणारे वकील. त्यामुळेच की काय, पण पैशाच्या बाबत दोघेही अगदी उधळे नसले तरी काहीसे बेफिकीर. गॅदरिंगच्या बजेटबाहेर गेलेल्या खर्चाचे प्रकरण ‘कोसला’मध्ये येते; तर टाईपरायटर स्वस्तात विकून पैसे घेण्याची, अगदी लहान बहिणीने ख्रिसमससाठी साठवलेल्या पैशांतून उधार घेण्याची पाळी कॅचरमध्ये होल्डनवर येते. मेसच्या हिशोबात पांडुरंग फसवला जातो, तर होल्डनला वेश्या आणि तिचा दलाल ठकवतात. असे झाल्यावर ‘आपण कोणतंच काही नीट केलं नाही’ ही (पांडुरंगच्या शब्दांतील) भावना आणि असे फसवले गेल्यानंतर आत्महत्या करावीशी वाटणे - हेही दोन्हीकडे सारखेच. पांडुरंग मेस, गॅदरिंग इ. मध्ये निष्काळजीपणे अडकतो; तर होल्डन कॉलेजच्या फेन्सिंग टीमचा मॅनेजर बनतो खरा - पण त्यांचे सामान ट्रेनमध्ये विसरून परत येतो. ह्या स्वभावदोषावर (किंवा वैशिष्ट्यावर) ‘कोसला’त थोडीफार टिप्पणी येते, पण होल्डन मात्र ‘सम गाईज स्पेन्ड डेज लूकिंग फॉर समथिंग दे लॉस्ट. आय नेव्हर सीम टू हॅव एनीथिंग; दॅट इफ आय लॉस्ट, आय वुड केअर टू मच’ असे परिणामकारक भाष्य करून जातो.

दोन्ही नायकांच्या आयुष्यांत त्यांच्या धाकट्या भावंडांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. ऍलीचा आणि मनीचा, लहान वयात झालेला मृत्यू दोघांना उद्ध्वस्त करून जातो. मृत्यूच्या या अन्यायाने संतापून जाऊन होल्डन रात्रभर गॅरेजमध्येच झोपतो. आपल्या हाताने तिथल्या खिडक्या फोडतो, गाडीच्या काचाही फोडण्याचा प्रयत्न करतो. पांडुरंग ‘मी याचा सूड उगवीन’ अशा प्रतिज्ञा करून लहान मुलींची पिवळी साडी चिंध्या करून पेटवून देतो. त्या जाळात हात भाजल्यावर, शाईने तळवे थंड करून खोलीभर त्याचे शिक्के उमटवतो. इतर जगाला समजून घेताना त्रास होत असला, तरी मनीशी आणि फीबीशी त्यांचा संवाद जुळतो.

दांभिकतेबद्दलचा दोघांचाही उपहास एकाच जातकुळीतला. होल्डनला त्यांच्या शाळेतल्या चर्चमध्ये येऊन भाषण देणार्‍या उद्योगपतीबद्दल वाटणारा आणि पांडुरंगाला वक्तृत्वमंडळात जाणवलेला. इतिहासाबद्दल दोघांच्या प्रतिक्रिया सारख्याच. ‘साल्यांना शिलालेख सापडले वगैरे, म्हणून अशोकाची माहिती कळली. मधले कुठले पुरावे नसले, की हे लोक वाटेल तसे ठोकताळे बांधतात’ म्हणत पांडुरंग इतिहास सोडून मराठी घेतो. अशाच धर्तीवर इजिप्शियन्सबद्दल लिहून ‘मला एवढंच माहीत आहे, मला नापास केलंत तरी चालेल’ अशी शरणचिठ्ठी उत्तरपत्रिकेतच लिहून होल्डन शाळा सोडतो.

दोन्ही कादंबर्‍यांतील तपशीलांत याहूनही काही अधिक साम्ये आहेत. निरर्थकपणाचे तत्त्वज्ञान म्हणून की काय, पण कल्पित (मेक-बिलिव्ह) भंकस करणे (होल्डनचे टोपी घालून आंधळ्याप्रमाणे वावरणे, गोळी लागल्याचा अभिनय करणे तर पांडुरंगाचे सुर्शाबरोबर नऊ हजाराव्या शतकातले इतिहासकार असल्याचे समजून विसाव्या शतकाबद्दल बोलणे किंवा इचलकरंजीकर बरोबर मधुमिलिंद हे आडनाव घेऊन टाईमपास करणे इ.); वर्गातल्या मुलींचे पुढे कुणाशी लग्न होईल याबद्दलचे ‘करूण’ (ज्यांना होल्डन डिप्रेसिंग) म्हणतो असे विचार मनात येणे; क्लासिक पुस्तकांबद्दल चर्चा करणे (पांडुरंगचे मेहताशी डी.एच. लॉरेन्सबद्दल, होल्डनचे डीबीशी मॉमच्या ऑफ ह्यूमन बॉन्डेजबद्दल) वगैरे.

पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे दोन्ही निवेदनांतून जाणवत राहणारे शैलीतील साम्य. वर म्हटल्याप्रमाणे, तपशीलांतील साम्यापेक्षाही शैलीतील साम्य मला अधिक महत्त्वाचे वाटते. ‘कोसला’च्या लोकप्रियतेमागे कथानकापेक्षा शैलीचा वाटा काकणभर अधिकच असावा. दोघांचीही निवेदनाची शैली पराभवाचा स्वीकार केलेली, थोडी तुटक अशी आहे, आणि हे अधोरेखित करायला म्हणून की काय; सॅलिंजर कथनात ‘ऑर एनिथिंग, सॉर्ट ऑफ, अँड एव्हरीथिंग, दॅट किल्ड मी.’ अशा शब्दसमूहांची वरचेवर पेरणी करतो. ह्याचेच प्रतिबिंब नेमाड्यांच्या गाजलेल्या ‘वगैरे, उदाहरणार्थ आणि थोर’ मध्ये पडलेले आहे, हे कोसलाच्या वाचकांना सहज कळून येईल.

‘कॅचर इन द राय’ जिथे संपते, तिथे कोसलाचा उरलेला अर्धा प्रवास सुरू होतो; असे म्हणायला हरकत नसावी. कॅचरची मध्यवर्ती कल्पना जरी तीच असली, तरी तिचा पट कोसलाच्या तुलनेत लहान आहे. होल्डन मनोरुग्णालयातून (अथवा सॅनिटोरियममधून) गेल्या ख्रिसमसच्या काही दिवसांबद्दल सांगतो आहे, एवढाच. कोसलामध्ये याउलट पंचविशीतला सांगवीकर त्याच्या आयुष्यातील काही वर्षांविषयी सांगतो आहे. ह्या मोठ्या पटाचे फायदे आहेत, तसेच अर्थात तोटेही.

मोठा पट असल्यामुळे कोसलात काही ठिकाणी थोडा पसरटपणा येणे अपरिहार्य आहे, पण त्याचबरोबर पांडुरंगची मनःस्थिती दर्शवणारी रोजनिशी नेमाड्यांना वेगवेगळे भाषिक प्रयोग करायलाही वाव देते. ‘पूर्वजांच्याच नशिबी नपुंसकगिरी नव्हती. म्हणून हे फेरे - मर्द बापांपायी’ सारखी वाक्यं याच भागातली. मनीच्या मृत्यूचे प्रकरण नेमाड्यांनी अतिशय जीवघेणे लिहिले आहे. ‘तिच्याबरोबर तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिने एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली’, यासारख्या ओळी पहिल्याच प्रयत्नात ‘कट निअरर द एकिंग नर्व्ह’चा परिणाम साधून जातात.

पण या गोष्टींबरोबरच दुसर्‍या भागात, पांडुरंगाचा संपूर्ण पराभवाकडे होणारा प्रवास दाखवताना कोसला काही ठिकाणी विस्कळीतही होते. कॅचर मात्र एखाद्या परिणामकारक शॉर्ट फिल्मसारखा नेमका परिणाम साधून उत्कर्षबिंदूवर थांबते. नायकाच्या संपूर्ण पराभवाचा, त्याच्या हतबल मानसिकतेचा संपूर्ण प्रवास दाखवण्याच्या भानगडीत ती पडत नाही. हा एक मुख्य फरक वगळला तर; अंतर्नादच्या श्रेष्ठ पुस्तके विशेषांकात संजय जोशींनी लिहिलेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे कोसला निर्णायकपणे पराभूतवादी तर कॅचर ढोबळमानाने आशावादी, होल्डनच्या भवितव्याबद्दलच्या सार्‍या शक्यता मोकळ्या ठेवून संपली असल्याचे म्हटले आहे, ते तितकेसे पटत नाही. होल्डन सॅनिटोरियममध्ये असल्याचे कादंबरीच्या सुरुवातीला आणि शेवटी पुरेसे स्पष्ट केले आहेच. उलटपक्षी अखेरीस पांडुरंग 'उदाहरणार्थ काही झालं तरी हे आपल्याला खुंट्यावर आणून वगैरे बांधतीलच. मग नेमकं अगोदरच खुंट्यावर येऊन उभं राह्यलेलं बरं' ह्या तडजोडवादी वृत्तीचा स्वीकार करताना दाखवला आहे.

अगदी गेलेल्या वर्षांबद्दल बोलताना 'आपापली वर्षं पुढे अचूक शिल्लक असतातच...तेव्हा गमावली ही भाषा उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही' अशीही टिप्पणी करतो. कादंबरीच्या विस्तारानंतर प्रवाहाच्या विरूद्ध पोहायची धडपड सोडून देऊन तथाकथित व्यवहारी शहाणपण अंगीकारलेला पांडुरंग सांगवीकर हा या दोन कादंबर्‍यांतला मुख्य फरक. सारांश म्हणजे, पुनरुक्तीचा आरोप पत्करून, ऑगस्ट स्ट्रिंडबर्गच्या भाषेत सांगायचे झाले तर एकाच दु:खाची नस शोधणार्‍या दोन वेगळ्या मातींतल्या ह्या दोन असामान्य कादंबर्‍या. कोसला लिहिताना नेमाड्यांनी 'कॅचर'वरून प्रेरणा घेतली आहे, हे अमान्य करता येणार नाही. तपशीलांतील आणि त्याहूनही महत्त्वाचा म्हणजे, शैलीतील सारखेपणा वरवरच्या वाचनातही जाणवण्यासारखा आहे. पण त्याचवेळी कोसला ही कॅचरची नक्कल आहे असे म्हणणे चुकीचे, अन्याय्य ठरेल. मूळ कल्पनेत नेमाड्यांनी स्वत:च्या प्रतिभेची गुंतवणूक करून तिचा थोडा विस्तार केला आहे, हे नक्की. समीक्षकी भाषेत, त्यामुळे कॅचर अधिक 'टोकदार' ठरते आणि कोसला थोडी 'पसरट' होते असे म्हणायचे की, कोसला हे कॅचरच्या वाटेवरचे पुढचे पाऊल आहे असे ठरवायचे; हा भाग अलाहिदा (आणि व्यक्तिसापेक्षही).

[अन्यत्र पूर्वप्रकाशित]

Sunday, October 26, 2008

जे जे उत्तम...४ [कोसला]

ती अतिशय शांत होती. कामात, बोलण्याचालण्यात, गाणं म्हणण्यात, शाळेत जाण्यात.

आई म्हणायची, हिला मेंदूच नाही. कंदिलाची काच मोरीत दुसरं कुणीही घासत असतांना फुटली की आई म्हणायची, मन्ये, थांब कारटे. मग मनी घरातून म्हणायची, मी नाही ग आई. मी झाडते आहे. कुणी दुधाचं भांडं आडवं केलं की आई घरातून म्हणायची, मनीच असणार.

दर वेळी मुलगीच होते, म्हणून आजी नेमकी मनीच्या वेळी बाळंतपणाला कंटाळली. घरातले सगळे व्याप सांभाळून पुन्हा आईचं करायचं. ती तान्ह्या मनीचं अंग घसघसून घासायची. एकदा कडक पाण्यात थंड पाणी मिसळायचं विसरूनच तिला पायांवर पालथं घेऊन पाण्याचा चटका लागल्यावर आजी म्हणाली, आता कोण हिला परत पाळण्यात टाकेल, गार पाणी मिसळून पुन्हा घरातून हिला आणून पायावर घेईल? मग मनी किंकाळून रडली, तेव्हा आई घरातून आली. आणि पाण्यात हात घातल्यावर रडून म्हणाली, उठा मी धुते. तेव्हा आजी मनीला जमिनीवर आपटून म्हणाली, मुलींच्या आईनं एवढी मिजास करू नये.

पण आईचंसुद्धा मनीवर फार प्रेम नव्हतं. ती पोटांत असताना आईला पण वाटायचं, इजा बिजा तिजा. हा तिसरा मुलगाच होईल. पण झाली मनी. म्हणून वडलांचीसुद्धा हिच्यावर तिरपी नजर होती.

...

मनीच्या अंगावरचे फोड लिंबाएवढे झाले. आजी हिसपिस करत तिची व्यवस्था पाह्यची. आई छोट्या नलीकरता मनीच्या फार जवळ जायची नाही. दुरून पाह्यची. मनी आईला पाहून, मला घे म्हणून दोन्ही हात वर करायची. पण आई घ्यायची नाही.

फोड टरारले तेव्हा मात्र आई मनीच्या खाटेजवळ फक्त बसायला लागली. घराच्या कुणालाच तिथे येऊ देत नव्हते. फोड खाजवू नये म्हणून मनीच्या दोन्ही हातांत लहानलहान लांब पिशव्या अडकवून त्या मनगटांवर गच्च बांधून टाकल्या होत्या. पिशव्यांतून देखील ती फोड खाजवून फोडायची. म्हणून तिचे दोन्ही खांदे रक्तबंबाळ झाले होते. मग आजीने संतापून तिचे हात खाटेच्या दोन्ही बाजूंना करकचून बांधून ठेवले.

मग ती हात सोडा म्हणाली.
तेव्हा आईनं एकदा विचारलं, मनूताई, तुला काय हवं? पाणी?
तेव्हा मनी बोललीच नाही.
आई म्हणाली, मने बोल, बोल. उद्या तुला बोलता येणार नाही. आज माझ्याशी बोल.
पण ती आईशी बोललीच नाही.
आजी म्हणाली, मनूताई, दादाला तिकडून काय आणायला सांगू?
तेव्हा ती म्हणाली, लाल साडी.
लाल साडी.
हे ती म्हणाली, तेव्हा नेमकं त्या वेळी मी इकडे काय करत असेन? खोलीत होतो की टेकडीवर? की मित्रांबरोबर हसत होतो,की खिडकीतून टेकडीकडे पहात होतो?
तिला मी आठवलो असेन. लाल साडी.
हे ती मला दर सुट्टीत सांगायची. आणि मी दर वेळी म्हणायचो, पुढच्या वेळी नक्की.
मग मी साडी आणणार म्हणून ती माझी किती तरी कामं करायची. माझी पाठ खाजवून दिली नाही की मी म्हणायचो, लाल साडी हवी ना?
हळूहळू तिचा आवाज बंद होत आला. घशात पण फोडफोड असतील. डोळ्यांत तर फोड पडून बाहुल्या पांढर्‍या झाल्याच होत्या.
आई म्हणाली, मनूताई तुला काय हवंऽय?
मनी म्हणाली, माझे हात सोडा. आग, आग, आई, आग गं.
मग तिचं तोंडच उघडेना. तोंडात ओतलेलं आत जाईना. डोळे तर गेलेच होते.
आई खाटेच्या तिकडच्या बाजूनं हाक मारायची, मनूऽ
आणि ती दोन्ही हात ख्रिस्तासारखे बांधलेले ठेवून पांढरे डोळे ताणताणून नेमकी तिकडे पाह्यची.
मग आई उशामागून हाक मारायची, मनूताईऽ.
तेव्हा ती डोकं वर करून पाह्यची.
डोळे होते कवड्यांच्यासारखे शुभ्र.
आजी म्हणाली, अजून ऐकू येतंय.
आणि दोन दिवसांनी तिला न न्हाणता-धुता गावाबाहेर पुरून आले. आणि तिच्याबरोबर तिच्या खाटेला लागलेलं सगळं पुरून आले. तिची शाळेत जायची छोटी पिशवी, तिची चादर - सगळं.


मग दोन-तीन दिवस मी संतापून गेलो. पण कशावर संतापावं हे कळेना. कशावर?
मी म्हणालो, मी वडलांचा खून करीन. मी आजीला ठार मारीन. मग मी सगळं घर पेटवून देईन. सगळ्यांची प्रेतं त्या घरात जाळून टाकीन, आईला जिवंत. हे असं मरणं.
मनीला पुरलं पुरलं पुरलं. मी भावनांनी खरोखरच भडकून गेलो. बंडल नाही.
मी एक पिवळीजर्द लहान मुलींची साडी विकत आणली. आणि तिचे बोटबोट तुकडे केले. ते पेटवून दिले. त्या जाळात माझे हात भाजले. मग दौत जमिनीवर ओतून माझ्या हातांचे चटके थंड केले. शाईनं तळवे भिजवून भिजवून सगळीकडे माझ्या हातांचे शिक्के मारले. उशीवर, गादीवर, टेबलावर, वह्यांवर, पुस्तकांवर, दारावर, खिडक्यांवर, भिंतीवर.
मग पातेल्यातलं सगळं दूध खाली एका कुत्र्याच्या बेवारशी पिल्लाला पाजलं.
मी म्हणालो, मी याचा सूड उगवीन. दर महिन्याला शंभर रुपये खर्चीन. महिन्याला दोनशे रुपये मागवीन.
मी एकटा वेताळ टेकडीवर निघून आलो. केव्हा वेड्यासारखा धावत सुटलो. केव्हा नुसता बसून राहिलो. रात्री पुण्यातले अनेक रस्ते पायी हिंडलो. एका पोलिसानं हटकलं तेव्हा मी म्हणालो, माझी बहीण मेली.

...

आणि मी म्हणत होतो, धर्माचं होतं-नव्हतं तेवढं गाठोडं बांधून ती निघून गेली. निघण्यापूर्वीच्या वेदना आमच्या स्मरणासाठी ठेवून देऊन. तिनं एवढंच तोडलं नाही - जे तिच्याआमच्यात कायम राहील. बाकीचं सगळं - सगळ्या जमिनीवरच्या रेघा पुसून टाकल्या. ती नुकतीच नेमानं शाळेत जात होती. घरून सात वाजायच्या आतच तिला ढकलून द्यायचे. ती नुकतीच बाराखडी शिकली होती. आणि तिला फक्त शिकवलेलेच धडे वाचता यायचे. तेव्हा भिंतीवर तेवढीच अक्षरं तिला दिसली असतील. खिशात सागरगोट्या होत्या. फ्रॉकचं कापड अंगाला चिकटलं होतं. हे सगळंच टाकलं. ती सर्वत्यक्त काळोख्या लांब रात्रीची वाट चालत असेल आता. जेव्हा मीही त्या वाटेवर जाईन, तेव्हा ती किती तरी पुढे गेलेली असेल. म्हणजे सापडणारच नाही. गेलं ते गेलं, आता नवं काही - असं म्हणून. तिच्याबरोबरच तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली. आणि तिला हेही काहीच नाही. तिला कसलाच पार नाही. तीर नाही. किनारा आहे, जो फक्त एकदाच गाठता येईल. तिनं धर्म तरी काय बरोबर नेला असेल? तिनं येतांना फक्त कर्म आणलं. जातांना फक्त काळोखा प्रवास. तिचा प्रवास तिचाच. ती सर्वमुक्त. हेमुक्त तेमुक्त. रंगमुक्त. अंगमुक्त. मनमुक्त. संज्ञामुक्त. ती मुक्तिमुक्त. तिचं पुसट मनोबिंब फक्त माझ्याजवळ.

...

कादंबरी - कोसला
लेखक - भालचंद्र नेमाडे